
>> अस्मिता प्रदीप येंडे
ललित निबंध म्हणजे कलात्मकता आणि आत्माविष्काराने परिपूर्ण असे लेखन होय. मराठी ललित बंधाचा प्रवाह ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, इरावती कर्वे, कुसुमावती देशपांडे, मधुकर केचे यांनी समृद्ध आणि संपन्न केला आहे आणि त्यात भर पडली आहे व्यास क्रिएशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला ललित निबंधाचा अनमोल संग्रह तो म्हणजेच लेखक डॉ. अनंत देशमुख लिखित ‘आंबेया डहाळी’ हा ललितबंध. ‘आंबेया डहाळी’ च्या निमित्ताने त्यांनी अनुभवलेले क्षण, अनुभवलेले अनेक व्यक्तिमत्त्व तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘आंबेया डहाळी’ या पुस्तकात 43 लेखांचा समावेश असून हे लेख अध्यात्मपर व ललितलेख अशा दोन भागांत विभागले आहेत. अध्यात्म आपल्या जगण्याला योग्य दिशा देण्याचे काम करते. ‘आत्मसाक्षात्काराचा क्षण’ या लेखात अनेक लेखकाच्या, कवींच्या कवितेचे उदाहरण देऊन आत्मसाक्षात्कारांचा क्षण नेमका कोणता हे सोप्या भाषेत उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
‘खेळ मांडीयेला वाळवंटी ’ असे म्हणत आपल्या आजूबाजूला कसे खेळ सुरू आहे याची जाणीव ‘एका खेळाची गोष्ट’ या लेखात होते. या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ असे की या लेखांमध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओव्या लेखाला त्यातील आशयाला धरून दिलेले आहेत. डॉ. अनंत देशमुख यांचे संत साहित्यावरील ज्ञान, प्रभाव यांची सावली संपूर्ण पुस्तकावर पडली आहे आणि ही सावली वाचकांना अध्यात्माचा विसावा देण्याचे काम करते. संसारात राहूनसुद्धा परमार्थ साधता येतो, असे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहेच. संस्कृत सुभाषितेसुद्धा वाचकांचे लक्ष वेधून घेतात.
ललितलेख या विभागातील लेख मनाला एक वेगळीच प्रसन्नता देतात. त्यासोबत विचार करायला भाग पाडतात. ‘स्थलांतर पक्ष्यांचे आणि माणसांचे’ या लेखातून स्थलांतर करून आलेले पक्षी जसे स्वगृही परततात तसे माणसे का वागत नाही? ही खंत व्यक्त केली आहे. ‘सल’ , ‘चेहरा’, ‘मुलं परत गेल्यावर’ या लेखातून लेखक डॉ. देशमुख यांनी अनुभवलेल्या क्षणांची, आठवणींची नक्षी पुन्हा रेखाटली आहे आणि या लेखनाद्वारे ते पुन्हा ते क्षण जगले आहेत. डॉ. देशमुख यांचे कोकणात बालपण गेल्यामुळे निसर्गरम्य कोकण या पुस्तकात शब्दातून सजला आहे. ‘घरभिंती’ हा लेख वाचून कोकणातील कौलारू घर, परसदार, अंगण, तुळशी वृंदावन, नारळाची झाडे, समुद्र सगळं चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. कोकणातील घरातील अनेक पारंपरिक वस्तू, घराची व्यवस्था, चूल हे सगळं शहरात पाहायला मिळत नाही. हेही दुर्मिळ होत चालले आहे. आपण कितीही शहरात वावरलो तरी सुट्टी सुरू झाली की पाय आपोआप गावाकडे वळतात. लेखकांच्या डोळ्यांनी टिपलेले हे कौलारू घर आणि घराच्या भिंती मनाला भुरळ पाडतात.
‘आंबेया डहाळी’ हे पुस्तक वाचून खरेच एक प्रकारची प्रसन्नता तसेच विचारांना पूरक अशी शिकवणसुद्धा मिळते. व्यास क्रिएशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात प्रकाशक नीलेश गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सुधीर मुणगेकर यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ समर्पकपणे साकारले आहे. ‘आंबेया डहाळी’ चा मनमोहक सुगंध वाचकांना नक्कीच मोहवून टाकेल…
आंबेया डहाळी
लेखक : डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स
मूल्य : रुपये 200/-





























































