मुद्दा – पतंगाची भरारी थांबली!

>> पुरुषोत्तम  कृ. आठलेकर

मकरसंक्रांत हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात येथे साजरा होतो, तर याच दिवसापासून तामीळ लोकांच्या पोंगल या सणाला सुरुवात होते. महाराष्ट्रात भोगी, मकरसंक्रांत तर गुजरातमध्ये हा सण तीन दिवस साजरा होतो. पूर्वी हा सण मोठय़ा उत्साहात साजरा होत असे. आतासुद्धा होतो, पण आता स्वरूप थोडेफार बदलले आहे, तर पूर्वी हा तसा काही भागापुरताच मर्यादित होता. म्हणजे गिरगाव, दादर, लालबाग, परळ अशा खासकरून मराठमोळ्या वस्तीत मोठय़ा उत्साहात पार पाडला जायचा. परंतु बदलती परिस्थिती आणि जीवनशैली बघता या उत्सवातसुद्धा बदल होऊ लागले. मला आजही आठवते, तेव्हा आमच्या लहानपणी संक्रांतीच्या वेळेला थंडी चांगली असावयाची. त्यामुळे वातावरणसुद्धा फार छान असायचे. हवेत गारवा आणि वारा असल्यामुळे पतंग उडविण्याची मजा काही औरच असायची. हा सण सुरू व्हायच्या आधी एक आठवडा आमची जय्यत तयारी सुरू व्हायची. पतंग किती आणि कोठून आणावयाचे, मांजा घासून घ्यायचा का तयार घ्यायचा, पतंग आणि मांजासाठी नावाजलेला परिसर म्हणजे डोंगरी, भेंडी बाजार. तेथे आदल्या दिवशी रात्री जाऊन विविध प्रकारचे म्हणजेच दोन पटरी, तीन पटरी, चांदवाला, सूपवाला, कुद्दी (छोटा पतंग), ढोल (मोठा पतंग) असे विविध प्रकार तर लद्दीपासून बनवलेला मांजा आणायचो. गच्चीवर लाऊड स्पीकरवरील गाण्याच्या तालाने पतंगबाजीला सुरुवात होत असे. काही वेळातच संपूर्ण आकाश पतंगमय होऊन जायचे. पतंगाची कणी बांधणे, तो उंच आकाशात बदवणे, दुसऱयाचे पतंग लग्गी लावून कापणे आणि कापून गेलेले पतंग आकाशात आपल्या पतंगाला लटकवणे या सर्व कला आहेत आणि त्यासाठी थोडाफार सराव हा हवाच. दुसऱयाचे पतंग कापणे यासाठीसुद्धा काही डावपेच आहेत. मकरसंक्रांत म्हणजे वाडीतील चाळी, इमारती यांचे पतंगाचे युद्धच म्हणा. हे असे युद्ध संपूर्ण दिवस सुरू असायचे आणि मग रात्र झाली की, मेणबत्ती ठेवलेले आकाश कंदील सोडून या सणाची सांगता होत असे, पण या सर्वांसाठी तुमच्यातील कला, हौस, आवड याला वाव मिळत असे आणि त्यामुळेच या सणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, परंतु परिस्थिती बदलत चालली. चाळी/इमारती जीर्ण होऊ लागल्या. त्याची जागा आता उंच उंच टॉवर्सनी घेतली. स्वाभाविकच गच्ची हा प्रकार कालबाह्य होऊ लागला. समुद्रावरून येणारा सुसाट वारा टॉवर्समुळे अडवला जाऊ लागला. हवा नाही, वारा नाही. मग पतंग कसे उडवणार? जरी पतंगाची भरारी थांबली असेल तरी आठवणी मात्र कायमच्या मनात घर करून राहिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या