
>> प्रज्ञा कुलकर्णी
मकर संक्रांत म्हणजे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलून उत्तरेकडे सरकत जातो. म्हणून या काळाला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. सूर्याचे एका राशीतून दुसऱया राशीत जाणे याला संक्रमण म्हणतात. हे संक्रमण एकूण बारा वेळा होते, परंतु सूर्याचे कर्क राशीतून आणि मकर राशीतून जेव्हा संक्रमण होते तेव्हा बरेच बदल घडून येतात. सूर्याचे मकर राशीतून संक्रमण होत असताना सूर्याची गती उत्तरेकडे वळते. त्यामुळे दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होते. मकर संक्रांतीपासून ते कर्क संक्रांतीपर्यंतच्या या काळास उत्तरायण म्हणतात, तर कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळास दक्षिणायन असे म्हणतात. पौष या महिन्याला प्राचीन काळी ‘सहस्य’ या नावाने ओळखले जात असे. या महिन्यात रात्री पूर्व क्षितिजावर ‘पुष्य’ नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला ‘पौष’ असे नाव पडले. पौष महिन्यातील रविवार हे ‘आदित्य रविवार’ म्हणून ओळखले जातात.
पुराणात मकर संक्रांतीविषयी एक कथा आहे. फार पूर्वी संकासुर आणि किंकरासुर असे दोन बलाढय़ राक्षस होते. ते प्रजेला त्रास देत होते. त्यांचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि या दोन राक्षसांचा वध करून प्रजेला त्यांच्या त्रासातून मुक्त केले. म्हणूनच या संकरासुर आणि किंकरासुर राक्षसांच्या नावावरून देवीला ‘संक्रांत’ असे नाव पडले. देवीने या राक्षसांचा वध करून संक्रांत म्हणजे चांगली क्रांती केली, सुराज्य निर्माण केले या आनंदाप्रीत्यर्थ संकरासुराच्या स्मृतीने संक्रांत आणि संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंकरासुराच्या स्मृतीने ‘किंक्रांत’ असे दोन दिवस साजरे होऊ लागले. देवीने रात्रीच्या अंधारात या राक्षसांचा वध केला. त्यावेळी देवीने काळय़ा रंगाची साडी परिधान केली होती. देवीने दुष्ट आणि काळय़ा शक्तींचा नाश करून अंधकार नाहीसा केला आणि शांततेचा चांदणप्रकाश पाडला म्हणून तेव्हापासून संक्रांत सण साजरा करताना स्त्र्ाया काळय़ा रंगाच्या साडीवर पांढऱयाशुभ्र खडीच्या चांदण्या असलेल्या साडय़ा नेसून हा सण साजरा करू लागल्या.
आपल्या देशात वेगवेगळय़ा प्रांतात वेगवेगळय़ा नावाने आणि प्रकाराने मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. दक्षिण हिंदुस्थानात हा सण ‘पोंगल’ या नावाने साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात हा सण ‘खिचडी’ या नावाने तर बुंदेलखंडात ‘सुकरात’ किंवा ‘बुडकी’ या नावाने, आंध्र प्रदेशात ‘धनु संक्रांत’, पंजाबात ‘माघी’ तर गुजरातमध्ये ‘उत्तरायण’ या नावाने साजरा केला जातो. गुजरातमध्ये या सणाच्या निमित्ताने पतंग उडविण्याची प्रथा आहे.
पौष महिन्यातले हे दिवस थंडीचे दिवस असल्यामुळे या सणात तीळ आणि गूळ या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. तिळातील तेल हे पुष्टी प्रदान करणारे आणि शरीरास बलवर्धक असते. त्यामुळे तिळगुळाचे लाडू, वडय़ा, रेवडी, खीर, गुळाच्या पोळय़ा अशा पदार्थांचे सेवन करून आरोग्य सांभाळले जाते. थंडीमुळे शरीर शुष्क, कोरडे पडते. त्यावर तिळाचे तेल व तिळापासून बनवलेले पदार्थ गुणकारी ठरतात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ साजरी केली जाते. या दिवशी काळय़ा मातीचे घट म्हणजेच ‘सुगड’, त्यात ऊस, बोरे, गाजर, ओला हरभरा, मटारच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, रायआवळे भरून वाण दिले जातात. भोगी आणि मकर संक्रांत हे सण म्हणजे निसर्गाचाच उत्सव आहे. या दिवसात सारी सृष्टी धान्य, भाजीपाला, फळाफुलांनी बहरून आलेली असते. त्या सृष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपले आरोग्य आणि आपले पर्यावरण जोपासणे हाच या सणामागचा उद्देश आहे.






























































