आभाळमाया – भास्कराचार्य!

>> दिलीप जोशी

आज मकरसंक्रांत. सूर्याचा मकर ‘राशीत’ प्रवेश म्हणजे आता सूर्य त्या राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणार. याला सण म्हणून असलेले सांस्पृतिक महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु 21 डिसेंबरला सुरू झालेल्या उत्तरायणामुळे आता आपले वसतिस्थान असलेल्या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील, दिवसरात्रीपैकी ‘दिवसा’चा काळ वाढू लागेल. हळूहळू दिवस ‘मोठा’ होत जाईल, रात्र लहान होईल. हा सिलसिला 21 जून सूर्य कर्पवृत्तावर तळपेपर्यंत वाढत्या वेळाचा असणार आहे. अवकाशातील या घडामोडी आपल्या जीवनावर परिणाम करतात त्या ऋतुचक्राच्या माध्यमातून. आपल्या देशातली थंडी इतक्यातच संपणार नसली तरी दीड-दोन महिन्यांत ‘भास्करा’च्या तेजाच्या झळा जाणवायला लागतील.

सूर्य या आपल्या ग्रहमालेच्या जनकताऱयाच्या बारा नावांपैकी एक नाव भास्कर. योगायोगाने याच नावाचे एक महान खगोल अभ्यासक आणि संशोधक आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. सूर्याच्या मकर-संक्रमणाच्या निमित्ताने आपण या ‘भास्कराचार्यां’च्या कार्याचे स्मरण करूया.

या प्रज्ञावंत खगोल अभ्यासकाचा जन्म 1114 मध्ये झाला आणि वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी त्यांनी ‘सिद्धांत शिरोमणी’ हा ग्रंथ सिद्ध केला. वैद्यक, तर्पशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र्ा अशा सर्व विषयांचा अभ्यास भास्कराचार्यांनी तरुण वयातच पूर्ण केला होता. 1150 मध्ये त्यांनी ‘सिद्धांत शिरोमणी’ हा ग्रंथ लिहून हिंदुस्थानातील तोपर्यंतच्या खगोल संशोधकांमध्ये मानाचे स्थान प्राप्त केले.

या ग्रंथाचे चार भाग आहेत. लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय. खगोल संशोधनासाठी गणित ही अर्थातच आवश्यक गोष्ट आहे. अंकगणितापासून ग्रहाविषयीच्या ग्रहगणितापर्यंतचा अभ्यासक्रम भास्कराचार्यांनी सोप्या शब्दांत मांडला. यातील लीलावती हे अंकगणित आणि दुसरे बीजगणित ही पुस्तके इंग्रजी शिक्षण पद्धत हिंदुस्थानात रुजेपर्यंत सुमारे सातशे वर्षे पाठय़क्रमात होती. एवढा प्रदीर्घ काळ टिकलेले गणिताचे दुसरे ‘टेक्स्ट बुक’ नसेल. भास्कराचार्यांच्या गणितीय संकल्पनेत आधुनिक गणिताची बीजे आढळतात. अर्थात पाश्चात्य देशातही स्वतंत्रपणे गणित व इतर शास्त्र्ाs विकसित झालीच, पण आपणही त्यात मागे नव्हतो हे भास्कराचार्यांच्या ग्रंथावरून दिसून येते. कुट्टक, चक्रताल या त्यांच्या गणितीय संकल्पना ‘पल्वलायझर’ आणि ‘इडिर्मिनेट इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर’ या आधुनिक गणिती ‘संकल्पना’सारख्याच आहेत असे भास्कराचार्यांच्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केलेले प्रा. मोहन आपटे सांगत असत.

भास्कराचार्यांनी मोठय़ा संख्यांचे वर्गमूळ, घनमूळ वगैरेच्या पद्धती सोप्या केल्या. त्यांचे अंकगणिताचे ‘लीलावती’ हे पुस्तक रंजक श्लोकांमधून गणित शिकवते. गणिताध्याय आणि गोलाध्याय या भास्कराचार्यांच्या रचना खगोलशास्त्र्ााशी निगडित आहेत. भास्कराचार्यांनी पृथ्वीचा परीघ काढण्याची सोपी पद्धत सांगितली. एकाच रेखांशावरील (लॉन्जिटय़ूड) दोन शहरांचे अक्षांश (लॅटिटय़ूड) लक्षात घेऊन अंतर काढले की त्यातील अक्षांशाचा फरक समजेल. समजा दोन शहरांतील अंतर 1 अक्षांश आणि सुमारे 110 किलोमीटर असेल तर 360 अंशाचा हिशेब करून पृथ्वीचा परीघ व नंतर त्यावरून त्रिज्या तसेच व्यास ठरवता येतो. भास्कराचार्यांनी बाराव्या शतकात मांडलेल्या गणितानुसार पृथ्वीचा परीघ 39,600 किलोमीटर होता आणि अत्याधुनिक मापनानुसार तो 49,680 किलोमीटर आहे. भास्कराचार्यांनी पृथ्वीचा व्यास 12,648 किलोमीटर सांगितला, आधुनिक गणितानुसार तो 12,800 किलोमीटर भरतो. म्हणजे भास्कराचार्यांचे गणित तत्कालीन उपलब्ध साधनांच्या मर्यादा लक्षात घेता किती अचूक होते हे लक्षात येईल.

भास्कराचार्यांनी खगोल अभ्यासासाठी ‘यंत्राध्याय’ लिहून प्रात्यक्षिक दाखवणारी यंत्रनिर्मितीही केली. गोलयंत्र (आर्मिलरी स्फिअर), नाडीवलय (सन डायल), शंकू (नोमन), तालमापन करणारे ‘फलकयंत्र’ अशा अनेक साधनांद्वारे अभ्यास करत हा ‘भास्कर’ तळपत राहिला. याच यंत्रांवर आधारित जंतरमंतर (यंत्रमंत्र) या पाच वेधशाळा सवाई जयसिंग राजाने हिंदुस्थानात ठिकठिकाणी बांधल्या आहेत. त्याविषयी पुन्हा वेगळा लेख होईल.

आपली प्रतिक्रिया द्या