कथानक येतंय ट्रॅकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– संजय कुळकर्णी

प्रेक्षकांच्या नाराजीचा त्या त्या मालिकांवर थोडासा का होईना परिणाम दिसू लागलेला आहे. कारण त्या मालिकांचे कथानक म्हणा किंवा ती मालिका मूळ ट्रकवर आल्याचे दिसून आले. विषयांतर जरूर झाले असेल, पण ते मान्य करायला त्या त्या मालिकांचे पटकथाकार तयार नाहीत. त्यांच्या मते विषयांतर होत नाही तर ते कथानक वाहिनीच्या प्रमुख असलेल्या टीमकडून आणि आमच्या मीटिंगमुळे कथानकाला मान्यता मिळालेली असते. प्रेक्षकांनी उगीचच त्याबाबतीत गैरसमज करून घेतलेला असतो.

आता हेच पाहा की, ‘आई कुठं काय करते’ ही मालिका भरकटत चालली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सौंदर्या ही कडक स्वभावाची असूनसुद्धा कारस्थानी आयेशा त्यांच्याकडेच वास्तव्याला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये अप्पूचा बालिशपणा अजूनही संपत नाही. हे पाहिल्यावर पटकथाकार, संवाद लेखक काय करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या संवाद लेखिका स्मिता प्रकाशकर म्हणाल्या, ‘विषयांतर होतं. नाहीतर त्यात एकसुरीपणा येतो. वेगळेपणा पाहिजे की नको? गोष्ट कशी जाणार, तिचा प्रवास कसा असेल हे वाहिनी आणि आम्ही ठरवितो. घटनांबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. कलाकारांना आम्ही बांधू शकत नाही. त्यामुळे कधी ना कधी कथानकाचा ट्रक हा बदलावा लागतो.’

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचे पटकथाकार अभिजित गुरू यानं त्याबद्दल स्पष्ट मत मांडलं. अभिजित गुरू म्हणाला, आम्ही लिहून दिलेली पटकथा वाहिनी संमत करते. त्यांना ती आवडली नाही तर त्या कथानकावरची नव्यानं ती पुन्हा द्यावी लागते. आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचे 800 भाग होऊनसुद्धा तसं होतं. कारण वाहिनीवाल्यांना त्या त्या मालिकेचा टीआरपी वरच्या आलेखात ठेवावा लागतो. कारण त्यावर जाहिराती अपेक्षित असतात. आम्ही लेखक म्हणून नोकरी करीत असतो. जरी मी पटकथाकार असलो तरी ती पटकथा माझी नसते. त्यावर माझा हक्क नसतो.

अभिजित गुरू पुढे म्हणाला, मालिकेसाठी वाहिनीवाल्यांची एक रिसर्च टीम असते. महिला प्रेक्षक वर्ग मालिका जास्त पाहतात. मालिकांचा टीआरपी हा नेहमी चांगलाच असतो.’ अभिजितच्या बोलण्यात स्पष्टपणा जाणवला. वाहिनीवाल्यांची करोडो रुपयांची मालिका निर्मितीत उलाढाल असल्यामुळे तेसुद्धा कसोशीनं करीत असतील यात दुमत नाही. शेवटी व्यावसायिक गणितं त्यांना सांभाळावी लागतात. प्रेक्षकांना मनोरंजन हवं आहे. ते जर कमी जास्त प्रमाणात झालं
तर त्यांनासुद्धा बोलण्याचा अधिकार आहे. कारण टाळी एका हातानं वाजत नाही.

रिसर्च टीम काय करते

वाहिन्यांच्या रिसर्च टीमचे काम कसे चालते, यावर अभिजित गुरू म्हणाला, प्रेक्षकांना कळण्यासाठी मी स्पष्टीकरण देतोय की, रिसर्च टीम महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात जाते. तिकडच्या महिला प्रेक्षकांबरोबर हितगुज करते. त्यांना त्या त्या मालिकेबद्दल आणि कथानकाबद्दल प्रामाणिकपणे प्रश्न विचारते. तो सर्व डेटा जमवून आमच्याबरोबर मीटिंग घेतात. आता ‘रंग माझा वेगळा’ गेली साडेतीन वर्षे नंबर वन पदावर आहे. काही प्रेक्षकांना मालिका आवडत नसतील, पण 80 टक्के प्रेक्षकांना त्या आवडतात.