परीक्षांचे दिवस आणि माझा अभ्यास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत. सगळ्या extracurrical activities मागे पडून प्रत्येक जण अभ्यासाच्या मागे लागलाय. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी. कोणी पहाटे अभ्यास करतो, कोणाला रात्र जागवायला आवडते. कसा असतो ‘माझा अभ्यास’.

संकल्पना स्वतःच्या शब्दात मांडतो

सततच्या स्पर्धा, नाटकांच्या तालमी या सर्वांमधून अभ्यासाकडे थोडं फार दुर्लक्ष होतच असतं, पण तरीही या सर्व कला जोपासताना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाचन करण्याचा प्रयत्न करतो. परीक्षेच्या आधी सगळी पुस्तकं एकदा नजरेखालून गेलेली असली की, खूपच मदत होते. मी पाठांतर करण्यावर कधीच भर देत नाही. खरं तर तेच जास्त सोपं पडतं. परीक्षेच्या आधीपासून आणि परीक्षेच्या काळात कधीही जागरण करत नाही. खाण्यापिण्याची काळजी घेतो आणि ठरवलेल्या वेळेप्रमाणे अभ्यास करण्यालाच प्राध्यान्य देतो. त्यामुळे मला सगळ्याच परीक्षा सोप्या वाटतात.

निनाद कदम, रा. आ. पोद्दार महाविद्यालय

वेळापत्रक बनवणं महत्त्वाचं

‘परीक्षा’ हा शब्द ऐकून प्रत्येकालाच दडपण येतं, पण परीक्षेचा अभ्यास करण्याआधी सर्वात महत्त्वाचं असतं ते वेळापत्रक बनवणं आणि वेळेचं नियोजन करणं. प्रत्येक विषयासाठी स्वतःचा मी दिवस वाटून घेते. दोन ते तीन दिवस रिकामेच ठेवते, जेणेकरून एखाद्या विषयाचा अभ्यास ठराविक दिवसांत पूर्ण झाला नाही, तर तो त्या दिवशी करता येतो किंवा उजळणी करता येते. विषयाचा अभ्यास करताना प्रथम अभ्यासक्रम पाहून वेळेचं नियोजन करते. अभ्यास करताना वाचन करून एक-एक भाग समजून घेते आणि त्याचा किमान दोन वेळा सराव करते. प्रत्येक धडय़ाच्या नोट्स काढते आणि आकृत्यांवर भर देते. एखादा भाग समजत नसल्यास सर्वात शेवटी इंटरनेटवरून व्हिडीयो पाहून समजून घेते. अशा प्रकारे अभ्यास केल्याने मला परीक्षेत फार फायदा होतो.

कीर्ती दयाराम पाटील, विवेकानंद इंजिनीअरिंग कॉलेज

अवघड विषयांना जास्त वेळ देते

विद्यापीठाकडून वेळापत्रक मिळताच आधी आपले किती विषय आहेत आणि त्यातला कुठल्या विषयावर जास्त मेहनत करावी लागणार आहे याचं नियोजन करते. त्यानंतर मी माझ्या पद्धतीने घरी किती वेळात कोणता धडा वाचणार याचे नियोजन करते. जे विषय अवघड आहेत ते ग्रुप स्टडीजमध्ये सोडवायचे. परीक्षेच्या काळात खरं तर मी फक्त रिव्हिजन करते. खरं परीक्षेच्या काळात आपण अनपेक्षितरीत्या आधीच स्ट्रेसमध्ये जातो. त्यात नवीन काही वाचायचं म्हणजे कधी कधी पालथ्या घडय़ावर पाणी होतं. त्यापेक्षा आधीच सगळे कॉन्सेप्ट वाचून ठेवायचे. परीक्षेच्या काळात बरीच मुलं कमी झोप, वरवरचं जेवण असे सगळे प्रकार करतात. ज्यामुळे पेपर लिहिताना चक्कर येणे, झोप येणे असं सगळं होत राहतं. यावर पर्याय हाच आहे की, परीक्षेच्या काळात बाहेरच आणि जंक फूड टाळायचं आणि किमान 5 तास तरी झोप पूर्ण करायची हे ठरवते आणि त्याप्रमाणे वागते.

प्रज्योत ज्योती–प्रेमचंद महाजन, रा. आ. पोदार महाविद्यालय

नियमित थोडा थोडा अभ्यास करतो

माझी अभ्यासाची साधीसोपी पद्धत आहे ती म्हणजे नियमितपणे थोडा थोडा अभ्यास करत राहणे. जो विषय सर्वात  जास्त अवघड वाटतो त्याला सर्वात जास्त वेळ द्यायचा आणि मध्ये मध्ये माइंड फ्रेश करण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त आवडणारा विषय थोडा वेळ वाचायचा. त्यामुळे कंटाळाही येत नाही आणि अभ्यासही होत राहतो. मेंदूला जास्त ताण द्यायचा नाही. दिवसातून एकदा ठरवून फक्त एकच कोणती तरी मालिका किंवा चित्रपट पाहायचा. तेवढेच मनाला आणि मेंदूला थोडे मनोरंजन मिळते आणि मेंदू पुन्हा अभ्यास करण्यासाठी तयार होतो. मात्र एक ध्येय ठेवतो की, ती मालिका किंवा सिनेमा यातून काहीतरी बोध मिळायला हवा. उगाच पाहायचे म्हणून काहीही पाहायचे नाही आणि दिवसातून जेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त ताजेतवाने वाटते तेव्हाच अवघड विषयाला हात घालतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियमित योगासनं करतो. त्यामुळे अभ्यासात नक्कीच फायदा होतो.

वैष्णव गजानन तांबडे, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी