
>> ज्ञानेश्वर गावडे
वाळवंटातील खुरटे गवत, कडू झुडपे व काटेरी पाला, खारट पाणी पिऊन ‘वाळवंटातील जहाज’ म्हणून ओळखणारा एकमेव उंट प्राणी जगत आहे व तग धरून आहे. तीस वर्षांपूर्वी उंटांची संख्या राजस्थान राज्यात जेमतेम दहा लाख होती, त्यामध्ये कमालीची घट होत चालली आहे. म्हणून राजस्थान सरकारने उंटांची कत्तल करण्यावर बंदी घातलेली असून त्यांची देवाणघेवाण, खरेदी-विक्री करण्यास अटकाव केलेला आहे. चिंकारा या प्राण्यासारखीच राज्य सरकारने राजस्थानचा पशू म्हणून जाहीर केलेला आहे. राजस्थानच्या पुष्कर येथील बाजारात उंटाचा मोठा बाजार भरतो. उंटाच्या मांसाला अरबी देशात मोठी मागणी असते. हिंदुस्थानात पशुधनाची जशी अवैध कत्तल चालते तशीच कत्तल तेथील राज्यांच्या भ्रष्ट व स्वार्थामुळे चालत असावी. कारण उंटांची संख्या झपाटय़ाने खाली जात आहे. गाढविणीच्या दुधासारखेच उंटिणीचे दूध लहान मुलांना खूप आरोग्यवर्धक असल्यामुळे त्यांची मागणीही खूप मोठी आहे. एक किलो मांस तयार होण्यासाठी आठ किलो वनस्पतीजन्य अन्न खर्ची पडते. भूगोलात ‘इंडियन डेझर्ट’ म्हणून संबोधले जाते असे साडेअकराशे किलोमीटर लांबीचे मोठे वाळवंट हिंदुस्थान-पाकच्या सीमेमध्ये विस्तारलेले आहे. त्यामुळे तेथील आपली सीमा संरक्षित झालेली आहे. परंतु हिंदुस्थानी सीमा सुरक्षा दलाला सज्ज राहावेच लागते. त्यासाठी टेहळणी करणे चुकत नाही. त्या टेहळणीसाठी उंटासारख्या उंच प्राण्यावरू टेहळणी दूरवर करता येते. वाळवंटातील हालचालीसाठी उंटासारखे सुलभ अन्य साधन नाही. सीमा सुरक्षा दलातही उंटावरील सांडणीस्वारांची विशेष खास तुकडी आहे. परंतु अलीकडच्या काळात उंटांची संख्या रोडावत चालल्यामुळे आपल्या लष्करांची कुचंबणा होत आहे. म्हणून उंटांची घट थांबवा.






























































