
ममता बॅनर्जींसारख्या एका महिलेपुढे भाजपची पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कशी दाणादाण उडाली आहे, याच्या अनेक रंजक कहाण्या आता पुढे येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेसाठी हाताच्या बोटावर लोक असणे, ही नुकतीच घडलेली गमतीशीर घटना. ममतांची धास्तीच इतकी आहे की, पकडून पकडून भाजपची उमेदवारी गळ्यात मारली जात आहे.
केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या गळ्यात असेच बळेबळे उमेदवारीचे लोढणे घातले गेले आहे. लॉकेट चॅटर्जी व राष्ट्रपती अनागोंदी नियुक्त सदस्य सपन दासगुप्ता, मुपुल राय, जगन्नाथ सरकार, राहुल सिन्हा व असीम सरकार या खासदारांना बळेबळेच भाजपने विधानसभा निवडणूक लढायला भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की, लढायला उमेदवारच नाहीत. त्यामुळे परस्परच उमेदवारी घोषित केली जात आहे, मात्र असा आगाऊपणा भाजपच्या चांगलाच अंगलट आला आहे.
काँग्रेसचे माजी दिवंगत प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांच्या पत्नी शीखा मित्रा यांची भाजपने चौरंगी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत शिखा यांनाही असे काही असेल याची कल्पना नव्हती. टीव्हीवर आपले नाव भाजपच्या उमदेवार यादीत पाहून त्या चक्रावल्याच. त्यांनी तत्काळ उमेदवारीचे खंडन करत आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आणि भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठणकावून सांगितले. शिखा यांच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे भाजप मात्र तोंडावर आपटला.





























































