
>> डॉ. धैर्यशील सावंत, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट
Breast Cancer अर्थात स्तनांचा कर्करोग. महिलांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा विकार. तिच्या सौंदर्याला, आत्मसन्मानाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिच्या शारीरिक आरोग्याला हानी पोहोचविणारा. काय काळजी घ्यायला हवी… प्रत्येक स्त्रीने…
ऑक्टोबर महिना स्तन कर्करोग जागरूकतेसाठी ठरविला आहे. मुळात या विकारासाठी अमुक एक दिवस किंवा महिना ठरविण्यापेक्षा या विकाराचे समूळ उच्चाटन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या विकाराबाबत जागरूकता येणे खूप गरजेचे आहे. आपले शरीर ही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे… आणि तिची काळजी घेणं हे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे. स्त्री सौंदर्यास उठाव देणारा, तिची मातृत्त्वाची आस पूर्ण करणारा तिच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव तिचे स्तन. याच्या सौंदर्याकडे स्त्रिया जेवढे लक्ष देतात तेवढे लक्ष त्याच्या आरोग्याकडेही दिले पाहिजे.
साधारण 35 ते 55 या वयोगटात हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. स्थूलता, स्तनभार जास्त असणे, आहारात तेल-तुपाचे प्रमाण जास्त असणे. संततीप्रतिबंधक गोळ्यांचा दीर्घ वापर, स्तनपान कमी करणे अशांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका संभवू शकतो. स्तनांमधील सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात. पण त्या कळण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच जणी गाठीकडे दुर्लक्ष करतात. हल्ली एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनो मॅमोग्राफी या तपासण्या सर्वमान्य आहेत. यासाठी नियमित व्यायाम करणे, वजन कमी करणे, स्तनपान करणे इत्यादी संरक्षणात्मक उपाय आहेत. हा कर्करोग कोणत्या टप्प्याला आहे. यावर ते अवलंबून आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी आहे. तर तिसऱ्या टप्प्याला ती जास्त असते, मात्र आता रुग्ण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातच जागरुक होतात आणि उपाय सुरू करतात, असे लक्षात आले आहे.
रोगनिदान
स्त्रिया स्तनाची तपासणी करून, गाठ असेल तर कुठे व कशी आहे? गाठ वाढते आहे का?हे पाहू शकतात. जर गाठ जाणवली तर? मॅमोग्राफी करून खात्री करता येईल. तसेच स्कॅनिंग करूनही खात्री करता येते. त्याचप्रमाणे रक्ताच्या काही तपासण्या (तुमोर मार्कर) करून याबद्दल खात्री करून घेता येते. तसेच सोनोग्राफी करूनही खात्री करता येते. स्तनाच्या कर्करोगाची शंका आल्यास डॉक्टर शेवटी पूर्ण खात्री करण्यासाठी बायोप्सी करायचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे स्तनाच्या गाठीचा तुकडा काढून कर्करोगाची खात्री पटल्यास संपूर्ण गाठ काढून टाकली जाते.
मॅमोग्राफी म्हणजे काय?
मॅमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेली एक्स-रे तपासणी. या तपासणीमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर होते. ही तपासणी सुरक्षित असून याचा फारसा त्रास होत नाही. घरात कुणालाही स्तनांचा कर्करोग असल्यास ही तपासणी महत्त्वाची ठरते.
ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी
प्रत्येक वेळी स्तनांच्या कर्करोगाकरिता स्तन काढून टाकणे हा उपाय नाही. हल्ली वेगवेगळ्या नवनवीन उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे स्तनाचं रक्षण होतं. त्याला ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणतात. ही रेडियोथेरपीसह केली तर त्याचा अपेक्षित गुण येऊ शकतात. तसेच संपूर्ण नवीन स्तन तयार करणे अशाही काही नव्या उपचार पद्धती आहेत.
लक्षणे
- स्तनात गाठ येणे.
- स्तनांमध्ये दुखणे
- स्तनाच्या टोकाला खाज सुटणे.
- स्तनांमधून दुधाशिवाय स्त्र्ााव येणे.
- स्तनाच्या टोकावर भेगा पडणे आणि वेदना होणे.
- स्तनागे आत जाणे.
- स्तनांचा आकार बदलणं (साइझ आणि शेप)
- काखेत गाठ येणे.
काय काळजी घ्याल?
- सकस आहार आणि नियमित व्यायाम ही संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
- प्रत्येक महिलेने वयाच्या तिशीनंतर स्तनांची तपासणी करावी.
- स्तनांची स्व तपासणीही घरच्या घरी करता येते. स्वतःच स्वतःची स्तन परीक्षा प्रत्येक स्त्र्ााrने करणे गरजेचे आहे.
- वयाच्या पस्तीशीनंतर मॅमोग्रॅम करावा. दोन मॅमोग्रॅम चाचण्या नॉर्मल असतील तर दर दोन वर्षांनी केल्या तरी चालतात. पण कुटुंबात जर कोणाला हा आजार झाला असेल तर दरवर्षी मॅमोग्राम करावा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित उपचार करावेत.
- शरीरात एस्ट्रोजन वाढवणारे घटक ते टाळावेत. पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये.
- स्थूलपणामुळे इस्ट्रोजन वाढतं, अल्कोहोल कटाक्षाने टाळावे.
- अंतर्वस्त्रांची स्वच्छता खूप महत्त्वाची. रस्त्यावरून अंतर्वस्त्र कधीही विकत घेऊ नयेत.
- दुकानातून घेतानाही ओळखीच्या आणि माहितीच्या ब्रँडची अंतर्वस्त्र घ्यावीत.
- स्वतःचे माप शोधून काढावे.
- हवामानानुसार अंतर्वस्रांचे कापड असावे. उन्हाळ्यात शक्यतो सुती अंतर्वस्त्र वापरावीत.
- वायर्ड ब्रेसियर्स दररोज वापरणे योग्य नव्हे.
- स्तनांचा आकार वाढवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली जाते. ती माहितीतल्या तज्ञ डॉक्टरांकडून आणि फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी.
- स्तनांचा आकार वाढवण्यासाठी नियमित व्यायाम खूप उपयोगी पडू शकतो.
- सर्वसामान्यपणे अंतर्वस्त्रांवर फार पैसे खर्च करू नयेत, असा गैरसमज महिलांमध्ये आढळतो. रोजचे कपडे ज्याप्रमाणे ब्रँडेड वापरण्यावर भर दिला जातो, त्याचप्रमाणे अंतर्वस्त्रही ब्रँडेडच वापरावीत.
- व्यायाम करणाऱ्या किंवा खेळाडू मुलींनी स्पोर्टस् ब्रा घालणे नितांत गरजेचे आहे. कारण घट्टपणा, आवश्यक असणारा आरामदायीपणा रोजची अंतर्वस्त्र पुरवू शकत नाहीत.
- बऱ्याचदा शाळेतल्या मुलींचा स्तनांचा आकार विकसित होऊ लागल्यास त्या पोक काढून चालू लागतात. शरीराची ठेवण योग्य आणि ताठ ठेवणं गरजेचं आहे.
- रात्री झोपताना सैल, सुती कपडे घालावेत. अंतर्वस्त्र घालणे टाळावे.



























































