लेख – हिंदुस्थानी नौदल : पाणबुडय़ांची क्षमता वाढवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन  

हिंदुस्थानातील नौदलाला अधिक सक्षम करण्यासाठी सहा पारंपरिक पाणबुडय़ांच्या खरेदीला हिंदुस्थान सरकारकडून मागच्या आठवडय़ात मंजुरी देण्यात आली. या पाणबुडय़ांच्या बांधकामासाठी सुमारे 5.9 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांसाठीच्या  भागीदारीअंतर्गत  ही पहिलीच मंजुरी आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील पाणबुडय़ा उभारण्यासाठी विविध स्तरांवरील औद्योगिक क्षमता तयार होऊ शकते.

हिंदुस्थानी नौदलाची शस्त्रे ही तीन भागांत विभागता येतील. आकाशात उडणारी हेलिकॉप्टर्स किंवा लढाऊ विमाने ही अनेक मोठय़ा जहाजांवरून कार्यरत असतात. ती युद्धक्षमता आपली बऱयापैकी आहे. त्याशिवाय पाण्यावरून चालणारी जहाजे, ज्यामध्ये विमानवाहू नौका आहेत. सध्या लष्कराकडे एकच विमानवाहू नौका आहे ती म्हणजे ‘आयएनएस विक्रमादित्य’.  नवी विमानवाहू नौका दाखल होण्यास अनेक वर्षे लागण्याची शक्यता आहे. फ्रिगेटस् आणि डिस्ट्रॉयरसारख्या आपल्या मोठय़ा जहाजांची परिस्थिती योग्य आहे.

ज्याविषयी काळजी करण्याचे कारण आहे ते म्हणजे हिंदुस्थानी पाणबुडय़ांची संख्या. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी एकदम लढाई करण्याची वेळ आली तर नौदलाकडे कमीत कमी तीस पाणबुडय़ा असणे गरजेचे आहे. पाणबुडय़ांच्या निर्मितीसाठी बराच वेळ लागतो आणि याबाबतचे तंत्रज्ञान आपल्याला परदेशातून आयात करावे लागते. म्हणून 1999 मध्ये आपण 30 वर्षांचा पाणबुडय़ा बनवण्याचा कार्यक्रम तयार केला. त्यातील पहिला टप्पा 2000- 2012 वर्षांचा होता. त्यात 12 पाणबुडय़ा तयार करण्याचे ठरले होते. यापैकी सहा या हिंदुस्थानात प्रोजेक्ट 75 च्या अंतर्गत आणि सहा परदेशी मदतीने तयार केल्या जाणार होत्या.

दुसऱया टप्प्यात 2012 ते 2030 मध्ये पूर्णपणे हिंदुस्थानी बनावटीच्या आणखी 12 पाणबुडय़ा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पाणबुडय़ा बनविण्याचे दोन्ही टप्प्यांतील कार्यक्रम अतिशय संथ गतीने सुरू आहेत. ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते काम कधी पूर्णत्वास जाईल हे सांगणे कठीणच दिसते.

हिंदुस्थानमध्ये सध्या फक्त 15 पारंपरिक पाणबुडय़ा कार्यान्वित आहेत. त्यापैकी अनेक पाणबुडय़ा कालबाह्य झाल्या असल्याने बदलण्याची आवश्यकता आहे. प्रकल्प 75 मधील सहापैकी अखेरच्या तीन कलवारी (स्कॉर्पिन) जातीच्या पाणबुडय़ा पुढील दोन वर्षांत नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानकडे 13 डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणाऱया पाणबुडय़ा आहेत, त्यातील 9 रशियन  व 4 जर्मनीत बनविण्यात आल्या आहेत. यापैकी कुठल्याही क्षणी केवळ 50 टक्के म्हणजे सहा-सात पाणबुडय़ा लढाईसाठी सज्ज असतात. अर्थात हे  प्रमाण हे अतिशय कमी आहे. पाणबुडय़ांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

प्रोजेक्ट 75 च्या अंतर्गत सहा स्कॉर्पिन बनवण्याचे निर्धारित करण्यात आले होते. त्यामधील एकच स्कॉर्पिन पाणबुडी 2016मध्ये आपल्या नौदलात येईल असे नियोजन होते.  हा प्रकल्प  चार वर्षे मागे पडला आहे. त्याशिवाय पाणबुडय़ांना लागणारे टॉर्पेडो हे शस्त्र्ा अजूनही तयार झालेले नाही. इतर पाच पाणबुडय़ा 2022 पर्यंत मिळतील अशी शक्यता वाटते आहे. या सहा पाणबुडय़ांशिवाय अजून तीन पाणबुडय़ांकरिता नौदलाने मागणी नोंदविली आहे. मात्र पाणबुडय़ा बनविण्याचा वेग अतिशय कमी आहे. परदेशी मदतीने आपण ज्या पाणबुडय़ा बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यामध्येसुद्धा प्रगती अतिशय मंदपणे होतेय.

अणुऊर्जेवर चालणाऱया पाणबुडय़ा

 पाणबुडय़ांची कमतरता भरून काढण्याकरिता 2012 मध्ये ‘आयएनएस चक्र’ नावाची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी रशियाकडून भाडय़ाने घेतली होती. त्यासाठी 900 मिलियन डॉलर इतका प्रचंड खर्च केला होता. रशियाकडून भाडेतत्त्वावर घेतलेली हिंदुस्थानी नौदलाकडेही ‘आयएनएस चक्र’ परत पाठवण्यात येत आहे. अन्य एक पाणबुडी अशाच प्रकारे रशियाकडून भाडय़ाने घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता 1.5 बिलियन डॉलर्स इतका खर्च येण्याची शक्यता आहे. हा खर्च दुप्पट असल्यामुळे त्याकरिता वाटाघाटी अजून चालू आहेत.

आपण अणुशक्तीवर चालणाऱया तीन पाणबुडय़ा बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामधील एक आयएनएस ‘अरिहंत’ ही पाणबुडी सध्या तयार झाली आहे आणि समुद्रामध्ये त्यावर युद्धाभ्यास सुरू आहेत. मात्र गेल्या तीस वर्षांपासून हे संशोधन सुरू होते, त्यामुळे आता त्याची किंमत पन्नास हजार कोटींहून जास्त झालेली आहे. ‘अरिहांत’ युद्धनौका नौदलात सामील झाल्यानंतर अजून तीन अणुऊर्जेवर चालणाऱया पाणबुडय़ा नेमक्या कधी येतील हे सांगणे कठीण आहे. म्हणजेच पाणबुडय़ांचा हिंदुस्थानी नौदलामध्ये येण्याचा वेग वाढवणे गरजेचे आहे.

पाकिस्तानच्या नौदलाच्या तयारीचा वेध घेतला तर पाकिस्तानकडे आज पाच पाणबुडय़ा आहेत. त्यांना आणखी आठ पाणबुडय़ा चीनकडून मिळणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, चीन हिंदुस्थानला शत्रू समजत असल्याने तो पाकिस्तानला पाणबुडय़ांचे तंत्रज्ञान आणि पाणबुडय़ाही देत आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे असलेल्या पाणबुडय़ांची संख्या येणाऱया काळात नक्कीच वाढण्याची शक्यता आहे.

आपण स्वसामर्थ्य वृद्धिंगत करत नाही तोपर्यंत स्वतःची ताकद आणि क्षमता वाढणार नाही. त्यामुळेच आपण आयएनएस कलवारी आणि स्कॉर्पिन पाणबुडय़ा बनविण्याचा कार्यक्रम वेगवान करण्याची गरज आहे. कारण युद्धाचा प्रसंग केव्हा येईल हे सांगणे शक्य नाही. म्हणून दीर्घकालीन नियोजन करून सद्य परिस्थितीत असलेल्या सर्व शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. त्याकरिता आर्थिक तरतूद कमी पडता कामा नये. कारण जसा काळ मागे पडतो तशी आपली युद्धक्षमता कमी कमी होते. गेल्या अनेक वर्षांत आपल्या नौदलाची पाणबुडय़ांच्या बाबतीतील युद्धसज्जता वाढण्याऐवजी कमी झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच विविध कार्यक्रमांना वेग देऊन आपली युद्धसज्जता लवकरात लवकर वाढविणे गरजेचे आहे.

हिंदुस्थानात अंतर्गत संरक्षण निर्मिती वाढविणे तसेच संरक्षण क्षेत्र स्वयंपूर्ण व्हावे यासाठी काही दशकांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमधील हे पुढचे पाऊल आहे. यामध्ये हिंदुस्थानी पाणबुडी निर्माते आणि परदेशातील शस्त्र्ाs बनविणारे कारखाने म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (Original equipment manufacturers) यांना एकत्रित कंत्राट दिले जाईल. आशा करूया की, या प्रकल्पांना पाणबुडय़ा लवकरात लवकर बांधण्यामध्ये यश मिळेल.

[email protected]