सुरेल मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कमलेश भडकमकर (संगीतकार)

गाणं हीच माझी आवड आणि रोजीरोटी. या स्वर-सुरांतूनच आम्ही मदतीचा पाया रचला.

संगीत संयोजन ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लॉकडाऊनमध्ये आम्ही ‘वाजविता धनी’ नावाचा कार्यक्रम केला. त्याला लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही तेवीस जणांनी एकत्र येऊन घरात बसून हा कार्यक्रम रेकॉर्ड केला. हे आमच्यासाठी फार युनिक होते. या कार्यक्रमातून सगळ्या ज्येष्ठ मराठी संगीत संयोजकांना इन्स्टमेण्टल ट्रिब्युट दिलं. त्याचा पहिला भाग आम्ही ऑगस्टमध्ये रिलीज केला आणि दुसरा भाग दिवाळीत रिलीज करतोय, इतर कार्यक्रमांपेक्षा हा थोडा वेगळा प्रयोग या लॉकडाऊनमध्ये करता आला त्याचे समाधान आहे.

लॉकडाऊनमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करणं आमच्यासाठी आव्हानच होते. कारण हा सगळ्यांनी घरात बसून रेकॉर्ड केला होता. त्यात बरेच अडथळे येत होते. कोणी त्यात रस्त्यावरचा कुंत्रा भुंकायचा थांबला की, रेकॉर्ड करायचे. घरात पंख्याचा आवाजही असतो. त्यासाठी पंखा बंद करून रेकॉर्ड करायचे. प्रत्येकाच्या घरात मूल असल्यामुळे त्यांना सांभाळून, नीट वायफाय कनेक्शन, वाहनांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज थांबले की, आम्हाला रेकॉर्ड करावे लागायचे. रेकार्ंडग स्टुडिओत शूटिंग फ्लोअरमध्ये हे अडथळे येत नाहीत. त्यामुळे निर्विघ्नपणे आमची कामं होतात. सोळा-सोळा तास, अठरा-अठरा तास शूटिंग चालत अशा परिस्थितीत जिथे आम्ही दिलेलं काम निर्विघ्नपणे पार पाडतो.

सोशल डिस्टन्सिंगमुळे तेवीस जण एकत्र येऊन काम करणं जोखमीचं होतं. त्याला परवानगीच नव्हती. त्यामुळे हे सगळं करणं म्हणजे द्राविडी प्राणायाम होता आणि तो प्रयोग आम्ही एकत्रितपणे करू शकलो. कार्यक्रम करण्यासाठी जी गोष्ट करायला आम्हाला चार तास लागतात, तीच गोष्ट आम्हाला प्रत्येकाच्या घरून करायला दोन महिने लागले. खरचं आव्हान होतं. केवळ वादन शैली नाही. त्यासोबत तंत्रज्ञान वापरणं इथून सुरुवात होती. लोक जर तिकिटं काढणार असतील तर घरी रेकॉर्ड केलेला साऊंड चांगला येणार नाही, तर तो आम्ही अद्ययावत स्टुडिओत जाऊन मिक्स केला.

ऑनलाइन कार्यक्रमामुळे आम्हाला ग्लोबल ऑडियन्स मिळाला. मला असं वाटतं की, लॉकडाऊनमुळे खूप छान वेळ मिळाला. आपण मुंबईत राहतो. धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या घरीच कसेबसे पोहोचतो तर एक निवांत वेळ, चिंतन मनन करायचा वेळ मिळाला. या माध्यमातून कामाचं एक स्रोत निर्माण झालं, सगळ्यांनी फार सहकार्य केलं. त्यानिमित्ताने प्रत्येकाच्या हाती थोडे पैसे आले. दिवाळीमध्ये या संकल्पनेचा भाग दोन सादर करणार आहोत. मराठी संगीतकार, मराठी गायक, मराठी संगीत संयोजक यांचं संगीत क्षेत्रात योगदान इतकं मोठं आहे की, त्यामुळे मराठी संगीतकारांनी केलेला मराठी गाण्याचा प्रवास हा भाग एकमध्ये दाखवला आणि भाग दोनमध्ये आम्ही मराठी संगीत संयोजकांनी केलेला हिंदी गाण्यांचा प्रवास दाखवणार आहोत.