ठसा – भारत कांथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीला दुर्दैवाने सध्या अपघाती निधनाचे एकेक धक्के पचवावे लागत आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अवघ्या एकतीस वर्षांचा अतिशय उत्साही आणि लोकप्रिय अभिनेता भारत कांथ याच्या हैदराबाद येथील रस्त्यावर झालेल्या निधनाचा धक्का असाच दुःखदायक असाच आहे. या दुर्दैवी घटनेत त्याच्यासह असलेला छायाचित्रणकार साई त्रिलोक याचेही निधन झाले. भारत कांथ हा आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीचा अभिनेता म्हणून ओळखला जाई. तो एकाच वेळेस तेलुगू भाषेतील चित्रपट, वेब सीरिज, यूटय़ूबवर नृत्यगीत अशा विविध माध्यमांतून यशस्वी वाटचाल करीत असतानाच काळाने त्याला हिरावून घेतले. भारत कांथचे इन्स्टाग्रामवर चाळीस हजार

फॉलोअर्स, तर यूटय़ूबवर तीस हजार सबस्क्राईबर आहेत. यातच तो युवा पिढीत अधिकाधिक लोकप्रिय होता याचा प्रत्यय येतो. विशेषतः आधुनिक जीवनशैलीबाबतच्या त्याच्या चित्रफिती, रील यांना समाज माध्यमांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. भारत याचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोरे या गावातील. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱया के. भारत कांथ याची भूमिका असलेल्या चेन्ना नारायण दिग्दर्शित ‘ग्रमण’ (2021) या चित्रपटाच्या लोकप्रियतेने तो अभिनय क्षेत्रात स्थिरावला. एका खेडेगावात जाऊन तेथील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱया वैद्यकीय विद्यार्थ्याच्या त्याने साकारलेल्या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. याशिवाय दिग्दर्शक वाय युगंधर यांचा ‘टेनेन्ट’ हादेखील भारत कांथ याची भूमिका असलेला चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत सत्यम राजेश, मेघा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘गीतांजली’, ‘पार्वती परमेश्वरुजू’ या त्यांच्या वेब सीरिजनीही चांगली लोकप्रियता मिळवली. त्यांनी काही लघुपटांतही भूमिका केल्या. आपण एकाच वेळेस विविध प्रकारच्या माध्यमांतून वाटचाल करावी असाच भारत कांथचा व्यावसायिक दृष्टिकोन होता आणि त्यात त्याला यशही प्राप्त होत होते. मात्र ते सगळेच अर्धवट राहिले.