
>> नागोराव सा. येवतीकर
डॉक्टर हा देवानंतरचा देव आहे, असे म्हटले जाते. कारण मनुष्य आजारी पडला किंवा त्याला काही दुखापत झाली तर तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याच्यावर योग्य उपचार करून बरा करतो. काही वेळा तर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे कामदेखील डॉक्टर करतात. देवानंतर लोकांचा जर कोणावर विश्वास असेल तर तो आहे डॉक्टर. पण कधी कधी डॉक्टरदेखील सर्व उपचार केल्यावर आता सर्व काही त्याच्या हाती आहे असे म्हणतो त्या वेळी तो स्वतः देवाला विनवणी करीत असेल की, देवा याला वाचव, ते आता तुझ्या हाती देतो. रुग्णाला वाचविणे हे प्रत्येक डॉक्टरचे पहिले आद्यकर्तव्य आहे. म्हणून कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाच्या जिवाशी सहसा खेळत नाही, पण काही डॉक्टर यास अपवाद असतात. ते फक्त पैसा कमविण्यासाठी डॉक्टर होतात. त्यांना रुग्णांच्या परिस्थितीशी काही देणे घेणे नसते.
डॉक्टर ही पदवी मिळविण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागले त्या सर्व रकमेची वसुली यातून करावी या उद्देशाने ही मंडळी वागताना दिसून येत आहेत. आज वाचण्यात आलेली एक बातमी अशीच मन सुन्न करणारी आहे. पैशाच्या हव्यासापोटी काही डॉक्टर गर्भवती महिलेची सिझेरियन करीत आहेत. काही डॉक्टर लोकांचा हा व्यवसाय झाला आहे की, दिवस भरण्यापूर्वी गर्भवती महिलेची सिझेरियन करायचे आणि अर्भकाची चांगली वाढ झाली नाही म्हणून त्याला ‘इन्क्युबेटर’मध्ये ठेवायचे. त्या डॉक्टरला त्या ऑक्सिजन टीमकडून काही ठरावीक रक्कम मिळत असेल म्हणून तर ते 15 ते 20 दिवसांपूर्वीच सिझेरियन करतात. आमच्या ओळखीच्या एका गरीब कुटुंबातील महिला पोट दुखत आहे म्हणून दवाखान्यात गेली. ती साडेआठ महिन्यांची गर्भवती असताना तिचे सिझेरियन करून बाळ बाहेर काढले. त्या बाळाची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे ‘इन्क्युबेटर’मध्ये ठेवले. रोज पाच हजार रुपयांप्रमाणे 20 दिवसांत एक लाख रुपयांचे बिल करण्यात आले. बिचार्या त्या गरीब जोडप्याला आपल्या अंगावरील सोने विकून हे बिल अदा करावे लागले. अशा डॉक्टरांना देव म्हणायचे की दानव हेच कळत नाही.
काही वर्षांपूर्वी डॉ. सुदाम मुंडे यांनी असाच काही गैरप्रकार करून लाखोंची माया मिळविली, पण कित्येक भ्रूणहत्या त्यांनी केल्या. पण अखेर सत्य बाहेर आले त्या वेळी समाजातील सर्वच लोकांनी त्या डॉक्टरचा निषेध केला. आज डॉक्टर लोकांची बिल्डिंग पाहिली की लक्षात येते की, हे लोकांना कशाप्रकारे लुटत आहेत. डॉक्टरकी ही एक सेवा राहिली नसून भरपूर पैसे कामविण्याचा एक व्यवसाय बनला आहे. त्यामुळे जो तो डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉक्टर कशासाठी व्हायचे तर फक्त बक्कळ पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट दिसून येत आहे. डॉक्टर लोकांची फीस याविषयी कोठेही काही नोंद अथवा त्याविषयी काही कायदा नाही. एका दिवसात किती रुग्णांनी त्यांच्याजवळ नोंदणी केली? किती तपासले गेले? त्यांची किती रक्कम डॉक्टराकडे जमा झाली आणि यातून किती पैसा इन्कम टॅक्सच्या स्वरूपात सरकारकडे भरली, याचे कुठेही नोंद नसते. कोणत्याही दुकानात सामान खरेदी केल्यावर त्याच्याकडे रीतसर पावती मागितली जाते तशी रीतसर नोंदणी फीची पावती डॉक्टराकडे का नसते? यावर कोणीही आजपर्यंत बोललेले पाहिले नाही. सरळ सरळ हा व्यवसाय गैरव्यवहार दिसतो. छोट्या शहरात शंभर रुपये तर मोठ्या शहरात तीनशे ते पाचशे रुपये फी असते डॉक्टर मंडळींची.
जनता डॉक्टरांना देव मानते त्यामुळे त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन तसे कार्य करायला हवे. सरकारी दवाखान्यात अगदी मोफत तपासणी होते, मात्र त्या दवाखान्यात जाण्यास कोणी तयारच नसतो. रुग्णांना येथे चांगली वागणूक मिळत नाही म्हणून सहसा जनता येथे जात नाही. खासगी दवाखान्यात रुग्णाच्या साध्या तपासण्यासाठी जास्तीची रक्कम ठेवल्यामुळे बरीच मंडळी त्या डॉक्टरकडे जाणे टाळतात. आजार अंगावर काढतात म्हणून परत एकदा सांगावेसे वाटते की, डॉक्टर मंडळींनी देव होण्याचा प्रयत्न करावा. पैसे तर आपणास आपोआप मिळणारच आहेत. पैशाच्या हव्यासापोटी जनसामान्य लोकांचे हाल करू नका. आज कित्येक लोकांना दवाखाना नशिबात नसते. दवाखान्यात डॉक्टरच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो. आजही समाजात काही चांगले डॉक्टर आहेत जे की हे व्यवसाय नाही तर समाजसेवा म्हणून करतात. डॉक्टर लोकांनी खास करून ग्रामीण भागात फिरून सेवा दिल्यास त्यांच्या शिक्षणाचे खरे सार्थक ठरेल. सर्वच डॉक्टर भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात असे नाही, पण काहींमुळे सर्वच बदनाम होतात.
































































