
>>वैश्विक<<
1974 मध्ये हर्क्युलस तारकासमुहाकडे खगोल वैज्ञानिकांनी एक रडिओ संदेश पाठवला. तो तिथे पोहोचायला 22 हजार वर्षे लागतील आणि तो कोणाला समजला नि त्यांनी त्याच रेडिओ संदेशाच्या भाषेत उत्तर दिले तर ते आपल्याकडे पोहोचयला आणखी 22 हजार वर्षे लागतील. म्हणजे एका ‘हॅलो’ला पलीकडून प्रतिसाद मिळण्याचा हा कमीत कमी चव्वेचाळीस हजार वर्षांचा काळ आहे.
रेडिओ लहरींचा शोध लागल्यानंतर आणि खगोलीय संशोधनासाठी त्याचा वापर होऊ लागल्यानंतरची ही गोष्ट आहे. आतापर्यंत काही गूढ रडिओ लहरी पृथ्वीपर्यंत आल्याची नोंद अनेकदा झाली आहे. यात खरं तर गूढ असं काहीच नाही. रेडिओ लहरी येतच असतात. मात्र त्या आऊटर स्पेसमधून येतायत का आणि नेमक्या कुठून येतायत याची शहानिशा करावी लागते. दूरस्थ जीवसृष्टीकडून (तशी कुठे असल्यास) रेडिओ लहरींच्या स्वरूपात सिग्नल येऊ शकतात. त्यामुळेच आपणही आपली म्हणजे पृथ्वीवरच्या सजीवांची माहिती देणारा रेडिओ संदेशच हर्क्युलसकडे पाठवला आहे.
खरोखरच आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा प्रगत जीव कुठेतरी असतील? असायला हरकत नाही. कारण आपल्या एका आकाशगंगेतच तर 200 अब्ज तारे आहेत, तर त्यापैक किमान 10 हजार ताऱयांभेवती तरी सूर्यासारखे तारे त्यांच्या ग्रहमंडळासह आणि कदाचित अतिप्रगत जीवांसह नांदतही असतील. परंतु ही जर तरची भाषा विज्ञान स्वीकारत नाही. कल्पना मांडण्यापुरती ती ठीक असते, पण पुढे त्यावर सखोल संशोधन होऊन ठोस पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत बहुधा, कदाचित वगैरेंना थारा नसतो.
आपल्याकडे रेडिओ लहरींचं शास्त्र्ा विकसित झालं ते तुलनेने अगदी अलीकडे. पन्नास – शंभर वर्षे म्हणजे वैज्ञानिक संशोधनात काहीच नाही. समजा, आपल्यापेक्षा प्रगत सजीवांनी कुठून तरी सोळाव्या, सतराव्या शतकात रेडिओ संकेतांद्वारे आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असेल तरी गोष्ट त्यावेळी आपल्याला समजणंच शक्य नव्हतं. त्यामुळे या ग्रहावर कोणीही प्रगत जीव नाही असा त्यांचा गैरसमजही झाला असेल.
आताच्या काळात मात्र अशा लहरी आल्या तर आपण त्यांचा मागोवा घेऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की, आपण ज्या दिशेने संकेत (सिग्नल) पाठवतो तिथेही कदाचित जीवसृष्टी अप्रगत अवस्थेत असेल किंवा काही ठिकाणी काळाच्या ओघात लयालाही गेली असेल. याचाच अर्थ, विविध प्रकारच्या शक्याशक्यता पडताळूनच आपल्याला आपल्या सूर्यमालेपलीकडच्या जीवांचा शोध घ्यायचाय.
यामध्ये जीवाचा शोध हा एकपेशीय सूक्ष्म जीवाचाही असू शकतो. तसे पुरावे आपल्या सूर्यमालेतच सापडतात, पण आपल्याला आस लागली आहे ती ‘प्रगत’ सजीवाचा शोध घेण्याची. या संदर्भात नुकतीच आलेली बातमी अशी की, कॅनडामधील काही खगोल अभ्यासकांनी दूर अंतरावरून म्हणजे आपल्या आकाशगंगा दीर्घिकेच्या अगदी टोकापासून निघालेल्या (किंवा पाठवलेल्या) रेडिओ लहरी पकडल्या आहेत.
‘चिमे’ नावाच्या अत्यंत प्रभावशाली रेडिओ टेलिस्कोपद्वारे रेडिओ लहरींचे सुमारे 1000 बर्स्ट सापडतील की अजून कदाचित दूरस्थ जीवसृष्टीचा शोध लागू शकेल असं या संशोधकांना वाटतं. ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’चा अभ्यास करत संभाव्य जीवसृष्टीच्या जागा शोधल्या जातात. या रेडिओ बर्स्टची तीक्रता सूर्याने हजारो वर्षांत निर्मिलेल्या ऊर्जेइतकी असते.
2000 पर्यंत असे 60 बर्स्ट नोंदले गेले, परंतु 2012 मध्ये एकाचीच नोंद झाली. हे बर्स्ट आपल्या दीर्घिकेतील दाट आणि वादळी भागातून येत असावेत असा कयास आहे.
असे काही रेडिओ सिग्नल आपल्याला कोणा दूरस्थ सजीवाकडून म्हणजे एलियनकडून येत असतील तर मात्र आपण या विश्वात एकाकी नाही याची साक्ष पटेल. आपल्या ग्रहमालेत आपल्यासारखा दुसरा प्रगत ग्रह नाही आणि इतरत्र ‘दुसरा’ कोणी आपल्यासारखाच सजीव असेल तर त्याच्याशी संपर्क साधण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अथक वैज्ञानिक संशोधन करावं लागेल. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी अथकपणे प्रयत्न करण्यासाठी अनंत काळ प्रयत्न करावे लागले तर त्यासाठी आपल्याला आपला प्रगत ग्रह सुरक्षित ठेवावा लागेल. आपल्या ग्रहावरच्या जीवसृष्टीचे आपण एकमेव स्वामी नाही. शेकडो सजीव मिळून आपली जीवसृष्टी होते. यामध्ये वनस्पतीही येतात. ही सर्व जीवसृष्टी आपण टिकवून ठेवली तरच कोणा दूरस्थ प्रगत जीवसृष्टीशी संपर्क साधता येईल एवढे बरीक ध्यानात असावे!



























































