लेख – हडे कोरोना नाय, मुंबईक आसा

>>सुरेंद्र मुळीक

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वात सुरक्षित असणाऱया किंवा समजल्या जाणाऱया गोवा राज्याला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दुसऱया लाटेत जोरदार फटका बसला. लॉक डाऊन हा अंतिम पर्याय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगूनही गोवा राज्याला चार दिवसांचा लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने स्वतःहून पुढाकार घेत दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली. या सगळ्या घटना पाहता हडे कोरोना नाय, मुंबईक आसाअसे म्हणणाऱया किंवा सांगणाऱया गोवेकरांचा आणि सिंधुदुर्गवासीयांचा समज चुकीचा निघाला असे आता म्हणावयास हवे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा. अवघी 8 लाख 59 हजार लोकसंख्या आणि 5 हजार 207 चौ.कि.मी. असल्याने या जिल्ह्यात तशी दाटीवाटीने असलेली वस्ती कमीच. तरीही कोरोनाच्या दुसऱया लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार फटका बसला. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे साडेतीन हजार रुग्ण ऑक्टिव्ह आहेत व आतापर्यंत 10 हजार 523 जणांना याची बाधा झाली. ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवातीलाच ग्रीन झोनमध्ये गणना झाली त्यानंतर सर्वात सुरक्षित जिल्हा म्हणूनही नाव आले त्याच जिल्ह्यात आज कोरोनाचे रुग्ण एवढे वाढीस का लागले याचे चिंतन जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आणि स्थानिक जनतेने निश्चितच करावयास हवे. अत्यंत शिस्तबद्ध असलेल्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच जोरदार प्रयत्न केले होते आणि आजही त्या करीत आहेत. पण त्यांच्या या प्रयत्नांना जिल्हा आरोग्य विभागाने आणि ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने साथ द्यावयास हवी होती ती कुठेतरी कमी पडली. परिणामी दुसऱया लाटेचा फटका सिंधुदुर्गाला बसला.

पहिल्या लाटेत संपूर्ण देश लॉक डाऊनमध्ये होता. त्या काळात जिल्ह्यात येणाऱयांना 14 दिवसांचे सक्तीने क्वारंटाईन केले जात होते. त्या वेळी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत रस्ते मार्गाने येणाऱयांची संख्या जवळपास सवा लाख होती व या सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या वेळी रेल्वे सेवा बंद असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने चोख काम केले होते अर्थात तेही कोकणातून येणाऱया खारेपाटण जिल्ह्याच्या सीमेवरच. पण… कोल्हापुरातून येणाऱया सर्व सीमेवर आरोग्य विभाग ढिला होता. त्या वेळीही तेथूनच कोरोनाचा शिरकाव झाला होता. मीही रस्ते मार्गाने माझ्या सावंतवाडी येथील मूळ गावी गेलो होतो. त्या वेळी खारेपाटण सीमेवर ज्या पद्धतीने चौकशी केली जात होती, ज्या पद्धतीने उभे केले जात होते, ज्या पद्धतीने हातावर स्टॅम्प लावले जात होते, ज्या पद्धतीने कागदपत्रे तयार केली जात होती, ज्या पद्धतीने ग्रामपंचायत वागणूक देत होती, ज्या पद्धतीने ग्रामस्थ मुंबईकरांना पाहून पळत होते. याचा सारा अनुभव माझ्यासारख्या असंख्य मुंबईकर चाकरमान्यांनी घेतला होता. ‘हडे कोरोना नाय, मुंबईक आसा’ असे वाक्य त्या वेळी सारे जण बोलत होते. या समजुतीतच येथील जनता राहिली आणि मास्क न लावता, सुरक्षा न घेता बिनबोभाटपणे फिरू लागली. मग तो गणपतीचा उत्सव असो, जत्रा असो किंवा लग्न कार्य असो. बिनधास्तपणे मास्क न लावता वावरत होती. अगदी फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या एका लग्नाला मी उपस्थित होतो. हजारावर माणसे जमली होती, पण माझ्याव्यतिरिक्त एकानेही मास्क लावलेला मला दिसला नाही. त्याच वेळी मुंबईत दुसऱया लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू होती. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांत गांभीर्य तसे दिसले नाही. याचे कारण ‘हडे कोरोना नाय, मुंबईक आसा’ हाच त्यांच्यात असलेला समज आणि याच समजुतीमुळे येथील ग्रामस्थ गाफील राहिले आणि कोरोनाच्या दुसऱया लाटेत सापडले.

मुळात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तितकीशी पुरेशी नाही. व्हेंटीलेटरची कमतरता आहेच. वीज प्रवाह सातत्याने खंडित होतो. खासगी रुग्णालये पुरेशी नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांची संख्याही अपुरी आहे. तसे पहिले तर सिंधुदुर्गवासीयांना या आरोग्य विभागाची यापूर्वी तशी फारशी गरज लागली नाही. सर्दी-पडसे यापुरतीच येथील आरोग्य सेवेची गरज भासत होती. कारण सिंधुदुर्गवासीयांचा थेट मुंबईशी संबंध असल्याने मोठय़ा आजारासाठी ते मुंबईच गाठत होते. पण कोरोनामुळे सिंधुदुर्गवासीयांना जिल्हा आरोग्य यंत्रणेवर अवलंबून राहावे लागले. येथेच ही यंत्रणा कोलमडली. पहिली लाट आल्यानंतर येणाऱया दुसऱया लाटेसाठी काय तयारी करावी ती आरोग्य विभागाने केली नाही. कारण ‘हडे कोरोना नाय, मुंबईक आसा’ याच समजुतीत आरोग्य विभागही गाफील राहिला आणि जे व्हायचे ते झाले. दुसरी लाट थेट जिल्ह्यात घुसली. इतकेच नाही तर गावागावात पोहोचली. दर दिवशी शंभर रुग्ण सापडू लागले आणि काल 4 मे रोजी तब्बल 573 रुग्ण सापडले. यंदा मुंबईकरांनी गावात येण्यासाठी तशी रांगही लावली नाही. रेल्वे सेवाही सुरू आहेत; पण तेथेही फारशी गर्दी नाही. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पसरला. याची मुख्य दोन कारणे आहेत. एक म्हणजे कोरोनाबाबत ग्रामस्थांनी सुरुवातीपासून जी काळजी घ्यावयास हवी होती ती घेतली नाही. त्यातच जिल्हा कोविड रुग्णालयात कर्मचाऱयांची कमतरता झाल्याने रुग्णाचे नातेवाईकच रुग्णाची सेवा करण्यासाठी तिथे थांबू लागले. याबाबत कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरोमा ट्रस्टचे विश्वस्त दयानंद चौधरी यांनी जिल्हा कोविड रुग्णालयातील या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकली. ही सारी छायाचित्रे पाहता जिल्ह्यात कोरोना कसा पसरला हे समजू शकेल. दुसरे कारण म्हणजे पुढचे दार ठेवले झाकून आणि मागचे ठेवले उघडे, म्हणजेच मुंबईवरून जिल्ह्यात येण्यास बंदी. त्यासाठी ई-पास पाहिजे, आरटीपीसीआरचा रिपोर्ट पाहिजे आणि गोवा राज्यातून येणाऱयांना दरवाजे सताड उघडे. येथेच कोरोना सुरक्षिततेचे गणित चुकले.

गोव्याची कोरोनाबाबत सद्यस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. गोव्यात अतिशय गंभीर अशी स्थिती आहे. केवळ 15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्याला कोरोनाने विळखा घातला आहे. मागील आठवडय़ात गोव्याने चार दिवसांचा लॉक डाऊन घेतला. त्यानंतर राज्यात लॉक डाऊन पुकारू नये अशी भूमिका सरकारने घेतली. पण कोरोनाचा प्रचंड फैलाव झाल्याने गोमंतकीयांमध्ये धास्ती वाढली. परिणामी सरकारची सूचना झुगारून डिचोली, साकळी, फोंडा पालिका आणि जवळपास 20 ग्रामपंचायतींनी आपापल्या भागात स्वयंस्फूर्तीने लॉक डाऊन जाहीर केले. यामुळे 40 टक्के गोवा सध्या लॉकडाऊन झाले आहे. इवल्याशा गोव्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यास सरकार कमी पडले हे रुग्णांची आकडेवारी पहाता म्हणावे लागेल. मागील वर्षापासून आजपर्यंत गोव्यात 1 लाख 102 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. 15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्याला हे निश्चितच भूषणावह नाही. इतके असूनही आपल्या राज्यात काहीच नाही झाले अशाच थाटात गोव्याचे मुख्यमंत्री सावंत वावरत आहेत. पर्यटकांना गोव्यात मुक्त फिरण्यास देत आहेत. गोव्याची जरी अर्थव्यवस्था पर्यटकांवर अवलंबून असली तरी लोकांचा जीव हा महत्त्वाचा आहे याचे भान सरकार विसरले. यामुळेच गोव्यात कोरोनाचा फैलाव वेगाने झालाच. पण गोव्यात आलेल्या पर्यटकांनी आपल्यासोबत इतर राज्यातही कोरोनाचा फैलाव केला असे म्हटल्यास हे चुकीचे ठरणार नाही. आज गोवा जबरदस्त होरपळत आहे. मागील चार दिवसांपासून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून दर दिवशी 50हून अधिक जण कोरोनाचे बळी ठरत आहेत. आतापर्यंत गोव्यात 1 हजार 372 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. 4 मे रोजी मृत्यू पावलेल्यांमध्ये 38 वर्षांखालील तिघांचा समावेश असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दर दिवशी 3 हजारच्या घरात रुग्ण सापडत आहेत. चाचण्यांमागे पॉझिटिव्हचे प्रमाण तब्बल 39 टक्के आहे. गोव्याची ही गंभीर स्थिती पहाता सिंधुदुर्गाला दुसऱया लाटेचा फटका का बसला हे वेगळे असे काही सांगण्याची गरज नाही. कारण सिंधुदुर्गातील हजारो माणसे केवळ रोजगारासाठी गोव्यात जातात असे नाही तर सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील जनतेचा गोव्याशी रोटी-बेटीचा थेट सबंध आहे. त्यामुळे या सीमा सताड उघडय़ा ठेवल्या गेल्यात आणि नेहमीप्रमाणे गाडय़ांची व माणसांची ये–जा सुरू होती. वास्तविक कोरोनाचा विळखा गोव्यात घट्ट होत असताना त्यातून आपली सुटका करण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबवायला हवी होती. पण गोमांतकीयांच्या स्वभावानुसार लसीकरण मोहीमही सुशेगाद सुरू आहे. गोव्यात आतापर्यंत केवळ 3 लाख 59 हजार 434 जणांचे लसीकरण झाले आणि दुसरा डोस केवळ 76 हजार 517 जणांनीच घेतला आहे. तरीही गोव्याचे मुख्यमंत्री म्हणतील, ‘भिवपाचे ना!’ कदाचित त्यांचाही समज असेल की ‘हडे करोना नाय, मुंबईक आसा.’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या