
>> साधना गोरे
आज आपण वापरत असलेल्या अनेक शब्दांचं मूळ मराठी नाही, पण आता ते आपल्या संस्कृतीत अगदी मिसळून गेले आहेत. उदाहरणच द्यायचं तर ‘कुलूप-किल्ली’ किंवा ‘टाळा-चावी’ ही शब्दजोडी घेऊ या. ही जोडी इतकी अतुट आहे की, त्यातले एक हरवले तर दुसरे कुचकामी ठरते, पण गंमत म्हणजे ‘कुलूप-किल्ली’ या जोडीतील ‘कुलूप’ अरबीतील, तर ‘किल्ली’ संस्पृतमधील शब्द आहे. तसंच ‘टाळा-चावी’ या जोडीतील ‘टाळा’ शब्द संस्पृतमधून, तर ‘चावी’ पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे.
किल्ली किंवा चावी म्हणजे कुलूप उघडबंद करण्याचं साधन. यातील ‘चावी’ शब्द हिंदी वाटला तरी त्याचं मूळ ‘चावे’ या पार्तुगीज शब्दात आहे. या ‘चावे’चं बंगालीत ‘साबी’, तामीळमध्ये ‘सावी’ अन् हिंदीमध्ये झालं ‘चाबी’ किंवा ‘चाभी’. कुलूप उघडबंद करण्यासाठी किल्ली कुलुपात घालून विशिष्ट प्रकारे म्हणजे डावीकडून उजवीकडे फिरवावी लागते. अशीच काहीशी क्रिया पाण्याचा नळ चालू-बंद करतानाही आपण करत असतो. यावरूनच महाराष्ट्रातील काही भागांत नळाला ‘चावी’ म्हटलं जात असावं.
‘चावीचा दगड’ या कल्पक वाक्प्रयोगाचा हल्ली फारसा वापर होताना दिसत नाही. दगडांची कमान बांधताना मधोमध जो दगड बसवला जातो त्याला ‘चावीचा दगड’ म्हटलं जातं. हा दगड घडवणं आणि तो कमानीत बसवणं ही दोन्ही कामं फार कौशल्याची समजली जातात. कारण हा चावीचा दगड केवळ शोभेसाठी नसतो, तर अख्ख्या कमानीचा भार हा चावीचा दगड पेलत असतो. कमानीतील सर्व दगडांना एकमेकांत घट्ट अडकवण्याचं म्हणजे एक प्रकारे बंद करण्याचं काम एखाद्या चावीप्रमाणे हा मध्य भागातला दगड करत असल्याने त्याला ‘चावीचा दगड’ म्हटलं गेलं असावं. यावरून एखाद्या कार्यात महत्त्वाची भूमिका वठवणाऱया व्यक्तीला ‘चावीचा दगड’ म्हणण्याची प्रथा पडली असावी. मात्र ‘चावीचा दगड’ हा शब्दप्रयोग ‘कीस्टोन’ या इंग्रजी शब्दाचं हुबेहुब भाषांतर आहे.
आता पाहू किल्लीविषयी. ‘किल्ली’ हा शब्द संस्पृतमधील ‘कील’ या शब्दावरून मराठीत आला. विशेष म्हणजे मराठीतील ‘खिळा’ हा शब्दही संस्पृतमधील याच ‘कील’वरून मराठीत आला आहे. किल्ली आणि खिळ्याच्या सर्वसामान्य आकारातही काहीएक साम्य असल्याचं जाणवतं. हिंदीमध्ये सुरुवातीला ‘कुलूप-किल्ली’ ही शब्दजोडी वापरली जायची. नंतरच्या टप्प्यावर हिंदीने या जोडीचा त्याग करून ‘ताला-चाबी’ ही जोडी वापरायला सुरुवात केल्याचं दिसतं. उत्तर भारतातल्या भोजपुरी भाषेत मात्र ‘किली’ शब्द आजही वापरात आहे. फारसी भाषेत ‘किल्ली’ याच अर्थाचा ‘किलीद’ असा शब्द आहे. तो संस्पृतमधील ‘कील’ शब्दाशी ताडून पाहायला हवा, असं कृ. पां. कुलकर्णींनी ‘व्युत्पत्ती कोशा’त म्हटलं आहे.
एखादं रहस्य, गूढ उकलण्याची युक्ती, या अर्थाने मराठीत ‘गुरुकिल्ली’ हा वाक्प्रयोग अत्यंत प्रचलित आहे. ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’, ‘यशाची गुरुकिल्ली’ असं सर्रास म्हटलं जातं. इंग्रजांच्या येथील दीर्घकाळाच्या सत्तमुळे कितीतरी इंग्रजी शब्द इथल्या प्रादेशिक भाषांमध्ये सहज मिसळून गेले, तर काही इंग्रजी शब्द, वाक्प्रचार अत्यंत चपखल अशा भाषांतराने आपल्या संस्पृतीचा भाग झाले. उदा. हनीमून – मधुचंद्र, विकेटकीपर – यष्टिरक्षक किंवा वर दिलेला कीस्टोन – चावीचा दगड. ही यादी कितीतरी वाढवता येईल. ‘गुरुकिल्ली’ शब्द त्याच प्रकारात मोडणारा आहे. इंग्रजीतील ‘मास्टर की’ या शब्दप्रयोगाचे ते थेट भाषांतर म्हणता येईल. इंग्रजीतील ‘मास्टर’ या शब्दाला अर्थाच्या अनेक छटा आहेत. मालक, स्वामी, शिक्षक, सर्वश्रेष्ठ, स्वामित्व गाजवणारा, शिक्षक असे अनेक भाव या ‘मास्टर’ शब्दात आहेत. आपल्याकडे आताआतापर्यंत खेडेगावांतील शाळांमधून शिक्षकांना मास्तर म्हणण्याची प्रथा होती. मराठीतील ‘मास्तर’ हे इंग्रजीतील ‘मास्टर’चेच अपभ्रंश रूप! भारतीय संस्पृतीत ज्ञान देणाऱयाला गुरू मानलं जातं. ब्रिटिश काळात इंग्रजांनी त्यांच्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था इथं सुरू केल्यावर ‘मास्तर’सोबत शिक्षकाला गुरुजीही म्हटलं जाऊ लागलं. ‘मास्टर की’ म्हणजे अनेक कुलुपांची एक किल्ली, जी मुख्य असते. गुरू आणि किल्ली या दोन शब्दांनी मिळून तयार झालेल्या ‘गुरुकिल्ली’ या सामासिक शब्दातील ‘गुरू’चा अर्थ मात्र शिक्षक नाही, तर तो इंग्रजीप्रमाणे मुख्य, महत्त्वाचा असाच आहे. इंग्रजीतील ‘मास्टर’ या शब्दाला जशा अनेक अर्थच्छटा आहेत, तशा त्या संस्पृतमधील ‘गुरू’ या शब्दालाही आहेत. विशाल, महत्त्वाचा, अध्यापक, शक्तिमान असे अनेक भाव या शब्दात आहेत. आपल्या सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठय़ा असणाऱ्या पाचव्या क्रमाकांच्या ग्रहाला म्हणूनच ‘गुरू’ म्हटलं गेलं असावं. तर महत्त्वाची, मोठी किल्ली म्हणजे गुरुकिल्ली असा अर्थ इथं अभिप्रेत आहे.