लेख – बालगुन्हेगारीची वाढती समस्या

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम

आजकाल किशोरवयीन मुले मोठय़ा गुह्यात खूपच सक्रिय दिसत आहेत. आपण दररोज अशा बातम्या पाहतो आणि वाचतो. कित्येकदा आपल्याला विश्वाससुद्धा बसत नाही की, ही एवढी लहान-लहान मुले माणुसकीला काळिमा फासणारी घाण कृत्यं कशी काय करू करतात? पण हे कटू सत्य आहे. कधी कधी लोक या मुलांना चोरी करताना पकडतात आणि त्यांना थोडेसे रागाहून, थापड मारून सोडून देतात, परंतु मुळात त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा किंवा सुधरविण्याचा प्रयत्न होताना दिसतच नाही. ही मुले आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत. जर आपण आज त्यांचे अस्तित्व व्यवस्थापित केले नाही तर आपण त्यांना भविष्यातील आधारस्तंभ कसे म्हणावे?

गेल्या वर्षीच्या जागतिक औषध अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी जगभरातील सुमारे 269 दशलक्ष लोकांनी ड्रग्ज वापरली, जे 2009 च्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे, तर 35.6 दशलक्षांहून अधिक लोक ड्रग्ज वापराच्या विकारांनी ग्रस्त आहेत. अहवालात म्हटले आहे की, वाढती बेरोजगारी आणि कोरोना साथीच्या आजारामुळे गरीब लोकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गेल्या दशकात अमली पदार्थ आणि संबंधित विकारांमुळे मृत्यूच्या संख्येत 71 टक्के वाढ झाली आहे.

समाजात आजकाल किशोरवयीन मुले ड्रग्जकडे अधिक आकर्षित होताना आणि त्यांच्याकडून होणाऱया गुह्यांचा आलेखही सतत वाढताना दिसून येतो. मुले पटकन उग्र होतात, आकर्षित होतात, हट्टीपणा करतात, सर्व काही द्रुतपणे मिळवण्याचा प्रयत्न करतात. चित्रपट, फॅशनमधील कलाकारांना आणि दबंगगिरी करणाऱया लोकांना त्यांचे रोल मॉडेल मानतात आणि त्यांना जसे दिसते तसेच व्हायचे असते. यासाठी मग त्यांना शॉर्टकट जरी घ्यावा लागला तरी चालते. सिगारेट, तंबाखू, हुक्का आणि अल्कोहोलपासून नशा सुरू होऊन गांजा, ड्रग्ज, हेरॉइन, अफू, चरसपर्यंत जाते. नंतर महागडे छंद, फॅशन, देखावा, शॉर्टकटमध्ये पैसे कमवायची इच्छा, स्वतःचा दबदबा दाखवण्यासाठी आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी ही किशोरवयीन मुले गंभीर गुन्हे करतात. अनेकदा पालक लहान मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात, परंतु काही वेळा ही चूक पुढे मोठय़ा अपघाताचे रूप धारण करते.

कानपूरमध्ये एका किशोरवयीन मुलाने दहा वर्षांच्या निरागस बालकाचा गळा कापून त्याचा मृतदेह जंगलात फेकला. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांत खंडणीसाठी अल्पवयीन मुलांचे अपहरण आणि हत्या करण्यात बालगुन्हेगार गुंतले असल्याचे आढळले. देशातील शेकडो गंभीर गुह्यांमध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक शहरात आणि मोठय़ा महानगरांमध्ये, बालअपराधी हे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये दिसतात. बालअपराधी गर्लफ्रेंडला महागडय़ा भेटवस्तू देणे आणि मजा-मस्तीचे आयुष्य जगण्यासाठी, नशा केल्यानंतर ते चुकीच्या मार्गावर जातात. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग ही अत्यंत गंभीर बाब आहे. बालगुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्यात चित्रपट, टीव्हीवरील मालिकांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. असंख्य लोक, लहान ते मोठे, सोशल मीडियाचे व्यसनी झाले आहेत, त्यामुळे रोज त्यांचा घरी तणावाचे वातावरणदेखील असते, नुकत्याच झालेल्या गंभीर गुह्यांतील दोषींनी कबूल केले आहे की, सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेब सिरीज पाहून त्यांना गुन्हा करण्याचे मार्ग कळले आहेत.

शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे वर्ष 2018 मधील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशात 10 ते 17 वर्षांच्या वयोगटातील तब्बल 1.48 कोटी मुले व्यसन करतात. व्हाइटनर, पंचर सोल्युशन, कफ सिरप, पेट्रोल, थिनर, सनफिक्स बॉण्ड फिक्स यांसारख्या हानिकारक तीक्ष्ण रासायनिक ज्वलनशील पदार्थांचा वास घेऊन नशा करणाऱया मुलांची संख्या 50 लाख आहे आणि 20 लाख मुले भांग, 30 लाख मुलं दारू, तर 40 लाख मुलं अफीमची नशा करतात. सिगारेट, तंबाखू, ड्रग्जसह इंजेक्शन व इतर पदार्थांची नशाही मोठय़ा प्रमाणावर करतात. ही मुले रेल्वे स्थानक, बसस्थानक, झोपडपट्टी, निर्जन भागात, सार्वजनिक उद्यान अशा ठिकाणी गटांमध्ये मिळून नशा करताना आढळतात. लहान मुलापर्यंत हे जीवघेणे नशेचे विष सहज उपलब्धता ही सर्वात मोठी समस्या आहे. 2016 मध्ये दिल्ली सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या पुढाकाराने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशाच्या राजधानीत 70 हजार मुले अमली पदार्थांच्या आहारी असल्याचे आढळले.

क्राइम ब्युरोच्या नोंदीनुसार मोठय़ा प्रमाणात गुन्हे, खून, दरोडा, अपहरण इतर सर्व प्रकारच्या गुन्हय़ांमध्ये नशेचे प्रमाण 73.5 टक्के आणि बलात्कारासारख्या गंभीर गुह्यात हे 87 टक्केपर्यंत आहे. देशातील वाढत्या गुन्हेगारी, गंभीर आजार आणि हिंसाचारामध्येही नशेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नशेमुळे या लहान मुलांचे बालपण उद्ध्वस्त होत आहे, मुलांचा मानसिक विकास नशेच्या तावडीत थांबून जातो. नकारात्मक विचार वेगाने वाढतात. पैशासाठी मुले खोटे बोलायला लागतात, जबाबदारीपासून दूर जातात आणि नशेकरिता मोबाईल, पर्स, चेन स्नॅचिंग, वाहनेचोरीसारखे गुन्हे करतात आणि ते मोठे होऊन गंभीर गुन्हे करायला लागतात. अशाप्रकारे समाजात एक नवीन गुन्हेगारी साम्राज्य सुरू व्हायला लागते. आजकाल किशोरवयीन मुले मोठय़ा गुह्यात खूपच सक्रिय दिसत आहेत. आपण दररोज अशा बातम्या पाहतो आणि वाचतो. कित्येकदा आपल्याला विश्वाससुद्धा बसत नाही की, ही एवढी लहान-लहान मुले माणुसकीला काळिमा फासणारी घाण कृत्यं कशी काय करू करतात? पण हे कटू सत्य आहे. कधी कधी लोक या मुलांना चोरी करताना पकडतात आणि त्यांना थोडेसे रागाहून, थापड मारून सोडून देतात, परंतु मुळात त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा किंवा सुधरविण्याचा प्रयत्न होताना दिसतच नाही. ही मुले आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत. जर आपण आज त्यांचे अस्तित्व व्यवस्थापित केले नाही तर आपण त्यांना भविष्यातील आधारस्तंभ कसे म्हणावे?

समाजाच्या परिस्थितीमुळेदेखील मुलांना गुन्हेगारीच्या जगात जाण्यास भाग पाडले जाते. रोजगाराच्या बाबतीत लोकांचे स्थलांतर, वाईट शेजार, वाईट लोकांची संगत, संस्कारांचा अभाव, घरात असंतोषाचे वातावरण, पालक मुलांची काळजी घेण्याऐवजी कामात व्यस्त, कुटुंबात ज्येष्ठांची कमतरता जी पालकांच्या मागे मुलांची काळजी घेऊ शकतात आणि बदलत्या तांत्रिक युगात मोबाईल-टीव्हीच्या माध्यमातून अवांछित गोष्टींपर्यंत सहज प्रवेश, ही अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे मुलांना गुन्हेगारीची संधी मिळते. पालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि इतर काही लोकांच्या चुकीच्या हेतूमुळे अल्पवयीन मुलांना ड्रग्सचे व्यसन जडते. एकदा व्यसनाधीन झाले की, ते अमली पदार्थांच्या लालसेपोटी चोरीसारखे गुन्हे करण्यास सुरवात करतात. त्यानंतर त्यांचे गंभीर गुन्हे करण्याची शक्यताही वाढते.

आपली मुलं आपली जबाबदारी आहे. आपल्या निष्काळजीपणाने मुलं बिघडतात आणि याची शिक्षा संपूर्ण समाजाला भोगावी लागते. मुले ही देशाचे भविष्य, मौल्यवान राष्ट्रीय वारसा आहेत. त्यांच्या खांद्यावर देश आणि कुटुंबाच्या भविष्याची मोठी जबाबदारी असते. म्हणून सरकार, समाज, पालक, दक्ष नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे की आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वस्थ, सुखरूप सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात वाढण्यास संधी द्यायला हवी, जेणेकरून ते देशाचे जबाबदार नागरिक म्हणून शारीरिकदृष्टय़ा सुदृढ, मानसिकदृष्टय़ा बुद्धिमान आणि नैतिकदृष्टय़ा सद्गुणी होऊन त्यांच्या जबाबदाऱया योग्यप्रकारे बजावण्यासाठी सक्षम होतील.

आपली प्रतिक्रिया द्या