
लेखाच्या छायाचित्रात दिसणारी ही पाहुणेमंडळी माणसांच्या वस्तीतली नाहीत. पत्र पाठवून, मेल करून, फोन-एसएमएस करून येणारी नाहीत. तसेच ‘अतिथी’ही नाहीत. उलट त्यांच्या आगमनाची सांवत्सारिक ‘तिथी’ किंवा वेळ अगदी अचूक ठरलेली असते. त्यांच्या इवल्याशा जीवनात कधी तितक्याच इवल्याशा पंखांवर विराट आकाश ‘पेलत’ ही मंडळी पृथ्वीच्या या भागातून त्या परिसराकडे गगनभरारी घेत असतात. त्यांच्या बाबतीत हे सारं ‘नॅचरल इन्स्टिंक्ट’ किंवा नैसर्गिक पेरणेने घडतं. वर्षानुवर्षे त्याच हवाई मार्गाने हजारो किलोमीटर अंतर कापत त्यांचे थवे बरोबर ठरल्या ठिकाणी उतरतात. बहुधा त्यांचा प्रवास समूहाने असतो, परंतु काही वेळा एकट्याच्या पंख बळावर विश्वास ठेवून एखादं दूरदेशींचं खरंखुरं पाखरू अचूक एका दिवशी तुमच्या अंगणातल्या झाडावर दिसू लागतं.
मुंबईसारख्या कोलाहलाच्या शहरातही अशी पाहुणे मंडळी बोलावता येतात. आमंत्रणाच्या मानपानाची त्यांना गरज नसते. खरं तर माणसांच्या जीवन पद्धतीमधली औपचारिकता त्यांना ठाऊक असण्याचं कारणच नसतं. पृथ्वीव्यापी भरार्या घेण्यासाठी त्यांना ना कोणाची परवानगी लागत ना कोणाची मदत. स्वयंसिद्ध असे हे मोहक जीव त्यांच्या आगमनाने जिथे जातील तिथला परिसर प्रसन्न करतात. ‘बॅब्लर’ नावाचा चार ते पाच ग्रॅम वजनाचा पक्षी थेट सायबेरियातून हिंदुस्थानात येतो. आणि त्याचा इथला वस्तीकाळ संपला की निमूट निघून जातो आणि पुन्हा पुढच्या वर्षी अचूक येतो. ऋषितुल्य पक्षी अभ्यासक सलीम अली यांनी मुंबईतल्या एका गोल्फच्या मैदानावर दरवर्षी येणार्या पक्ष्यांचं निरीक्षण केलं होतं.
हळद्या (गोल्डन ओरिसॉल), खंड्या (किंगफिशर), रॉबिन (दयाळ), हुद्हुद् (हुपू) भारद्वाज असे किती तरी पक्षी तर दरवर्षी आमच्या राजावाडीत दिसले आहेत. वर्षानुवर्षे तुरेवाला हुद्हुद् पक्षी आमच्या घरामागच्या हिरवळीवर यायचा. जवळच्याच शेवग्याच्या खोडात चोचीने छिद्र पाडून घरटं करणारा तांबट पक्षी (कॉपर स्मिथ) दिसायचा. त्यांच्या वार्षिक आगमनाची मी आतुरतेने वाट पाहायचो. त्यांचे फोटोही तेव्हा घेतले होते. काळाच्या ओघात त्या पक्ष्यांचं येणं थांबलं आणि फोटोंचे रंगही उतरले. वाढतं प्रदूषण सगळ्याच गोष्टींवर आक्रमण करू लागलं.
तरीही टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये सिगल हा समुद्री ससाणा पक्षी हिवाळा साजरा करायला मुंबईच्या परिसरात आल्याची दृश्यं बघितली आणि पक्षीनिरीक्षणाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आजही कधी कधी शिवडीला फ्लेमिंगो पाहायला जातो, परंतु पूर्वी आसपासच्या परिसरातही विविध पक्षी त्यांच्या त्यांच्या मोसमानुसार सहजतेने दिसायचे तसे दिसत नाहीत. टुमदार घरांच्या मानवी वसाहती आपल्या छत्रछायेखाली दडवून आभाळाला भिडलेल्या झाडामाडांची संख्या रोडावली, काँक्रीटच्या जंगलाने आकाश गाठलं. पन्नास-साठाव्या मजल्यांवरून महावृक्षसुद्धा ठेंगणे पक्षी अगतिक झाले. काही पक्षी तर यायचेच बंद झाले. रंगीबेरंगी पिसांचं मृदू मुलायम शरीर सांभाळत ही विविध प्रजातींची अस्मानी मंडळी स्थलांतर करतात ती मुख्यत्वे प्रजोत्पादनासाठी. त्यांच्या जैविक साखळीला पुढे नेण्यासाठी जे वातावरण आवश्यक असतं तसं जिथे मिळेल तिथे ते जातात. आपल्याला वाटतं पक्षी थंडीच्या मोसमात आपल्याकडे येतात. म्हणजे ते येतात तेव्हा थंडीच असते, पण ती आपल्यासाठी कारण बहुतेक वेळा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील उत्तरेकडून येणार्या पक्ष्यांसाठी तिथलं वातावरण डिसेंबर ते मार्चपर्यंत अतिशीत असतं. याचं कारण म्हणजे सूर्याचं दक्षिणायन. दक्षिण गोलार्धात दिवस मोठा झाला की तिथे उन्हाळा आणि आपल्याकडे हिवाळा सुरू होतो. जसजसं उत्तर दिशेला जावं तसा दिवस अधिकाधिक लहान आणि थंडी जास्त. म्हणून हे पक्षी त्यांना सुखद वाटणार्या ऊबदार थंडीच्या शोधात आपल्या देशात येतात. महाराष्ट्र साधारण एकोणीस उत्तर अक्षांशावर आहे. आपल्याकडे थंडी पडते ती सुखावह असते. पक्ष्यांना त्यांच्या पुनरुत्पादनासाठी हे वातावरण पोषक वाटतं. मग त्यांचे थवेच्या थवे पाणथळ जागा व्यापून टाकतात. तिथला त्यांच्या कलख, पंख पसरून चालणारा नाच आणि त्यांचं देखणेपण नुसतं पाहायलाही मनोहारी असतं. ते कॅमेराबद्ध करता आलं तर अतिशय चांगलं. मात्र त्या नादात या पक्ष्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी ते त्यांच्या ‘फोटो’चे भुकेले नसतात. आपणच असतो. त्यामुळे या आकाशी झेपावत येणार्या पाहुण्यांची सन्मानपूर्वक सरबराई करायला हवी. त्यांच्या सहजीवनापासून माणसानेही काही शिकायला हवं. दूरवरून येऊन आपल्या धकाधकीच्या जीवनातले चार क्षण प्रसन्न करणार्या उडत्या जीवांविषयी कृतज्ञता हवीच.






























































