Women’s Day- ‘चित्रांगना’ : चित्रकर्तींची अभिव्यक्ती जपणारे व्यासपीठ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रमोद पाटील

हिंदुस्थानात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रकला या क्षेत्रातही पुरुषप्रधान संस्कृतीचा ठसा प्रामुख्याने दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी पुरुष चित्रकारांच्या चित्रांची प्रदर्शने, उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुष चित्रकारांचा सहभाग यामध्ये स्त्री चित्रकारांचा अपवादात्मक सहभाग आढळून येत असे. महिला चित्रकारांचा आपल्या चित्रांबाबत अभिव्यक्त न होण्याच्या कारणांचा मागोवा घेतला एका चित्रकर्तीने. तिचे नाव प्रिया प्रमोद पाटील. अर्थात माझ्या बायकोने.

महिला चित्रकारांच्या अनेक समस्यांपैकी एक प्रमुख समस्या म्हणजे संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेली त्यांची चित्रकला. काहीजणी चित्रकला आपला छंद म्हणून जोपासतात. काहीजणी शिक्षण, व्यवसाय आणि कारकिर्दीचा भाग म्हणून चित्रकला हा विषय निवडतात. लग्नानंतर संसाराच्या रहाटगाड्यात कलेकडे दुर्लक्ष होते आणि चित्रकला दूर जाते. कित्येकदा हा खर्चिक प्रकार असल्याने आणि चित्रकलेबद्दल समाजामध्ये अनास्था असल्यामुळे काही जणी आपल्या या कलेला वेसण घालताना दिसून येतात. या क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांना येणाऱ्या असंख्य अडचणी अनुभवलेल्या आणि स्वत: चित्रकार असलेल्या प्रिया पाटील यांनी महिला चित्रकारांच्या अडचणींवर गांभीर्याने विचार केला आणि एक चळवळ जन्माला आली `चित्रांगना’!

महिला चित्रकारांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, महिला चित्रकारांनी आपल्या चित्रातील उत्कट भावना व्यक्त कराव्यात, आपली कला आणि त्यातील अभिव्यक्ती समाजासमोर यावी या हेतूने प्रिया पाटील यांनी चित्रांगना ही चळवळ सुरू केली. यासाठी त्यांनी समाज माध्यमात प्रभावी असणाऱ्या `फेसबुक’चा वापर केला. फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील महिला चित्रकारांची माहिती आणि त्यांच्या कलेतील सद्यस्थितीची माहिती संकलित केली. नवोदित आणि आपला छंद जोपासत उत्तम काम करणाऱ्या महिला चित्रकारांना एकत्रित केले आणि ‘चित्रांगना’च्या पहिल्या चित्रप्रदर्शनाची घोषणा केली. कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता कलेसाठी समर्पित चळवळ पुढे न्यावी या हेतूने चित्रांगनाचे पहिले प्रदर्शन मुंबईतील बोरिवलीस्थित प्रबोधनकार ठाकरे कला दालनात दिनांक 21 ते 24 एप्रिल 2016 कालावधीत संपन्न झाले.

या चित्रप्रदर्शनात कलेचे शिक्षण घेतलेल्या महिला चित्रकार होत्याच, पण आपला छंद जोपासत आपली कला वृद्धिंगत केलेल्या इंजिनीयर आणि उच्च शिक्षित चित्रकार महिलादेखील होत्या. आयुष्यात प्रथमच आपली कला जगासमोर मांडताना तसेच आपली कलानिर्मिती प्रदर्शित होताना जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत ते अवर्णनीय होते. या सोहळ्याला प्रसिद्ध कलाकार अमृता सुभाष, सुकन्या कुलकर्णी आणि नेहरू सेन्टर आर्ट गॅलरीच्या संचालिका श्रीमती नीना रेगे उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे कित्येक वर्षे आपला चित्रकला छंद जोपासत असताना कधी आपले चित्र प्रदर्शनात प्रदर्शित होईल ही इच्छा असणाऱ्या चित्रकारांसाठी ही पर्वणीच होती. या प्रदर्शन कालावधीत प्रथितयश कलाकारांची प्रात्यक्षिके ही कलाकारांसाठी शैक्षणिक उजळणी होती. पहिल्याच पर्वाला असंख्य कलारसिकांनी भेट देऊन उपक्रमांचे आणि चित्रांगनांच्या कामाचे कौतुक केले.

या यशानंतर महिला चित्रकारांचा ‘चित्रांगना’कडे ओघ वाढू लागला. याच उत्साहात चित्रांगनाचं दुसरं पुष्प जाहीर झाले. अनेक नवीन महिला कलाकार या चळवळीत सहभागी झाल्या. पुन्हा ही चळवळ त्याच जोमात वाढू लागली आणि चित्रांगनाचे दुसरे प्रदर्शन मुंबईतील बोरिवलीस्थित प्रबोधनकार ठाकरे कला दालनात दिनांक 23 ते 26 डिसेंबर 2017 कालावधीत संपन्न झाले. या प्रदर्शनाला प्रसिद्ध कलाकार मेधा मांजरेकर आणि नेहरू सेन्टर आर्ट गॅलरीच्या संचालिका श्रीमती नीना रेगे उपस्थित होत्या. चित्रांगनाच्या या पर्वात एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली ती म्हणजे चित्रांगनाचा हेतू आणि महिला चित्रकारांच्या या हक्काच्या व्यासपीठाला पुढील पर्वासाठी नेहरू आर्ट गॅलरीत स्थान दिले जाईल, अशी घोषणा श्रीमती नीना रेगे यांनी केली आणि मुंबईतील अग्रगणी कला दालनात चित्रांगनाला स्थान मिळणार या बातमीने सर्व महिला चित्रकार सुखावल्या. चित्रांगनाच्या नि:स्वार्थ कामाची ही पोचपावती होती. पुन्हा एकदा चित्ररसिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली. कलाकाराचे चित्र कुणी विकत घेणे ही कलाकारासाठी आनंदाची गोष्ट असते. दुसऱ्या पर्वात अनेक चित्रांगनांच्या चित्रांची विक्री झाली हे विशेष.

यंदाचे हे चित्रांगनाचे तिसरे पुष्प. आज चित्रांगना परिवार हा दोनशेपेक्षा जास्त महिला चित्रकारांचा झालेला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 05 ते 11 मार्च 2019 या कालावधीत चित्रांगनाचे चित्रप्रदर्शन हे नेहरू सेन्टर कला दालनात साकारत आहे. या प्रदर्शनात अगदी व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला चित्रकारांचा सहभाग आहे. या चित्र प्रदर्शनात सलग सहा दिवस अनेक मान्यवर आणि प्रथितयश कलाकारांची प्रात्यक्षिके आहेत. विविध माध्यमे आणि शिल्पकला याचा समावेश यात करण्यात आला आहे.

आपल्या कौटुंबिक जीवनात गृहिणी, उद्योग आणि व्यवसायात उद्योजिका म्हणून यशस्वी होऊनही आपली कला आणि आपला छंद जोपासणाऱ्या चित्रांगना हे चित्रांगना कला चळवळीचे यश आहे. चित्रांगनाच्या या चित्रमय प्रवासात एक विशेष बाब अशी आहे की यात काही अशा चित्रांगना सहभागी आहेत ज्यांनी आपल्या दुर्धर आजारावर मात करत आपल्या कलेची जपवणूक केलेली आहे. यात अशी एक चित्रांगना आहे जिने गेली पस्तीस वर्ष कलेची साधना केली कलेचे अध्यापन केले पण कधीही आपले चित्र प्रदर्शित केले नाही ,तिचे चित्र पहिल्यांदा प्रदर्शित होत आहे, या आणि अशा असंख्य आठवणींनीं नटलेली चित्रांगना ही चित्र चळवळ आज एक मूर्त रूप घेत आहे. ज्या उद्देशाने या चळवळीची सुरुवात झाली त्या मागची भावना ही या कवितेच्या ओळीत समर्पित आहे.
‘तू एक चित्रांगना…
एक कलासक्त स्त्री,
आपले मन,आपली भावना, आपले प्रेम,
आपली संवेदना,आपला स्वर,
आपला क्रोध, आपली अगतिकता,
आपला हर्ष, आपला उल्हास,
आपली प्रेरणा अन् आपला विश्वास,
कुंचल्यातून व्यक्त करणारी ललना,
तू एक चित्रांगना…..’
तुझी कलेशी समर्पित भावना ,अखंड निष्ठा तसेच तुझ्या या अमर्त्य, निरंतर कलासाधनेला आमचा सलाम!