आता सुरू होतील…फुलपंखी दिवस!

पाऊस भरपूर सुरू झालाय… जवळपास थोडीफार झाडी- जंगल परिसरात राहताना, वावरताना काटेरी सुरवंट दिसू लागतात… अंगावर पडून टोचून आग होत राहते… हीच काटेरी सुरवंटं येणाऱया रंगिबिरंगी फुलपाखरांची वर्दी घेऊन येतात.

रंगीबिरंगी फुलपाखरांच्या मागे मन लहान होऊन धावते. ‘छान किती दिसते फुलपाखरु…’ ही कविता सहज ओठावर येते. दिसायला सुरेख आणि अत्यंत नाजूक अशा रंगीबेरंगी फुलपाखरांचा जन्मकाळही वेधक असतो. अंडी, अंडय़ातून सुरवंट आणि त्या सुरवंटाने विणलेल्या कोशातून हळूवारपणे बाहेर येणारे फुलपाखरु. त्यांचे आयुर्मान कमी असले तरी ते आनंदी आणि स्वच्छंदीपणे जगतात. त्यांच्याविषयी आणखी जाणून घेऊया फुलपाखरु अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांच्याकडून.

वनविभागाच्या कायदेशीर तरतुदीनुसार हिंदुस्थानात आपण बंदिस्त फुलपाखरू उद्यान निर्माण करू शकत नाही. म्हणून आपण खुली उद्याने केली आहेत. आतापर्यंत पाच फुलपाखरू उद्याने तयार केली आहेत. फुलपाखरांचे मुळात आयुर्मान हे पंधरा दिवस ते अडीच महिन्यांपर्यंत असते. त्यांना वाढीसाठी दोन प्रकारच्या वनस्पती लागतात. होस्ट प्लान्ट आणि दुसरे नेक्टरिंग प्लांट. होस्ट म्हणजे खाद्य वनस्पती आणि नेक्टरिंग प्लांट ज्यात मध असतो अशी वनस्पती. एक्झोरा, जमायकन स्पाईक्स, सदाफुली, रिठा या खाद्यवनस्पती आहेत. पावसाळ्यानंतर फुलं यायला लागतात. ही फुलं कोमेजली, गळून गेल्यावर ते दुसऱया प्रकारच्या फुलांकडे वळत असल्याचे दिवाकर ठेंबरे सांगतात.

त्यांच्या जीवनक्रमाविषयी ते सांगतात, ही फुलपाखरे रात्रभर पानाखाली असतात. दिवसभर उडण्यासाठी त्यांना ऊर्जा हवी असते यासाठी सकाळी उठल्यावर सूर्यप्रकाशात पंख उघडून बसतात. त्याचबरोबर ते अत्यंत महत्त्वाचे काम करतात. जमिनीमधील, चिखलामधले क्षार शोषायचे. त्याचा उपयोग त्यांना प्रजननासाठी होतो.

त्यांचं आयुर्मान कमी असतं
फुलपाखरांना आयुर्मान कमी असतं याची दोन-तीन कारणं असतात. एकतर एका प्रकारातून दुसऱया प्रकारात रुपांतरित होणारी ही फुलपाखरं आहेत आणि त्यामुळे त्यांचे आयुर्मान निसर्गतःच कमी असतं. ते पूर्व-पश्चिम फारसे भ्रमण करत नाहीत.

निसर्ग आणि पर्यावरणाला फायदा
फुलपाखरांची मादी ज्यावेळी अंडी घालते त्यावेळेला सगळीच अंडी काही फुलपाखरू निर्माण होण्याच्या क्रियेपर्यंत पोहोचत नाहीत. तर यातल्या ज्या अळ्या असतात त्या बुलबुल, कोतवाल पक्षी, साळुंकी यांच्याकरता अत्यंत प्रथिनयुक्त अन्न असतं. जैवविविधतेच्या साखळीमध्ये फुलपाखरांच्या अळ्या सगळ्यात महत्वाचे अन्न असते. जिथे फुलपाखरू उद्यानं आहेत तिथे या पक्षांचा अधिवासही वाढतो.

फुलपाखरांच्या जाती
फुलपाखरांच्या महाराष्ट्रात एकूण 277 जाती आहेत. या 277 फुलपाखरांचे नुकतेच मराठी नामकरण करण्यात आले आहे. जैवविविधता महामंडळाच्या पुढाकाराने ही मराठी नावे शासनाकडे सुपूर्द केली आहेत .

सामान्य माणसाने काय करायला हवे?
सामान्य माणसांनी घरातील बागेत किंवा आसपासच्या परिसरात त्यांची खाद्य, नेक्टर वनस्पतींची लागवड करायला हवी. कडीपत्ता, लिंबू ही झाडे लावली तर यावर अळ्या येऊन अंडी घालतात. आपल्या घरात जी फळं आणतो आंबा, केळी, संत्रं जास्तच पिकले जाते आणि मग ते आपण फेकून देतो. ते फेकून न देता झाडांच्या ठिकाणी उघडे करून ठेवले तर फुलपाखरं त्यावर बसतात. काही फुलपाखरे झाडांवर अजिबात बसत नाहीत ती किडलेल्या फळांवर येऊन बसतात. त्यांना तो रस खूप आवडतो त्याच्या वासाने ते येऊ शकतात.

तरुणांसाठी आवाहन
हिंदुस्थानात साडेपंधराशे फुलपाखरे आढळतात. पण आपल्याकडे कोणीच त्याचा अभ्यास करत असताना दिसत नाही तर तरुण वर्गाने या विषयाचा अभ्यास करायला हवा. याच्या पद्धतशीर नोंदी करायला हव्यात. एवढेच नाही तर फुलपाखरांच्या बाबतीत जनजागृती फार गरजेची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या