लेख : कोकणचा विकास आणि कोकणी माणूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सद्गुरू उमाकांत कामत

कोकणला खरंच कॅलिफोर्नियात परिवर्तन करण्याची गरज आहे किंवा कसे याचा विचार आजतागायत झालेला नाही.  किंबहुना कोकणपट्टीतील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिह्यांना अशा परिवर्तनाची गरज नाही. कोकण हे संपन्न आहे, सुखी आहे आणि ते तसे ठेवूनही कोकणाची उच्चस्तरावरील आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रगती आणि विकास करण्यासाठी कोकणी माणूस, त्याची बुद्धिमत्ता, संस्कृती, वनसंपदा, समुद्रकिनारे आणि निसर्ग सक्षम आहे.

कोकणचा आर्थिक विकास करून त्या आर्थिक विकासातून  कोकणी माणूस आणि संस्कृती भरभराटीला आणण्यासाठी कोकणची जमीन, हवामान, नगदी पीक, कोकणातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी, तलाव, किनारे, धबदबे, डोंगर, जंगले, जमिनीवरील आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, जॅम, तांदूळ, रबर, बांबू, पपया, अननस, आवळा, जांभूळ, चिक्कू, बोर, करवंद, केळी, सुरंगीची फुले, कोकणी मांसाहारी जेवण, समुद्रातून मिळणारे मासे आणि समुद्रातील पाण्यावर आणि समुद्रातील स्कुबा डायव्हिंगसारखे साहसी खेळ या सर्व घटकांचा उच्चस्तरावरील समन्वय साधून समर्थ कोकण, सुखी कोकण उभा राहू शकतो.  उपरोक्त नमूद केलेल्या नैसर्गिक कोकणी साधन संपत्तीचा व्यावसायिक सदुपयोग करूनच बागायती पीक, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि गालिचे, आयुर्वेदिक औषध,  अत्तर व्यवसाय, बांबू आर्ट, लाकडी खेळणी आणि फळ अशा पूरक व्यवसायांचे जाळे अखंड कोकणपट्टीत उभे करून निसर्गाला, पर्यावरणाला धक्का न लावता कोकणचा आर्थिक विकास निश्चितपणे होऊ शकतो. किंबहुना तो करून दाखवितो अशी जिद्द कोकणी माणसाने मनात धरली पाहिजे.

कुठल्याही प्रांताचा अथवा प्रदेशाचा आर्थिक विकासासाठी दळणवळणाची साधने, पक्के टिकाऊ रस्ते, अखंडित वीजपुरवठा, विमानतळ, दूरध्वनी, दूरसंचार आणि संगणक प्रणालीचे जाळे,  रुग्णालये, शिक्षण संस्था, कर्ज वितरण आणि ठेवी संचयासाठी बँका, मुबलक सुपीक जमीन, मुबलक पाणी अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित साधन सामुग्रीची नितांत आवश्यकता असते. आज कोकणात विमानतळ वगळता सर्व साधनसामुग्री उपलब्ध आहे. यात साधनसामुग्रीचा आणि कोकणातील समुद्र, नद्या, नगदी पीक, निसर्ग यांचा योग्य समन्वय साधून कोकणात आर्थिक सुबत्ता येऊ शकते. त्यायोगे सागरी उद्योग, हॉटेल आणि पर्यटन, खाद्यपदार्थांच्या संदर्भातील उद्योग धंदे भरभराटीला येऊ शकतील.

कोकणातील समुद्रात मिळणारे तारली,  कोळंबी,  शार्क-मोरी, सार्दिन, तून, सुरमई, पापलेट, करली, बोंबील, कॅटफिश, कुर्ल्या, खेकडे यासारख्या माशांवर प्रक्रिया करून निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे जाळे तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, ताडगोळे, जॅम, जांभूळ, बोर, करवंद, कोकम, पपई, अननस, चिक्कू या फळांवर प्रक्रिया करून त्या फळांचा रस आणि पल्प आणि तत्सम खाद्यपदार्थ तयार करून निर्यात करणाऱ्या उद्योगांचे जाळे उभे राहिले पाहिजे. कोकणात नारळाच्या धाग्यापासून दोरी, रस्सी बनवली जाते, पण नारळाच्या धाग्यापासून केरळात गालिचेदेखील बनवले जातात. हे ध्यानात घेऊन कोकणी तरुणाईने गालिचे बनवण्याच्या व्यवसायात उडी घेतली पाहिजे. जांभूळ हे डायबेटिसवर फार परिणामकारक औषध असून कोकणात मुबलक प्रमाणात जांभूळ मिळते. यास्तव जांभळाद्वारे डायबेटिसवर औषध बनवणाऱ्या कंपन्या,  तारली आणि शार्क माशाचे तेल बनवणाऱ्या कंपन्याही प्रस्थापित होऊ शकतात. यातून मोठय़ा प्रमाणावर स्थानिकांना रोजगार, कंत्राटदारी आणि पूरक व्यवसाय नक्की निर्माण होऊ शकतो. उपरोक्त नमूद केलेले सर्व पदार्थ, औषध,  गालिचे, माशाचे तेल यांना जगभर मागणी असून सदर पदार्थ,  तेल आणि गालिचे जगभर मोठय़ा प्रमाणावर विकले जातात याची जाणीव, माहिती आणि दाखल कोकणी माणसाने आता घेतली पाहिजे आणि त्यानुसार स्वतःचे प्रकल्प उभे करण्याचे धाडस कोकणी तरुणाईने दाखविले पाहिजे.

या निर्यातप्रधान छोट्या-छोट्या विविध प्रकल्पांचे जाळे प्रस्थापित करून विकसित करायला हवे. तसेच या उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थानापन्न करून केंद्र शासनाने उपरोक्त खाद्यपदार्थ, औषधे, मासे, मसाले आणि कोकण पर्यटनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खास कोकणसाठी ‘कोकण एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ स्थापन करावे. त्याचे मुख्यालय कोकणातच असावे.  दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने पणन व्यवस्थापनासाठी त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचे ‘पणन कौन्सिल’ सुरू केले पाहिजे. कोकणात पीक आहे, पण मालाला बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे आजतागायत कोकणी शेतकरी आणि उद्योजक यशस्वी होत नव्हते. केंद्र शासनाचे एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या पणन व्यवस्थापनामुळे कोकणी पदार्थांना, कोकणातील पर्यटनाला बाजारपेठ मिळणे सुलभ होईल. कोकण जागतिक नकाशावर प्रकाशात येईल.

रत्नागिरीला 167 किलोमीटर तर सिंधुदुर्गला 121 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मिळाला आहे. सदर किनाऱ्याचा उपयोग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कोकण पर्यटन’ विकसित केले पाहिजे. समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या कोकणी माणसांनी आता आपल्या जमिनी अजिबात विकता कामा नयेत. उपलब्ध जमिनीवर सामान्य माणसापासून आंतराष्ट्रीय पर्यटकांना हव्या असणाऱ्या सुखसोयी आणि सेवा पुरवणाऱ्या ‘रिसॉर्टस्’ची शृंखला  कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वीरीत्या उभी करून दाखवली पाहिजे. उपरोक्त नमूद केलेले मासे आणि त्यापासून कोकणी मसाल्यात बनविलेले खाद्यपदार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना नक्की आकर्षित करतील. शेजारचा गोमंतक आज केवळ पर्यटन व्यवसायात जगतो आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

आलिशान रिसॉर्टस्, दर्जेदार कोकणी जेवण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी कुशल कामगार वर्ग आणि कौशल्याची गरज भासेल. त्यासाठी येणाऱ्या काळात कोकणच्या पाचही जिह्यांत हॉटेल ऍण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पर्यटन व्यवस्थापनाची महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत. जेणेकरून भविष्यात रिसॉर्टस् सुरू करणाऱ्या तरुणाईची पुढील पिढी कौशल्य आत्मसात करून उद्योग करतील. या व्यवसायातूनदेखील कोकणात रोजगार आणि कंत्राटी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.

[email protected]