मुद्दा – ‘कोरोना’च्या सावटाखाली उद्याचा काळ…

>> अनंत बोरसे

जगभर थैमान घालणाऱया कोरोनाच्या जागतिक संकटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरला चीनमध्ये सुरुवात झाली आणि बघता बघता या संकटाने संपूर्ण जगासमोरच मोठे आव्हान निर्माण केले आहे. आपल्या देशात या संकटाची चाहूल लागली ती फेब्रुवारीमध्ये आणि 20 मार्चला देशभर जनता कर्फ्यू पाळल्यानंतर 24 मार्चपासून संपूर्ण देश लॉक डाऊन केला गेला. मात्र कोरोनाबरोबर लढताना देशासमोर मोठेच आव्हान उभे राहिले ते आर्थिक संकट आणि बेरोजगारीचे. सुरुवातीला काही दिवस जनतेने उत्स्फूर्तपणे साथ दिली. काही मोजक्याच लोकांमुळे संपूर्ण लॉक डाऊनमध्ये अडथळे उभे राहिले. परिणामी सुरुवातीला 21 दिवसांत कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता, मात्र तसे काही झाले नाही. दिवसेंदिवस घरातच राहून जनतेमध्ये अस्वस्थता वाढू लागली. आणि ते साहजिकच होते. अनेक खासगी नोकऱया, लहान-मोठे व्यावसायिक, उद्योजक, हातावर पोट असणारे, विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय अशा साऱया वर्गांवर मोठा विपरीत परिणाम होऊ लागला. म्हणूनच या अस्वस्थतेची दखल घेऊन चार लॉक डाऊन झाल्यानंतर 3 जूनपासून अनलॉकला सुरुवात होऊन हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न होऊ लागला. अजूनही जनतेचे जनजीवन विस्कळीतच आहे. अगोदरच आर्थिक मंदी, महागाईचा, बेरोजगारी याचा सामना करावा लागणाऱया जनतेच्या विवंचनेत कोरोना संकटाने तर अपरिमित हानी करून ठेवली आहे. आहे त्यांचे रोजगार गेले, तर नवीन नोकरी मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खिशातील पैसा आणि संयम दोन्हीही संपल्याने विवंचना वाढली आहे. भवितव्याबाबत काहीच स्पष्ट आशा नाही. कोरोना संकट कधी आटोक्यात येईल याचा साधा अंदाज बांधणेदेखील अवघड आहे, सारे जग अंधारात चाचपडत असल्याचेच दिसत आहे. कोरोनावरील लस हाच काय तो थोडासा आशेचा किरण दिसतो. मात्र याबाबत अजूनही ‘दिल्ली बहोत दूर है’अशीच स्थिती आहे.

देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या ही सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. आजवरचे सगळय़ा धर्मीयांचे सणवार, उत्सव, धार्मिक कार्यक्रम यावर कोरोनाचे सावट राहिले. आपला 74 वा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा झाला, मात्र तो देखील कोरोना संकटाच्या सावटाखाली.

भविष्यात कधी ना कधी कोरोनाचे संकट जाईलही मात्र त्यानंतरचा काळ हा आपली सर्वांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. पंतप्रधान म्हणत असलेल्या नवभारत निर्माणाचे मोठे आव्हान आपल्यापुढे असणार आहे. केंद्र वा राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा, समाजातील सर्व घटक हे परिस्थिती सावरण्याचा गंभीरपणे प्रयत्न करीत आहेत. मात्र खरी अडचण आहे ती पैशाची. आजच्या घडीला एकीकडे सरकारचे उत्पन्न घटले आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारवर म्हणजेच पर्यायाने देशावर जवळपास 90 लाख कोटी रुपयांचे, तर महाराष्ट्रावर जवळपास 6 लाख कोटींचे कर्ज आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की, सरकार, सामान्य जनता, शेतकरी, मध्यमवर्गीय, एवढेच काय तर विद्यार्थी हे सगळेच कर्जबाजारी आहेत. एकीकडे सामान्यांची आवक घटली आहे, तर महागाई वाढत आहे, त्यातच महावितरण वीज कंपनीने अवाचेसवा वीज बिले ग्राहकांच्या माथी मारून मोठाच झटका ग्राहकांना दिला. वीज बिल भरू शकत नसल्यानेदेखील आत्महत्या होऊ लागल्या आहेत. बेरोजगारीने तर नवीन उच्चांक गाठला आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या वाढल्या आहेत. यातून दिलासा मिळेल अशी नजीकच्या काळात शक्यतादेखील वाटत नाही. पंतप्रधानांनी काही महिन्यांपूर्वी 20 लाख कोटींचे विशेष महापॅकेज जाहीर केले, मात्र अजूनही त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसत नाहीत.

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅंकेने सरकारकडे मोठा निधी जमा केला. मात्र आरबीआयची किती गंगाजळी खाली करणार यालादेखील मर्यादा आहे. नुकतेच ‘सीएमआयई’च्या पाहणी अहवालानुसार जुलै महिन्यात 50 लाख लोक बेरोजगार झाले. कोरोना काळात आजपर्यंत जवळपास दोन कोटी लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत, आणि भविष्यात यात भरच पडणार आहे. या सगळय़ाचा सामाजिक जीवनात नक्कीच विपरीत परिणाम होणार आहे. एकूणच कोरोनाचे सावट आणि भवितव्याची चिंता सध्या तरी तुमची-आमची कसोटी पाहत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या