
>> वैश्विक
गुरू हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. आपल्या पूर्वजांनी त्याला अगदी योग्य रीतीने ‘गुरू’ म्हणजे मोठा असे नाव दिले. सूर्यापासून 77 ते 81 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या या महाकाय ग्रहामध्ये 1200 पृथ्वी मावतील! सेकंदाला 13 किलोमीटर वेगाने गुरू सूर्याभोवती 12 वर्षांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे एका राशीतील तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर तो आपल्याला एक वर्ष दिसतो. गुरू नुकताच वृश्चिक राशीच्या पार्श्वभूमीवर 11 ऑक्टोबरपासून दिसू लागला आहे.
गॅलिलिओ गॅलिली याने 1609 मध्ये दुर्बिणीतून अवकाश न्याहाळलं तेव्हा त्याला दोन मोठय़ा ग्रहांची वैशिष्ट्य जाणवली. शनी ग्रहाभोवती असलेली अप्रतिम कडी पाहून या ग्रहाला ‘कान’ आहेत अशी नोंद गॅलिलिओने केली. गुरू ग्रहाचे गनिमिड, कॅलिस्टो, आयो आणि युरोपा हे चार चंद्र (नैसर्गिक उपग्रह) गॅलिलिओने न्याहाळले. आधुनिक विज्ञानाने या दूरस्थ ग्रहांचा यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अन्य वेध घेण्याला 400 वर्षे उलटून गेली आहेत. एकेकाळी पृथ्वीवरच्या छोट्या, कमी क्षमतेच्या दुर्बिणीतून अवकाशस्थ वस्तूंचा शोध घेण्याला मर्यादा होती. गेल्या अर्धशतकात आधी कृत्रिम उपग्रह आणि मग अवकाशाचा शोध जवळून घेणार्या दुर्बिणीही कार्यरत झाल्या. त्यांनी आपल्या ग्रहमालेतील अनेक विस्मयकारी गोष्टी आपल्या नजरेत आणल्या.
1995 मध्ये गॅलिलिओ गॅलिली या महान शास्त्रज्ञाचे स्मरण जागवत गॅलिलिओ ‘प्रोब’ (संशोधक उपग्रह) थेट गुरूच्या वायुरूप वातावरणात शिरला. तसे करण्याने तो नष्ट होणार हे अपेक्षितच होते, पण नष्ट होण्यापूर्वी त्याने तब्बल 58 मिनिटे गुरूच्या अंतरंगाचं रूप पृथ्वीपर्यंत पोहोचवलं! विज्ञानयुगात ज्या सकारात्मक गोष्टी घडतात त्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
तेव्हापासून गुरूच्या अंतरंगांचा शोध अव्याहत सुरूच आहे. गुरू ग्रहाच्या दक्षिण गोलार्धात एक ‘रेड स्पॉट’ आहे. गुरूचं वैशिष्टय़ म्हणजे त्याच्या वातावरणाचे मनोहारी रंग साध्या दुर्बिणीतूनही दिसून येतात. 1664 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट हूक यांनी गुरूवरील या रेडस्पॉटचा शोध लावला. दुर्बिणीतून लालसर दिसणारी ही जागा म्हणजे गुरू ग्रहाच्या वातावरणातील अब्जावधी वर्षे घोंघावणारे महाकाय वादळ आहे. या वादळाचा जवळून शोध घेण्याचे काम सुरू आहे.
9 तास 50 मिनिटांचा ‘दिवस’ असलेल्या गुरूचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याचे चंद्र. त्यापैकी चार तर 400 वर्षांपूर्वीच शोधले गेले. पण नित्यनव्या संशोधनातून त्यात भर पडत आहे. गुरू ग्रहाला 13 चंद्र असल्याचं आम्ही लहानपणी ऐकलं होतं. पुढे त्यांची संख्या वाढत असल्याचं ऐकू येऊ लागलं. कधी गुरूचे चंद्र 50 तर कधी 63 असे आकडे कानी यायचे. आता त्याबाबतची अगदी ताजी बातमी अशी की, गुरूच्या चंद्रांची संख्या 79 वर पोचली आहे. हासुद्धा अंतिम आकडा असेल असं नाहीच. आणखी काही काळाने कदाचित त्यात भर पडेल. प्रश्न असा की, आतापर्यंत हे गुरूचे छोटे चंद्र कुठे दडले होते? याचं उत्तर असं की, गुरूच्याच इतर मोठ्या चंद्राआड ते असल्याने एखादं यान गुरूचं निरीक्षण करीत असलं तरी त्याच्या नजरेतून ते निसटत होते. तंत्रज्ञान जसजसं प्रगत होईल तसतसा आपल्या ग्रहमालेच्या अंतरंगाचा अधिकाधिक ‘डेटा’ प्राप्त होईल. गुरूचे काही चंद्र अगदीच लहान तर काही लघुग्रहांसारखे आहेत.
































































