
>>गोरख तावरे
मध्य प्रदेशातून कराडमध्ये येऊन स्थायिक झालेले डॉ. देवकृष्ण सिंदल यांनी अविरत उत्कृष्ट, दर्जेदार, माफक दरात रुग्णसेवा केली. त्याचबरोबर अनेक नेत्रहीन व्यक्तींना नेत्रदान दिल्यामुळे अनेकांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली. दृष्टीदाताच रुग्णांच्या दृष्टिआड गेला आहे. उज्जैन, इंदूर, मुंबई, मिरज आणि कराड असा डॉ. देवकृष्ण सिंदल यांचा शैक्षणिक आणि रुग्णसेवेचा प्रवास आहे.
डॉ. देवकृष्ण सिंदल यांचे मूळ गाव मध्य प्रदेशातील उज्जैन. त्यांनी महात्मा गांधी मेडिकल कॉलेज इंदूर येथून MBBSची डिग्री 1965 साली प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून MS (ऑपथेल्मोलॉजी) असे उच्च शिक्षण 1977 साली पूर्ण केले. 1977 पासून ते 1982 पर्यंत सिंदल यांनी सांगली जिह्यातील मिरज येथील मिशन मेडिकल कॉलेज येथे वैद्यकीय सेवा केली. 1982 साली ते कराड येथे कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय उपचार केंद्रांमध्ये कन्सल्टिंग सर्जन म्हणून कार्यरत होते. दरम्यान, 1985 साली डॉ. देवकृष्ण सिंदल यांनी कराड येथे ‘सिंदल आय हॉस्पिटल’ सुरू केले. कराड शहर आणि कराड, पाटण, चांदोली, कडेगाव, कडेपूर, तासगाव, पलूस, वडूज, कलेढोण या परिसरातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे नेहमी येत असत. वैद्यकीय सेवा बजावत त्यांनी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले. डॉ. देवकृष्ण सिंदल यांनी हजारो व्यक्तींच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्याचबरोबर येणाऱया रुग्णांसोबत त्यांचा नेहमीच सकारात्मक ऋणानुबंध कायम राहिला आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये 1985 पासून प्रोफेसर व नेत्र विभाग प्रमुख म्हणून सुरू केलेली सेवा 2018 पर्यंत कायम होती. त्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. अनेक गुणवंत व गुणवान विद्यार्थी निर्माण केले. नेत्रहीन रुग्णांसाठी त्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरावर मोठे सामाजिक कार्य केले. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने डॉ. देवकृष्ण सिंदल यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. अनेक सामाजिक संस्थांनीही यथोचित सन्मान केला होता. याचबरोबर त्यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून डेक्कन ऑपथेल्मोलॉजी सोसायटीने गौरव केला होता.





























































