लेख : जय गंगे भागीरथी!

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र, त्यात गंगा ही जास्तच पवित्र. परमपूज्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, महाकवी कालिदास आणि अनेक कवींनी गंगेवर सुंदर काव्यरचना केली आहे. ही गंगा भूतलावर जेव्हा अवतीर्ण झाली, तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमीचा! त्या उत्सवाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ! ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच ‘गंगादशहरा’ असे म्हणतात.

गंगा ही केवळ एक नदी नाही, तर हिंदुस्थानचा इतिहास, भूगोल, साहित्य संस्कृती या सर्वांचा गतीप्रवाह गंगेच्या प्रवाहाशी जणू एकरूप झाला आहे. आपल्या संस्कृतीचे खास वैभव असे, की आपण नेहमीच निसर्गाशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. इथला निसर्ग, इथले पाऊसपाणी आणि इथली एवूâण परिस्थिती नेहमीच्या जगण्या-वागण्यात प्रतिबिंबीत व्हावी, अशा पद्धतीने आपल्या सणावारांची रचना केली आहे आणि ही रचना हजारो वर्षे अबाधितपणे आचरणात आणली जात आहे.

नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र, त्यात गंगा ही जास्तच पवित्र. अगदी शपथ घ्यायची झाली तरी ‘गंगा की सौगंध’ म्हणून घेतली जाते. परमपूज्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, महाकवी कालिदास आणि अनेक कवींनी गंगेवर सुंदर काव्यरचना केली आहे. ही गंगा भूतलावर जेंव्हा अवतीर्ण झाली, तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमीचा! त्या उत्सवाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ! ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच ‘गंगादशहरा’ असे म्हणतात.

ईश्वाकू कुळातील राजा भगीरथ याने आपल्या पूर्वजांना परलोकी गती मिळावी, म्हणून भगवान शंकराची आराधना करून ही नदी भारतवर्षात आणली, अशी कथा आहे. त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली व यश मिळवले. म्हणून आजही एखाद्या कार्यसिद्धीसाठी घेतलेल्या कष्टाला, प्रयत्नाला `भगीरथ प्रयत्न’ असे म्हणतात.

 गंगा ही हिमालयाची कन्या, ती सागराला मिळते. गंगा ही फक्त शिवमंगलाच नव्हे, तर ज्ञानाची आणि परमसौंदर्याची साक्षात मुर्ती आहे, म्हणूनच महेश्वर तिला मस्तकी धारण करतो. सर्वांना जल स्वरूपात जीवनदान देणारी माता, सर्वांचे मनोरथही पूर्ण करते. ती पापनाशिनी आहे. म्हणून आपण आंघोळ करताना ‘गंगेचे श्लोक’ म्हणतो. जणू गंगेचा स्पर्शच आपल्याला त्या श्लोकाद्वारे होतो. गंगेच्या पाण्यात काही प्रभावी औषधी गुणधर्म असल्याचेही सांगतात. आजही तांब्याच्या बंदिस्त कलशात भरलेली गंगा अगदी जशीच्या तशी शुद्ध व ताजी वाटते.  मोगल बादशहा स्वारीस जाताना गंगेचे पाणी आपल्याबरोबर भरून घेत असे. त्या पाण्याशिवाय त्याला कोणतेही पाणी पिण्यास चालत नसे. आजही मरणोन्मुख व्यक्तीच्या तोंडात शेवटी गंगाजल व तुलसीपत्र घालतात.

गंगा निर्मलच आहे, पण मानवजात मात्र कृतघ्न आहे. गंगेशी करंट्या माणसासारखे आपण वागतो. आपणच तिला प्रदुषित करून ‘राम तेरी गंगा मैली’ म्हणतो. मात्र आता केंद्र व राज्य सरकारने मिळून ‘सुवर्ण चतुष्कोनी नदीजोड’ हा महाप्रकल्प राबवला आहे. त्याला आपण खोटा विरोध न करता, आपलाही अल्पस्वल्प हातभार लावून ही भारतभूमी हरीतभरीत करूया व तिला पूर्वीसारखीच ‘सुवर्णभूमी’ म्हणून प्रसिद्धी प्राप्त करून देऊया.

अनेक अडचणींवर मात करत, सभोवतालच्या झाडाझुडपांना, पशुपक्ष्यांना पाणी देत, वाढवीत, अनेक लोकांची तहान भागवीत,ही धरती `सुजलाम-सुफलाम’ बनवीत, गंगा शेवटी आपल्या प्रियकरला म्हणजे सागराला जाऊन मिळते. तिचा आदर्श घेऊन आपणही आपले ध्येय समोर ठेऊन अनंत अडचणींवर मात करून ते गाठण्याचा प्रयत्न करूया आणि एकमुखाने म्हणूया, ‘जय गंगे भागीरथी’.