शिवमंदिरांच्या राज्यात – मालगुंडचे शिवत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेहंदळे

मालगुंड हे मराठीतील ज्येष्ठतम कवी केशवसुतांचं गाव म्हणून सुप्रसिद्ध आहे. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या बरोबरीने आघाडीवर असलेले सरदार बळवंतराव मेहेंदळे हेही मूळ मालगुंडचे असे स्थानिक सांगतात. पानिपतच्या लढाईनंतर त्यांच्या स्मरणार्थ मालगुंडमध्ये पेशव्यांनी ओंकारेश्वर नावाचे अतिशय देखणे मंदिर बांधले जे आता जीर्णोद्धारीत उत्तम स्थितीत आहे.

काही गावं असतातच अशी. तिथे पोहोचायचं म्हणजे आपण खूपच द्राविडी प्राणायाम केलेले असतात. पण जातानाचा रस्ता, त्यात लागणारे अनेक खेडय़ांचे उंबरे, एकेका उंबऱयाशी उभे असलेले तिथे पिकलेलं विकणारे खेडूत, टप्पे पार करत अचानक समोर सुंदर दत्त म्हणून उभा राहिलेला निसर्ग याचं पारडं त्या कष्टमय प्रवासापेक्षा वरचढ होतं आणि मुक्कामाचं गाव एक दिवा बनून राहतं… देवरुखजवळचं संगमेश्वर सोडल्यावर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची बांधकामं चालली होती. पर्यायी रस्ता तसा आडवळणीच होता; पण दुसरा पर्यायही नव्हता. या नाइलाजाने शिरलेल्या रस्त्यावर निसर्ग मात्र मुक्त उधळलेला होता. आंबा-फणसानी लगडलेली कित्येक वृक्षराया कोणी ओरबाडत नव्हते की सुरक्षा रक्षक नेमलेले नव्हते. हे खरं तृप्तीचं लक्षण म्हटलं पाहिजे जी आपल्याला दुर्दैवाने शहरात आढळत नाही. या रस्त्यावर आसुर्डे म्हणून गावापासून भिरकोंड, फुणगूस, जाकादेवी, चाफे, खंडाळा अशी सुरेख टुमदार गावागावांतून मजल दरमजल करत वरवडे गावापाशी येऊन थडकलो. तिथलं आदित्येश्वर हे निसर्गरम्य परिसरातलं शिवालय पाहून भंडारवाडा गाठला. या पूर्ण प्रवासात बराच वेळ बाव नदी तेवढी या जंगलमय लाल मार्गाला सोबत करत होती. रस्ता कधी कच्चा होता कधी पक्का, पण प्रत्येक वळण मनोहर दृश्य पटावर घेऊन येत होतं. भंडारवाडय़ासमोर समुद्राचं दर्शन झालं ते पाय खिळवून टाकणारं होतं. इथे समुद्र थोडा आत आला होता जिथे तिवरीचा विलोभनीय समुद्रकिनारा थाटलेला होता. तिथून एक रास्ता तिवरी बंदराकडे जात होता आणि दुसरा मालगुंडकडे. मालगुंडच्या रस्त्यात चंडिकादेवीचा गावासाठी संरक्षक पहारा दिसला. तिथे रवळनाथ, मानाई, महापुरुष, चंडिकादेवी, श्री देवी वरदान (ही वरदायिनी असावी) आणि जुगाई अशा प्राचीन मूर्ती गावाची वेस सांभाळताना दिसल्या.

मालगुंड हे मराठीतील ज्येष्ठतम कवी केशवसुतांचं गाव म्हणून सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचे मधले बंधू उत्तम व्याकरणतज्ञ होते हे मात्र फार थोडय़ा जणांना माहीत आहे. यांनी लिहिलेला ‘शास्त्राrय मराठी व्याकरण’ हा ग्रंथ आजही व्याकरणाचा अभ्यास करणाऱयांना मार्गदर्शक ठरला आहे. मालगुंड हे लहानसे गाव असूनही इथे बरीच महत्त्वाची माणसं होऊन गेली आहेत जी दखलविशेष आहेत. मालगुंड हे मेहेंदळे आडनावाच्या बऱयाच चित्पावन ब्राह्मणांचे गाव म्हणून मला अधिक कुतूहल होते. मालगुंडचा इतिहास प्राचीन असून तिथली रामेश्वर व चंडिका देवी ही ग्रामदैवतं याची ग्वाही देतात. ऐतिहासिक काळात बांधलेलं ओंकारेश्वर हे मंदिर एक खास इतिहास बाळगून आहे. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या बरोबरीने आघाडीवर असलेले सरदार बळवंतराव मेहेंदळे हेही मूळ मालगुंडचे असे स्थानिक सांगतात. पानिपतच्या लढाईनंतर त्यांच्या स्मरणार्थ मालगुंडमध्ये पेशव्यांनी ओंकारेश्वर नावाचे अतिशय देखणे मंदिर बांधले जे आता जीर्णोद्धारीत उत्तम स्थितीत आहे. या मंदिराचे विशेष सांगायचे म्हणजे मेहेंदळे आडनावाच्या लोकांनी संघटित होऊन याचा जीर्णोद्धार घडवून आणला. आजही मालगुंडमध्ये अनेक मेहेंदळे राहतात. नाना फडणवीस जातीने या मंदिराचे बांधकाम सुरू असताना येऊन गेले होते, असेही सांगितले जाते. अजून एक खासियत म्हणजे या मंदिरात शिवपंचायतन आहे तेही अतिशय सुंदर मूर्तींनी सजले आहे. तेथून जवळच असलेले सोमेश्वराचे देवालय त्याहून निश्चित प्राचीन दिसते. मंदिरासमोरची उंच दीपमाळ नजरेत भरते.

मालगुंडच्या परिसरात व्याडेश्वर नावाचे अजून एक सुंदर शिवालय आहे. हा सगळा भागच कोकणातल्या स्वयंभू समृद्धीचं सुखावह दर्शन घडवतो. आपल्या पूर्वजांनी सढळहस्ते दिलेला वारसा कसा जतन करायला हवा याचे मालगुंड हे उदाहरण वानगीदाखल नक्की देता येईल.

megmehen@gmail.