मैत्री आणि स्नेह वाढवणारा सण

>> विलास पंढरी

मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्व धर्मीयांनी साजरा करावा असा आगळावेगळा सण म्हणजे मकरसंक्रांत. आपली संस्पृती ही कृषीप्रधान असल्याने या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे, फळांचे वाण (भेटवस्तू) एकमेकांना स्त्रिया देतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच मकर संक्रमण. म्हणून या दिवसाला मकरसंक्रांती म्हणून संबोधले जाते.

बरे बोलता सुख वाटते। हे तो प्रत्यक्ष कळते।
आत्मवत् परावे ते। मानीत जावे।
कठीण शब्दे वाईट वाटते। हे तो प्रत्ययास येते।
तरी मग वाईट बोलावे ते। काय निमित्त्ये।
आपणास चिमोटा घेतला। तेणे कासावीस झाला।
आपणावरून दुसऱयाला। राखत जावे।
पेरिले ते उगवते। बोलण्यासारिखे उत्तर येते।
तरी मग कर्पश बोलावे ते। काय निमित्त्ये।

समर्थ रामदासांनी कसे बोलावे याचे असे सुंदर वर्णन ‘दासबोधा’त केले आहे. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्व धर्मीयांनी साजरा करावा असा आगळावेगळा सण म्हणजे मकरसंक्रांत. आपली संस्पृती ही कृषीप्रधान असल्याने या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे, फळांचे वाण (भेटवस्तू) एकमेकांना स्त्रिया देतात. वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या पद्धतीने व नावाने हा उत्सव साजरा केला जातो. गुजरात व राजस्थानात ‘पतंगनो त्योहार’ (पतंगांचा सण) किंवा उतरण म्हटले जाते. गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांची खिचडी बनवली जातात. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात.

दक्षिण हिंदुस्थानात पोंगल सण तीन दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननू पोंगल या दिवशी गोठय़ातील जनावरांची पूजा केली जाते. याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात. आंध्र प्रदेशमध्ये तब्बल तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

पश्चिम बंगालमध्ये हुबळी नदीच्या काठावर गंगासागर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येत भाविक या उत्सवात सहभागी होतात. आसाममध्ये ‘भोगली बहू’ नावाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. शबरीमाला मंदिरात ‘मकर वल्लापू उत्सव’ या नावाने साजरा केला जातो.

हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. महाराष्ट्रात हा सण फारच आगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि हर्षोल्हासात तीन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवसास भोगी (सामान्यतः 13 जानेवारीला येतो) म्हणतात. या दिवशी अनेक भाज्या एकत्र करून पौष्टिक भाजी बनवतात. संक्रांत (सामान्यतः 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी) व किंक्रांत (संक्रांतीनंतरचा दिवस) अशी साजरी केली जाते. संक्रांतीला तिळाचा वापर अधिकाधिक प्रकारे केला जातो. उदा. तीळयुक्त पाण्याने स्नान करून तिळगूळ भक्षण करणे आणि इतरांना देणे, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावणे, पितृश्राद्ध करणे (यात तिलांजली देतात) इत्यादी. श्राद्धात तिळाचा उपयोग केल्याने असुर श्राद्धात विघ्ने आणत नाहीत अशी समजूत आहे. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत येणाऱया संक्रांतीला तीळभक्षण लाभदायक असते. अध्यात्मानुसार तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा सत्त्वलहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने सूर्याच्या या संक्रमण काळात साधना चांगली होण्यासाठी तीळ पोषक ठरतात.

तिळगुळाचे आरोग्यदृष्टय़ाही महत्त्व आहे. तिळात सत्त्वलहरींचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तिळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होण्यास सहाय्य होते. तसेच तिळगूळ एकमेकांना वाटल्याने सात्त्विकतेची देवाणघेवाण होते. हा काळ थंडीचा असतो. अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ उपयुक्त असतात. तसेच उष्ण असल्याने बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात यानिमित्ताने केला जातो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असा उदात्त हेतू या सणामध्ये दडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या