लेख : सहस्रचंद्रदर्शन!

964

>> दिलीप जोशी ([email protected])

सहस्रचंद्रदर्शन  ही आपल्या संस्कृतीमध्ये एक छान संकल्पना आहे. वयाची 81 वर्षे पूर्ण होत असताना त्या व्यक्तीने 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतात. म्हणजे आयुष्यात तेवढय़ा पौर्णिमा आलेल्या असतात. आता बालपणी किंवा नंतरही प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र कोणी आवर्जून पाहत नाही. परंतु जीवनकाळात हजार पौर्णिमा येणं म्हणजे दीर्घायुष्याचं लक्षण म्हणून हा सोहळा साजरा केला जातो. अर्थात त्या रात्री वाढदिवस असलेल्या व्यक्तीला चंद्रदर्शन घडवलं जातंच असंही नाही. ‘सोहळा’ फक्त नात्यागोत्याच्या, स्नेही-सहृदांच्या भेटीगाठीचा ठरतो. त्यात ‘चंद्रा’चा संबंध फारच कमी येतो. परंतु मूळ संकल्पना ‘छान’ आहे असं म्हटलं ते एवढय़ासाठीच की, एका वाढदिवसाची सांगड पौर्णिमेच्या चंद्राशी घालण्याची कल्पनाच रम्य आहे म्हणून.

आजच चंद्रग्रहणासह आषाढी पौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणून ती साजरी होतेय. वास्तविक आषाढी पौर्णिमेचा चंद्र बहुधा ढगाआडच दडलेला असतो. त्याचं दर्शन होणं दुरापास्त आहे. परंतु आजच किंवा यानंतर काही दिवसांत म्हणजे पुढच्या पौर्णिमेपूर्वी ज्यांच्या वयाला 81 वर्षे पूर्ण होतात त्यांच्यासाठी आजची रात्र सहस्रचंद्रदर्शनाची! त्याचं गणित म्हणजे, सौर महिना फेब्रुवारीचा अपवाद वगळता तिशी किंवा एकतिशी असतो. चांद्रमास मात्र 29.53 दिवसांचा असल्याने, आपल्या जन्मवर्षापासून त्यामध्ये एकोणतीस हजार पाचशे तीस दिवस मिळवले की एक्याऐंशी वर्षे होतात. आता वाढदिवस या काळाच्या थोडा पुढे असेल तर पूर्वीची पौर्णिमा हजारावा चंद्र दाखवते.

हे सगळं आजच्या पौर्णिमेला आठवण्याचं कारण म्हणजे ज्या चंद्राशी माणसाने असं भावनिक नातं जोडलंय तो पादाक्रांत झाल्याला चारच दिवसांनी पन्नास वर्षे पूर्ण होतायत. 20 जुलै 1969 पासून माणसाची चंद्राकडे पाहण्याची दृष्टी बदललीय. पूर्वी तो फक्त काव्यात, प्रेमात, विरहात वगैरे होता. त्याच्या शीतल चांदण्याचा आस्वाद घेण्याच्या पौर्णिमा काही कमी नाहीत. कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमेच्या रात्री तर उत्सवी वातावरण असतं. आजही चंद्राबद्दलची ती भावना कमी झालेली नाही आणि होणारही नाही. या सगळय़ा सोहळय़ाला थोडी वैज्ञानिकतेची जोड देता आली तर? माझ्या वडिलांना 2009 मध्ये 81 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही त्यांना दुर्बिणीतून चंद्रदर्शन घडवून वेगळंच ‘सहस्रचंद्र दर्शन’ साजरं केलं होतं. त्याला एरवीच्या सोहळय़ातही स्थान देता येईल. जमलेल्या मंडळींना दुर्बिणीतून दिसणारा चंद्र बघायला नक्कीच आवडेल. याच अनुषंगाने चांद्रविषयक एखादं छोटंसं प्रेझेन्टेशन कुणी केलं तर ते अधिकच चांगलं, त्यातून चंद्राची अगदी ‘सहस्र’ नाही, पण किमान शंभर रूपं आणि इतर अनेक गोष्टींबद्दलची माहिती देता येईल.

चंद्र ते पृथ्वी हे अंतर सरासरी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आहे. चंद्रावर पृथ्वीसारखं वातावरणच नाही. गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक-षष्ठांश आहे. चंद्र आकाराने पृथ्वीच्या एक चतुर्थांश आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्या कक्षामध्ये सवापाच अंशाचा कोन आहे. त्यांच्या काल्पनिक छेदनबिंदूना राहू-केतू म्हणतात. चंद्र, सूर्य, पृथ्वी यांचं अतूट नातं असून चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. मात्र तो मुख्यत्वे सूर्याभोवतीच फिरत असल्याने या त्रिकुटातून पृथ्वी वजा केली तरी चंद्र थोडा कक्षाबदल करून सूर्याभोवती फिरतच राहील. चंद्र-सूर्याचा आकार आपल्याला सारखाच दिसतो याचं कारण म्हणजे 400 हा जादुई आकडा. चंद्र ते पृथ्वी अंतरापेक्षा सूर्य ते पृथ्वी हे अंतर 400 पट दूर आहे. तसंच चंद्रापेक्षा सूर्याचा आकार 400 पटींनी मोठा आहे. परिणामी आपल्याला चंद्रबिंबाने ‘झाकलेला’ सूर्य एखाद्या अमावास्येला दिसतो आणि आपण त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतो. चंद्राने सूर्यबिंबाला बरोबर मधोमध ग्रहण लावले की आपल्याला सूर्याचे प्रभामंडळ, सौरज्वाला दिसतात. याच ‘खग्रास’ काळात चंद्रावरील उंचसखल भागातून जो लाल मण्यांसारखा प्रकाश दिसतो त्याला बेलीज बीडस् म्हणतात. चंद्र रुपेरी दिसतो तो सूर्याच्या परावर्तित प्रकाशामुळे. पौर्णिमेच्या चंद्रावरून होणारं सौर प्रकाशाचं परावर्तन (अल्बिडो) 12 टक्के इतकं असतं. त्यामुळे निरभ्र पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात प्रवास करता येतो. चंद्राचा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग सारखाच असल्याने पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसते. अमावास्येला चंद्र सूर्याबरोबर उगवतो आणि मावळतो. त्यामुळे तो रात्री आकाशात दिसत नाही. चंद्रामुळे पृथ्वीवरच्या समुद्राला भरती-ओहोटी येते.

सहज लिहिता लिहिता चंद्राविषयीची एवढी माहिती आठवली. चांद्रमोहिमा आणि इतर गोष्टींचा विचार केला तर ‘सहस्र’ आकडा गाठणं अशक्य नाही. नव्या जमान्यात, जुन्यातलं सोनं घेऊन एक चांगली सांगड घातली तर असंही ‘सहस्रचंद्रदर्शन’ घडवता येईल.

त्यानंतर काव्यमय पद्धतीने चंद्राची गाणी म्हणायला किंवा तसा कार्यक्रम ठेवायला काहीच हरकत नाही. नुसत्या चंद्र या विषयावरचीच मराठी-हिंदी सिनेगीतं, भावगीतं ‘सहस्र’ असतील. हे वर्ष म्हणजे चांद्रविजयाचा सुवर्णमहोत्सव. आणखी एकतीस वर्षांनी 20 जुलै 1969 चीसुद्धा ‘सहस्रचंद्र’ दर्शनाची तारीख येईल. तोपर्यंत माणूस कदाचित चंद्रावरच राहायला गेला असेल आणि कालांतराने तिथून ‘सहस्र’ पृथ्वी दर्शन करायचं ठरवलं तर ते मात्र शक्य नाही. कारण चंद्रावर आपण ज्या ठिकाणी असू तिथेच रात्रीच्या वेळी आपल्याला पृथ्वी दिसत राहील!

आपली प्रतिक्रिया द्या