अचानक आपत्तीवर मात Be Smart

241

आपल्यापैकी बहुतेकजणी नोकरी व्यवसायानिमित्त, कामानिमित्त खूपवेळ घराबाहेर… घरापासून दूरच्या अंतरावर राहावेच लागते. त्याला काहीच पर्याय नसतो. घरचे सगळे आवरून रोजचा लोकल, बसचा प्रवास, कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे ही तारेवरची कसरत आपल्या जगण्याचा भाग आहे. पण त्यातही अशा अनेक आपत्ती, अडचणी येतात की त्या क्षणी किंवा ऑफिसमध्ये वावरणे अवघड होऊन बसते किंवा फजितीस सामोरे जावे लागते. पाहूया अशा काही आकस्मिक आपत्ती आणि त्यावर सोपा उपाय!

ऐनवेळी ड्रेस फाटणे

रिक्षातून उतरताना अचानक त्याचा कोपरा लागून गर्दीच्या ठिकाणी ड्रेस फाटणे ही समस्या कोणावरही आणि कधीही येऊ शकते. अशावेळी घाबरून जाऊ नये. अशावेळी बॅगेत कायम सेप्टी पिनचे पाकीट असलेले बरे. कधी ते कामी येऊ शकेल. ऑफिसात कायम एखादा कपड्याचा जादा जोड ठेवावा. अशी समस्या आल्यास किमान ऑफिसमध्ये येऊन ड्रेस बदलता येतो.

शिंकताना

सर्दी झाल्यावर शिंका सतत येत असतात. पण काहीवेळा विचित्र वासाने, तंबाखूच्या वासाने किंवा अन्य वेळी अचानक शिंक येते. अशावेळी आपल्या हाताजवळ रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.

अचानक पायात गोळा येणे

अनेकांना अचानक गोळा येण्याचा त्रास होत असतो. आपल्याला या गोष्टीचा अंदाज नसतो. जिथे आहोत तिथेच थांबावे. प्रथमोपचार म्हणून प्रेचा वापर करावा. आपल्या बॅगेत कायम रिलीफ प्रे असणे केव्हाही फायद्याचेच असते.

अचानक डबा किंवा पाण्याची बाटली पर्स किंवा बॅगमध्ये सांडणे

काहीवेळा डब्याचे झाकण नीट न लावल्याने डब्यातून बऱ्याचदा तेल सांडते. त्यामुळे डबा, बाटली बॅगेत भरताना झाकणं पुन्हा तपासून पाहावीत किंवा सोबत पिशवी घ्यावी. यामुळे सांडलेच तर ते पिशवीत सांडेल.

चिखल उडणे

चालता चालता अचानक एखादी गाडी बाजूने जाते आणि अंगावर चिखल  उडाला की तळपायाची आग मस्तकात जाते. पण अशावेळी असे कपडे घेऊन पुढे कसे जायचे याचा ताण येतो. अशावेळी बॅगेत किंवा आजूबाजूला पाण्याची व्यवस्था असल्यास तिथून पाणी घेऊन चिखल धुऊन टाकावा.

कावळ्याची विष्ठा अंगावर पडणे

कावळ्याची विष्ठा अंगावर पडणे हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असू शकतो. अशावेळी काय फजिती होते ते सर्वांनाच माहीत आहे. अशावेळी कायम आपल्या बॅगेत टिशू पेपर असणे अत्यंत आवश्यक आहेत. अंगावर पडलेली विष्ठा टिशू पेपरने पुसून टाकावी आणि इच्छित स्थळी गेल्यावर स्वच्छ धुऊन टाकावे.

बाथरूमला जावेसे वाटणे

अजूनही सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था आपल्याकडे नीट नाहीए. त्यामुळे ज्या परिसरात असाल त्या परिसरात चौकशी करून तेथे जाणे योग्य ठरेल. जवळ गुळाचा खडा, पेपरमेण्टची गोळी ठेवावी. संत्र, मोसंबी सोबत ठेवावे, त्याने पाणी प्यावे लागत नाही.

अचानक पडल्यावर

आपण अनेकदा चालता चालता पडतो, पाय घसरतो काही होऊ शकते, मग आपल्या बॅगेत कायम बॅण्डेज किंवा मलमपट्टी जवळ ठेकाकी. अशावेळी काही लागल्यास या गोष्टी फायद्याच्या ठरतात.

ऐनवेळी चप्पल तुटणे

चपलेचा टिकाऊपणा वापरण्यावर असतोच, पण तरीही चप्पल अचानक रस्त्यात तुटल्यास दोन गोष्टी जवळ असल्याच पाहिजेत. एक म्हणजे सेप्टी पिन आणि दुसरे फेविक्विक बॅगेत असणं गरजेचे आहे. चप्पल तुटल्यास या गोष्टी असणं गरजेचे आहे.

च्युईंगम चिकटल्यास

च्युईंगम खाऊन तो इतरत्र टाकणे अशी काही जणांना घाणेरडी सवय असते. तो पायाला चिकटल्यास टिशू पेपरने तो काढून टाकावे. बाईकवर मागे बसताना कपडे अंगभर घालावे.

शेणात पाय भरणं

कधीकधी रस्त्यातून चालताना वाटेत असलेल्या शेणात किंवा विष्ठेत पाय पडतो. असे झाल्यास जवळपास पाण्याची सोय बघून पाय स्वच्छ धुवावेत. शक्यतो पाण्याची बाटली असायला हवी जेणेकरून त्या पाण्याचा उपयोग होईल.

पर्सचा पट्टा तुटणे

ऐन गर्दीच्यावेळी पट्टा तुटून पर्स हातातून निसटणे. यासाठी खूप लांब पट्टा असलेली पर्स घेऊ नये. शक्यतो पर्स घेताना ती ब्रॅण्डेड घ्यावी. आपल्या शरीराबरोबर राहील अशीच पर्स घ्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या