
>> प्रदीप म्हात्रे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला, पण रायगडमधल्या पोलादपूरसारख्या ठिकाणी शेकडो कोरोनाग्रस्त रुग्णांवर इंजेक्शनाशिवाय यशस्वी उपचार करत मृत्युदर एक टक्क्याखाली आणण्याची कामगिरी डॉ. हिंमतराव बावस्करांनी बजावली. त्यांना केंद्र सरकारने अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
1951 साली जालना जिल्ह्यातील देहेड या गावी गरीब शेतकरी कुटुंबात डॉ. बावस्करांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थितीमुळे लहानमोठी कष्टाची कामे करत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. खामगावच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण घेऊन ते वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून एम.बी.बी.एस. झाले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी ग्रामीण भागात जाऊन रुग्णसेवा करण्याबाबतचा बंधूचा सल्ला शिरोधार्ह मानत रायगड जिह्यातील बिरवाडी या छोटय़ा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते रुजू झाले. कर्मचारी, सामग्री, औषधे इत्यादींची कमतरता आणि सरकारी अनास्थेला तोंड द्यावे लागले. नेहमीच्या आरोग्याच्या तक्रारींबरोबरच सर्पदशांचे, विंचूदंशाचे अनेक रुग्ण येत. विंचूदंशाच्या व्यक्ती मरण पावत असल्याने त्याच्या पद्धतशीर अभ्यासाला डॉ. बावस्करांनी सुरुवात केली.
कोकणाचे हवामान विंचवांच्या पुनरुत्पादनाला पोषक असल्यामुळे विंचूदंशावर खात्रीशीर इलाज ही तेथील प्राथमिकता होती. 1976-1977 मध्ये विंचूदंशाच्या वीस रुग्णांचा अभ्यास करून त्यांनी तयार केलेला अहवाल इंडियन हार्ट जर्नलकडे पाठवला. त्यानंतर डॉ. बावस्करांनी एम.डी.मेडिसीन हे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्यांचा विंचूदंशाच्या 15-20 रुग्णांच्या नोंदी-निरीक्षणावर आधारित शोधनिबंध ‘लॅन्सेट’ नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्यामुळे त्यांना जगभरातून पत्रे आली. हृदय बंद पडण्याच्या एका विशिष्ट प्रकारात पारंपरिक औषधांचा उपयोग होत नाही. तसेच विंचूदंशाच्या रुग्णांच्या बाबतीतसुद्धा होत असल्याचा डॉ. बावस्करांचा दावा त्यांच्या प्राध्यापकांनी अमान्य केल्यामुळे 1979 ते 1983 या कालावधीतील विंचूदंशाला बळी पडलेल्या रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकला नाही, याची सल त्यांना अजूनही बोचते.
एम.डी. झाल्यावरसुद्धा विंचूदंशावरील इलाज शोधण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. दरम्यान, त्यांचा विवाह झाला आणि त्यांना डॉक्टर सहचारिणी मिळाली. त्यानंतर ते दोघेही पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअरवर उपचार म्हणून सोडियम नायट्रोप्रुसाईड औषध (डॉक्टरांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वकरीत्या वापरले जाणारे) धोका पत्करत विषारी विंचूदंशाच्या शिकार झालेल्या 8 वर्षांच्या मुलाकरिता वापरत त्याचे प्राण वाचवले. त्यामुळे कोकणातील सर्व भागांतून विंचूदंशावर उपचार करायला रुग्ण मग पोलादपूरला येऊ लागले. एकूण दीडशे रुग्णांचे प्राण त्यांनी या उपचाराने वाचवले.
या औषधाच्या वापरामधील जोखीम लक्षात घेत डॉ. बावस्करांनी अभ्यास करून प्राझोसीन या दुसऱ्या औषधाची निवड केली. हे औषध तोंडाने घेण्याचे, कमी जोखमीचे, पण सारखाच परिणाम साधणारे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते रुग्णांना द्यायला त्यांनी सुरुवात केली. 1986 मध्ये डॉ. बावस्करांचा या विषयावरचा शोध निबंध ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांना ब्राझील, सौदी अरेबिया, टय़ुनिशिया, स्पेन, जर्मनी, इस्रायल अशा अनेक देशांतून ‘प्राझोसीन’ यशस्वीरीत्या वापरल्याचा अनुभव सांगणारी पत्रे आली. हिंदुस्थानात मात्र म्हणावी तशी दखल योग्य वेळी घेतली गेली नाही.
विंचूदंशावर डॉ. बावस्करांच्या संशोधनामुळे कोकणातल्या रुग्णांवर इलाज झालाच, पण त्याचा खरा प्रसार कर्नाटक, आंध्र प्रदेश, पाँडेचरी, गुजरात अशा इतर भागांतही झाला. त्या भागात विंचूदंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 30 टक्क्यांवरून एका टक्क्याच्याही खाली आले.
डॉ. बावस्कारांचे वीसेक लेख ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाले. हा एक वेगळाच विक्रम असावा. याखेरीज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे शंभराहून अधिक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. मेडिसीन या विषयावरील पुस्तकात ‘विंचूदंश’ आणि ‘सर्पदंश’ ही स्वतंत्र प्रकरणे त्यांनी लिहिली. एकीकडे वैद्यकीय सेवा करताना नोंदी निरीक्षणांसह समांतररीत्या संशोधन कार्य हे त्यांचे वेगळेपण. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांतून मार्गदर्शन केलेले डॉ. बावस्कर हिंदुस्थानभर अजूनही नियमितपणे व्याख्याने देतात. डॉ. बावस्कर यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या सन्मानाचा समावेश असून त्यांचे ‘शोध ग्रामीण आरोग्याचा’ हे पुरस्कारप्राप्त पुस्तक आहे.
एका खेडय़ातील मुलाचा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैद्यकीय संशोधकापर्यंत झालेला खडतर प्रवास सांगणारे त्यांचे ‘बॅरिस्टरचं कार्ट’ हे आत्मकथन प्रेरणादायी आहे. 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या जलप्रलयात त्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यातून त्यांच्या खडतर प्रवासाने आणखी एक वळण घेतले तरी डॉ. बावस्कर त्यावर मात करतील, हे निश्चित.




























































