
हिमालयातील विविध ठिकाणची भ्रमंती आणि गिर्यारोहणाचे अनुभव लालित्यपूर्ण भाषेत शब्दांकित करणारे प्रल्हाद जाधव यांचे ‘हिमाक्षरे’ हे नवे पुस्तक ग्रंथालीने नुकतेच प्रसिद्ध केले आहे.जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमधील भ्रमंती अंतर्भूत असणारे हे लेखन केवळ प्रवास-वर्णनाच्या पातळीवर न राहता वाचकाला अभिजात स्वरूपाचा सुंदर अनुभव देऊन जाते.
हे लेखन चार भागांत विभागलेले असून ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ या पहिल्या भागात लेखक आपल्याला हिमाचल प्रदेशाची सफर घडवून आणतो. ‘दुनिया रैन बसेरा’ या भागात सिक्कीम-दार्जिलिंग, लडाख आणि स्पिती व्हॅलीचे दर्शन घडते. ‘ह्या गंगेमधी गगन वितळले’ या तिसऱ्या भागात कश्मीर-खोऱ्याचे तर ’गगनघटा गहरानी’ या अखेरच्या भागात उत्तराखंडमधील बागिनी या हिमनदीवरील खडतर भ्रमंतीचे वर्णन येते.
गिरीभ्रमणातील स्वानुभव आणि त्याला असणाऱ्या लेखकाच्या सखोल चिंतनाची जोड यामुळे हे लेखन केवळ पुस्तकी स्वरूपाचे न राहता ते वाचकाला आत्मप्रत्ययाच्या शिखरावर घेऊन जाते. केवळ भू-प्रदेश, इतिहास-भूगोल, सांस्कृतिक संदर्भ, निसर्ग यांचे साचेबद्ध वर्णन न करता लेखक साहित्य,शास्त्र,तत्त्वज्ञान,अध्यात्म या अनुषंगाने विविध दाखले,उदाहरणे, किस्से-कहाण्या अधूनमधून सांगत राहतो. त्यामुळे या लेखनाला एक अभिजात डौल आणि वजनही प्राप्त झाले आहे.
माणसाच्या जीवनाचा प्रवास आणि अशा प्रकारची भ्रमंती यातील साम्य-भेद दाखवता दाखवता जगण्याला समर्थपणे कसे सामोरे गेले पाहिजे याची शिकवण कळत नकळत हे लेखन देऊन जाते. ‘प्रवासाला जाताना घ्यायची काळजी’ हे परिशिष्टातील प्रकरण म्हणजे वाचकांना मिळालेला एक बोनस ठरला आहे. त्या अनुषंगाने नमूद केलेल्या अनेक छोटय़ा-मोठय़ा सूचना आणि संबंधित गमतीजमतींमुळे वाचकाचे प्रबोधन तर होतेच, पण प्रवासाला निघण्याच्या दृष्टीने त्याची मनोभूमिका तयार होण्यासही मदत होते. हिमाचल प्रदेशातील भ्रमंतीत दिसलेल्या जवळपास साठ पक्ष्यांची परिशिष्टात दिलेली यादीही या प्रवासाची आणखी एक बाजू प्रकाशित करते.
सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘द हिमालयीन जर्नल’चे माजी संपादक राजेश गाडगीळ यांनी ‘हिमाक्षरे’ची प्रस्तावना लिहिली आहे. ‘एखाद्या कसलेल्या गायकाने एका संथ लयीत बंदिशीची सुरुवात करावी आणि हळूहळू त्या मैफलीने आपल्याला बेहोश करत न्यावे अगदी तसा अनुभव या वाचनाने दिला.’ असे ते म्हणतात. जाहिरात क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गोपी कुकडे यांनी या पुस्तकाचे अतिशय बोलके मुखपृष्ठ आणि रेखाटने केली असून तेही या पुस्तकाचे एक वैशिष्टय़ ठरले आहे.
हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले तरी तेथे मराठी पर्यटकांचे अस्तित्व मोठय़ा प्रमाणावर जाणवते. याचे श्रेय मराठी माणसाच्या भ्रमंती-प्रेमासाठी आहेच, पण त्याला विविध ठिकाणी सुखरूपपणे घेऊन जाणाऱ्या मराठी माणसांच्या टूर पंपन्यांनाही आहे. या पार्श्वभूमीवर रसिक पर्यटकांनी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणून सोबत बाळगावे असे मोलही या पुस्तकाला लाभले आहे. ‘पाण्यातले दिवस’, ‘आनंद-नक्षत्र’, ‘तांबट’, ‘गॅलरीतील रातराणी’ अशी पुस्तके देणाऱ्या प्रल्हाद जाधव यांच्या प्रसन्न लेखन मालिकेतील हे पुस्तक आहे. आपल्या अनुभवविश्वात वाचकांना सामावून घ्यावे आणि त्यांनाही काही साक्षात्कारी क्षणांची सैर घडवून आणावी या हेतूने केलेले हे लेखन आणि तो प्रवास सर्वांनी स्मरणाच्या कुपीत जपून ठेवावा आणि त्यापासून जगण्यासाठी प्रेरणा घेत राहावी असा झाला आहे…



























































