वो जो हममे तुममे करार था…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

दिलीप कुमार गेल्यावर आता तो म्हणतो त्याप्रमाणे ‘गम की बातेंही क्यों करे, भाई?’ त्याचा आधार वाटायचा. तो आहे हा घायाळ दिलाला दिलासा होता. तो असण्याची सवय झाली होती. पन्नास-साठ वर्षांचा सहप्रवास संपला. तो पडद्यावर होता, आम्ही समोर खुर्चीवर होतो. सभोवतालच्या अंधारात एक लख्ख प्रकाश होता. आता नुसताच अंधार. तो गेला आणि मी आहे. मी असेपर्यंत तो असणार होता, आमचं तसं ठरलं होतं. ‘वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के न याद हो…’

चंद्रसूर्य आहेत तोवर दिलीप कुमार असेल नसेल, पण मी आहे तोवर तो असणार होता. आमचं तसं ठरलं होतं. माझ्याकडून ‘वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के न याद हो…’ आज त्याने करार मोडला. आज त्याने दगा दिला. तो असता तर ‘नया दौर’मधला शंकर बनून म्हणाला असता, ‘हाई, मैंने दगा किया?’

प्रचंड धक्का, दुखावल्याची भावना, संतापाची तिडीक आणि भळाभळा वाहणारं काळीज… सगळं त्या शब्दांतून ओरबाडून बाहेर आलं असतं. तो बोलायला लागला की असंच व्हायचं. नजरबंदी झाल्यागत आम्ही भारून, खिळून बसून राहायचो. तो बोलायचा, आम्ही ऐकायचो. इतरांना ऐकू यायचं नाही तेही आम्हाला स्वच्छ ऐकू यायचं. तो आमच्याशी बोलायचा. आपसूक आमचे कान सुपाएवढे व्हायचे. नूरजहान बरोबर म्हणाली होती. ‘वो दिन जब याद आते है कलेजा मूँहको आता है…’

‘गंगा जमना’त हातापाया पडून माफी मागणाऱया पापी हरिरामला गोळी घालण्यापूवीं तो म्हणतो, ‘‘हमका तो कौनो माफ नहीं किया!’’ तेव्हा त्यातली पराकोटीची चीड मला जाणवली व पटली. तेवढी इतर प्रेक्षकांना जाणवली की नाही व जाणवली असल्यास पटली की नाही कोण जाणे. माझं त्याच्याशी खास नातं होतं. माझ्या भावना त्याच तीक्रतेनं तो पडद्यावर बोलून दाखवायचा.
माझा एक मित्र मला एकदा म्हणाला होता, ‘ते दिलीप कुमारचे पिक्चर सारखे सारखे बघत असतोस ना म्हणून तुला वारंवार औदासिन्याचे झटके येत असतात.’’
‘‘मूर्ख आहेस.’’ मी म्हणालो, ‘‘मी दिलीप कुमारचे पिक्चर सारखे सारखे बघत असतो ना म्हणून मनातली काळोखी दूर करून मी आनंदी राहू शकतो.’’
खरंच होतं ते. माझी सगळी दुःखं तो अप्पलपोटेपणे पडद्यावर भोगत असताना माझ्या वाटय़ाला दुःख उरतच होतं कुठं? त्याला पडद्यावर मरताना पाहिलं आणि माझ्यासारख्या असंख्य भ्याडांच्या वतीनं तो हे यातनामय जीवन संपवून टाकतोय असं वाटून मनानं मुक्त झालो. उद्विग्न मनःस्थितीत मी कितीदा त्याच्या चित्रपटांना गेलोय आणि साऱया व्यथा, विवंचना पडद्याला वाहून निरामय होताना, प्रसन्नचित्त बाहेर पडलोय.
दिलीप कुमारशी इमान राखण्यासाठी आम्ही दुनियेशी बेईमानी केली. इतर गुणीजणांच्या पदरात माप टाकताना हात थोडा आखडता घेतला. फार जीव लावला आम्ही या एका माणसावर. एक जन्मदाता पिता सोडला तर दुसऱया कुठल्या माणसावर मी एवढं भरभरून प्रेम केलं असेलसं मला वाटतं नाही. यापुढे मी करू शकीन असंही वाटत नाही. खरं म्हणजे एवढं प्रेम करण्याची कुवत माझ्याजवळ आहे हे दिलीप कुमारमुळे मला कळलं. एरवी ‘परछाई भी हो तेरी तो ठोकर पे मार दे’ हा आमचा बाणा. दिलीप कुमारसारखे काळीज चिरणारे शब्द भावनोत्कट स्वरात बोलता यावेत केवळ एवढय़ासाठी गेला बाजार एखादा छानसा प्रेमभंग व्हायला हवा, असे खुळचट विचार मनात डोकवावेत इतकी त्याची, त्याच्या अभिनयशैलीची व त्याच्या भूमिकांची माझ्यावर मोहिनी होती. आठवणीच्या प्रत्येक पापुद्रय़ावर या यक्षाची मोहर उठत्येय. कुठल्याही भल्याबुऱया घटनेची सवय भेटायला येताना एकटीदुकटी येत नाही. कुठली न कुठली दिलीप कुमारची अदाकारी पाठराखणीसारखी सोबत येते. मग सुखद आठवण जास्तच रंगते. आनंदाला गंध येतो. ओरबाडणारी स्मृती जास्तच रक्त काढते. दुःखाला काटे फुटतात.

गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत हिंदी चित्रपट माध्यमात आमूलाग्र बदल झालेत. तंत्र, कथा, सादरीकरण, गती, अभिनय, संगीत सगळय़ात प्रचंड बदल झालेत. नायकाचा चेहरामोहराच ओळखू येणार नाही इतका बदलून गेलाय. या सगळ्या स्थित्यंतरात व मन्वंतरात एक नट ध्रुवताऱयासारखा अढळ राहून येणाऱयांना प्रकाश दाखवत राहिलाय. आजही त्याचे ‘नक्षे कदम’ शोधत माणसं अभिनयाच्या अंगणात पाऊल टाकतायत हा निव्वळ चमत्कार आहे. चव्वेचाळीस साली पडदाप्रवेश केलेला दिलीप कुमार जुना, शिळा व म्हणून त्याज्य वाटू नये हा भानामतीचा प्रयोग म्हणावा लागेल.
दिलीप कुमार हा हिंदुस्थानचा अभिनेता म्हणता येईल का? (अभिनेता म्हणजे केवळ हीरो. त्यामुळे याकूबपासून परेश रावेलपर्यंत दिग्गज कलाकार ‘क्वालिफाइंग राऊंड’लाच बाद होतात.)

मला विचाराल तर होय, दिलीप कुमार हा सर्वश्रेष्ठ अभिनेता होता. हे विधान मी भावनेच्या आहारी जाऊन किंवा माझ्या पिढीशी इमान राखून करीत नाही याची कृपया नोंद घेतली जावी. ‘ज्वारभाटा’ व ‘प्रतिमा’ हे त्याचे पहिले दोन चित्रपट सोडून (कारण ते माझ्या आठवणीत कुठे लागलेलेच नाहीत.) दिलीप कुमारचे सर्व चित्रपट मी (अनेकदा) पाहिलेत. अमिताभ बच्चनचेही ‘एक नजर’ व ‘बन्सी आणि बिर्जू’ हे दोनच चित्रपट मी पाहिलेले नाहीत. राजकपूरचा एक ‘गोपीनाथ’ राहिला होता. तोही मध्यंतरी टी.व्ही.वर पाहिला. शाहरुख खानचे तर एकजात सगळे पाहिलेत. ‘खुदा जाने’, ‘वन टू का फोर’ पाहवत नव्हते तरी नेटाने पाहिले. देव आनंदचे सर्व चित्रपट पाहिले की नाही ही माहिती बिनमहत्त्वाची आहे. कारण तो स्पर्धेतच नाही. अशोककुमार व संजीवकुमार हे चतुरस्र अभिनेते टिकाऊ ठरूनही सर्वश्रेष्ठ या पदाचे दावेदार मानले गेले नाहीत. राजेश खन्ना काही काळ इतिहासातील सर्वात लोकप्रिय अभिनेता होता, पण तेव्हाही त्याला सर्वश्रेष्ठ म्हणायला जीभ रेटली नसती.

एकेकाळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या राजेश खन्नाच्या स्टायली आज बघताना प्रेक्षक दात विचकून फिदीफिदी हसतात. एवढय़ा लवकर त्याच्या अभिनयाचं एवढं अवमूल्यन झालं. सुनील दत्त, राजेंद्रकुमार, धर्मेंद्र, मनोजकुमार, प्रदीपकुमार (यात भारत भूषण, अभि भट्टाचार्य, विश्वजीत, करण दिवाण, महिपाल मनहर देसाई, सुरेश, शेखर प्रभृती आलेच.) काळाची गरज म्हणून त्या काळात चालले, आज त्यांना कोणी उभं केलं नसतं. सभोवती अभिनयाच्या नावाने आनंद असलेल्यांची दलदल असताना दिलीप कुमारने चिखलातील कमळाप्रमाणे उमलावे हा चमत्कारच नाही का? पंचावन्न-साठ वर्षांपूर्वीचा त्याचा अभिनय जराही जुना, शिळा वाटू नये याला काय म्हणाल? त्यावेळच्या चित्रपटांची कथानके, जुनाट मांडणी, जुनाट हाताळणी, जुनाट प्रकाश योजना, जुनाट कॅमेरा-एकटा दिलीप कुमार ताजा टवटवीत. जणू आजच्या चित्रपटातून उचलून त्याला जुन्या चित्रपटात त्यांच्या उद्धारासाठी टाकलाय. तो अभिनयाचे विद्यापीठ ठरलाय. पिढय़ांमागून पिढय़ांतील कलावंतांना याच विद्यापीठात प्रवेश हवा असतो. तो मिळाला की ते धन्य होतात. विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी तो विद्यापीठापेक्षा मोठा कसा होणार?

‘शक्ती’मधला दिलीप कुमारचा अभिनयाविष्कार पाहून नवीन पिढी थक्क झाली. आम्हाला थक्क व्हायची जुनी सवय होती. नो बिग डील. त्याला अमिताभने दिलेली जबरदस्त टक्कर पाहून मात्र आम्ही थक्क झालो. क्षणभर वाटून गेलं की गुरूला मानवंदना करून अमिताभ बच्चन स्वतःचं विद्यापीठ सुरू करतोय.

इंग्लिशमध्ये म्हणतात तसं –
`The KIng is dead; long live the King.’
तो दाखवत नव्हता किंवा दिसूही देत नव्हता, पण तो थकला होता. शरीरानं व मनानं. सुनील दत्त गेल्यावर प्रतिक्रिया देताना तो एकच वाक्य बोलला. म्हणाला, ‘‘अब बोलने जैसा कुछ रहा ही नही.’’ ‘इज्जतदार’, ‘कानून अपना अपना’ व ‘किला’मध्ये आपण पाहिला तो दिलीप कुमार नव्हता; त्याची सावली होती. एका नटसम्राटाची ती ‘डमी’ होती. त्याचं थकणं, वय होणं आम्हाला मान्य नव्हतं. त्याचे सिनेमे बघत आम्ही वयाने वाढलो हे आम्हाला कळत होतं, पण म्हणून त्यानं म्हातारं होणं आम्हाला मंजूर नव्हतं. तोच जर असा गळपटला तर आम्ही कोणाकडे बघून जगायचं? कोणाला देव्हाऱयात बसवायचं? कोणाची मानसपूजा करायची..? जगण्याच्या धडपडीत आम्ही खतम झालो. ‘गंगा जमना’त शेवटी दिलीप कुमार म्हणतो ना, ‘एकदम खतम हो गया’ तसे खतम झालो. पण दिलीप कुमार मात्र आम्हाला तसाच्या तसा राहायला हवा होता. खऱया वाघाने पेंढा भरलेल्या वाघासारखं असायला हवं होतं. तसूभरही बदल नको. सेम टू सेम हवा. कपाळावर आलेलं टेंगूळ नको. केसांची बट तशीच कपाळावर यायला हवी. आवाज तसाच तापलेल्या सळईसारखा व मृदू मेणासारखा यायला हवा. हसणं तसंच ओठ न विलगता फिस्सकन् यायला हवं. मधुबाला, मीनाकुमारी, नर्गिसशी पडद्यावर बोलायचा तसंच बोलायला हवं. पंचाहत्तरी ओलांडल्यावरही त्यानं सैरभैर होता कामा नये. उमेश मेहरासारख्या दिग्दर्शकांना दारात उभं करता कामा नये. आपण अत्यंत मोजके व परिणामकारक हातवारे करीत होतो याचे विस्मरण होता कामा नये. त्यानं सोडलेल्या बैलगाडीवर बसून ‘ये दो चार रुपयेवाला साहुकार कौन है बे?’ असे ‘इन्सानीयत’च्या गुर्मीत विचारायला हवं. ‘नीना रो इनके लिये’ असे भावनातिरेकाने दाटून आलेल्या कंठाने ‘अंदाज’सारखे म्हणायला हवे. ‘मैं तुम्हारे पापों का प्रायश्चित करूंगा, दादाजी’ असे ‘संघर्ष’सारखे गदगदून म्हणायला हवे. ‘आप अमीर लोग तो सबकुछ पी लेते है, दाव चलता है तो खून तक पी लेते है,’ असं फाटलेल्या आवाजात दुःखावेगाने ‘नया दौर’सारखं म्हणायला हवं. ‘इतने दिनों बाद मिले है तो गम की बाते ही क्यों करे भाई?’ असं ‘मशाल’सारखं विचारायला हवं…

दिलीप कुमार पडद्यावरून लोपला यापेक्षा काळजाला अधिक ठणका लावणारी गोष्ट कुठली असेल तर ती ही की, त्याच्या हयातीतच तो विस्मृतीप्राय झाला आणि हे उघडय़ा डोळ्यांनी पाहणं आमच्या नशिबी आलं. पहिला महान नट म्हणून अमिताभ बच्चनचा सर्रास उल्लेख होऊ लागला. अमिताभच्या पेक्षा मागे जाण्याची कोणाला गरज राहिली नाही. अमिताभ थोर आहेच, पण त्याच्या आधी एक कोणी दिलीप कुमार होऊन गेला होता हो ही आमच्या हृदयातून आलेली ‘चीख’देखील घशातच घुसमटली. ‘यहाँ सुननेवाला कौन था? रंगीत ‘नया दौर’कडे नवीन पिढीने ढुंकून बघितले नाही. अलीकडेच तो लता मंगेशकरला म्हणाला होता- ‘लता, वी आर हिस्टरी नाऊ!’ हे सांगताना लताच्या व ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी मनाशी मान्य केलं की, या इतिहासाचा मीदेखील एक नगण्य भाग आहे. दिलीप कुमार नाही, पु.ल. नाहीत त्या दळभद्रय़ा वर्तमानात कोणाला राहायला आवडेल?

‘कल तो सब थे जिंदगी के साथ साथ,
आज कोई भी नजर आता नहीं…’

दिलीप कुमार गेल्यावर आता तो म्हणतो त्याप्रमाणे ‘गम की बातेंही क्यों करे, भाई?’ त्याचा आधार वाटायचा. तो आहे हा घायाळ दिलाला दिलासा होता. तो असण्याची सवय झाली होती. पन्नास-साठ वर्षांचा सहप्रवास संपला. तो पडद्यावर होता, आम्ही समोर खुर्चीवर होतो. सभोवतालच्या अंधारात एक लख्ख प्रकाश होता. आता नुसताच अंधार. तो आम्हाला गिळून टाकणार. आमच्या खुरटय़ा जीवनातील प्रकाश विझला होता. माझे अण्णा गेल्याचं आज पन्नास वर्षांनंतरही मन मानायला तयार नाही. मग दिलीप कुमार गेल्याचं मी इतक्या लवकर कसं स्वीकारू? ‘दिलने बहोत धोके दिये है, सतीशबाबू. आज कल मैं दिमाग से काम लेता हूं’ असे तो पडद्यावर म्हणाला होता, पण ‘ज्वारभाटा’पासून ‘किला’पर्यंत त्यानं सदैव दिलाचाच कौल मानला. मग आता त्याचं जग सोडून जाणं स्वीकारण्यासाठी लागणारं दिमाग आम्ही कुठून आणू? ‘हम जैसे बरबाद दिलों का जीना क्या और मरना क्या. आज तेरी मेहफिल से उठे. कल दुनिया से उठ जायेंगे-हाय!…’ असं तो ‘देवदास’मध्ये गाऊन म्हणाला होता.
मी बाथरूममध्ये जाऊन रडून घेतलं. बाहेर आवाज जाऊ नये म्हणून नळ सोडून ठेवला. मी काय गमावलं हे फक्त मला माहीत होतं.
‘दिल पे क्या गुजरी तेरे जाने से कोई क्या कहे
साँस जो आती है वो भी मुझपे एक इल्जाम है…’

मला खरंच खूप दुःख झालं की दिलीप कुमार गेल्यावर दुःखाचे कढ येणं आपल्याकडून अपेक्षित आहे, म्हणून मी भूमिकेत शिरलो की बरेच दिवस मी रडण्यासाठी निमित्त शोधत होतो ते मिळाल्यामुळे रडलो हे मला सांगता येणार नाही, पण एक गोष्ट काही केल्या डोक्यातून जात नाही.
तो गेला आणि मी आहे. मी असेपर्यंत तो असणार होता, आमचं तसं ठरलं होतं.

‘वो जो हममे तुममे करार था,

तुम्हे याद हो के न याद हो…’

दिलीप कुमार हा अभिनयाची फार मोठी शाळा होता. तिथं शिकून माणसं कितीही मोठी झाली तरी शाळेपेक्षा मोठी कशी होणार? कोणी त्याची संवादाची धाटणी अभ्यासली, कोणी त्याचे ‘पॉजेस्’ उचलले, कोणी त्याच्यासारखे कॅमेऱयाचे अँगल्स लावून घेतले, कोणी त्याच्यासारख्या भूमिका व सिन्स लिहून घेतले, कोणी त्याच्या नायिकांबरोबर काम करून हौस भागवून घेतली. त्यानं अभिनयाला एक वेगळं व जबरदस्त परिमाण दिलं. चांगला अभिनय म्हणजे दिलीप कुमारसारखा अभिनय असं वाटायला लागण्याइतका बुद्धिभ्रंश या एका माणसाने काही पिढय़ांतील प्रेक्षकांचा व काही पिढय़ांतील नटांचा केला. अभिनयाचा तो बाज, ती नस, ते लाघव काल आलेल्या टी.व्ही.वरच्या अमन वर्माला सहीसही उचलावंसं वाटावं?

दिलीप कुमार प्रत्येक चित्रपटात दिलीप कुमारच असतो, असा एक विसंवादी सूर पूर्वी ऐकू यायचा. (आता हे आक्रमक ‘सूर’दास व त्यांचा हिरीरीने विरोध करणारे दोघेही गीरच्या जंगलातील सिंहाप्रमाणे संपत आलेत.) वस्तुस्थिती तसं सांगत नाही. हा आरोप करायचाच झाला तर तो दिलीप कुमारचे समकालीन राजकपूर व देव आनंद यांच्या बाबतीत सज्जड पुराव्यानिशी करता येईल. त्यांच्या एका चित्रपटातील प्रसंग उचलून दुसऱया चित्रपटात टाकला तर काहीच फरक पडणार नाही, काहीच वेगळं वाटणार नाही. ‘श्रीमान सत्यवादी’मधला प्रसंग ‘दुल्हा दुल्हन’मध्ये, ‘अनाडी’मध्ये, ‘एक दिल सौ अफसाने’मध्ये किंवा ‘दीवाना’मध्ये घुसवला तर काही फरक पडणार नाही. तसेच ‘तेरे घर के सामने’मधला तुकडा काढून ‘जब प्यार किसी से होता है’मध्ये ‘प्यार मुहोब्बत’मध्ये, ‘माया’मध्ये किंवा ‘नौ दो ग्यारह’मध्ये टाकला तर कळणारसुद्धा नाही. दिलीप कुमारच्या बाबतीत हे संभवत नाही. एक बेवडा घेतलात तरी ‘देवदास’ वेगळा, ‘पीने को शराबे गम’ म्हणणारा ‘दाग’मधला शंकर वेगळा व ‘मुसाफिर’मधला राजा फारच वेगळा. एक तलवारबहाद्दर घेतला तरी ‘यहुदी’मधला माल्थस वेगळा, कोहिनूरमधला राजकुमार वेगळा, ‘आन’मधला जयतिलक वेगळा, ‘इन्सानियत’मधला मंगल फारच वेगळा. एक अडाणी खेडुत घेतलात तरी ‘गोपी’ वेगळा, ‘सगीना’ वेगळा, ‘गंगा जमना’मधला गंगाप्रसाद फारच वेगळा. एक भग्नहृदयी हळुवार, प्रियकर घेतलात तरी ‘अंदाज’मधला दिलीप वेगळा, ‘आरजू’मधला बादल वेगळा, ‘दीदार’मधला कवीराज वेगळा, ‘मधुमती’मधला आनंद वेगळा व ‘जोगन’मधला नास्तिक फारच वेगळा. एक गिरणी कामगार घेतला तरी ‘पैगाम’मधला वेगळा व ‘मजदूर’मधला वेगळा. तो वकील (‘अमर’) वाटू शकतो. डॉक्टर (‘तराना’) वाटू शकतो. रॉबिनहुड (‘आझाद’) वाटू शकतो. कर्तव्यनिष्ठgर पोलीस अधिकारी (‘शक्ती’) वाटू शकतो, स्मगलर (‘मशाल’) वाटू शकतो. शहेजादा सलीम (‘मुगल-ए-आझम’) वाटू शकतो आणि जन्मजात टांगेवाला शंकर (‘नया दौर’) वाटू शकतो.

[email protected]