आता शस्त्रांवर मानसिक नियंत्रण?

>> स्पायडरमॅन 

मनाच्या शक्तीद्वारे नियंत्रित करता येणारी शस्त्रे आणि त्या प्रकारातील तंत्रज्ञान हे कायमच शास्त्रज्ञांचे स्वप्न राहिले आहे. जगात अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये यासंदर्भात संशोधनदेखील चालू आहे. आजवर चित्रपट अथवा कथा कादंबऱ्यांमध्येच समोर आलेले हे तंत्रज्ञान आता प्रत्यक्षात अवतरण्याची शक्यता आहे. DARPA (Department of Defense’s research arm) ही अमेरिकेची संरक्षण संस्था आता अशा प्रकारचे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी गांभीर्याने विचार करत असून त्यासाठी आता शास्त्रज्ञांना मोठ्या मोबदल्यावर नेमलेदेखील जात आहे.

नॅनो टेक्नॉलॉजी, इन्फ्रारेड बीम्स आणि आनुवंशिक शास्त्र या सर्वांची मदत घेऊन सैनिकाचे मनदेखील सहजपणे वाचू शकेल असे तंत्रज्ञान बनवण्यासाठी या शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले जात आहे. मानवी मनाचे नियंत्रण असणारी आणि केवळ एखाद्या इशाऱ्यावर अथवा छोटय़ाशा हालचालीवर उड्डाण करणारी ड्रोन्स वा इतर शस्त्रे हा या संशोधनाचा पुढील टप्पा असणार आहे. Next-Generation Nonsurgical Neurotechnology (N3) या कार्यक्रमाच्या अंतर्गत एकूण शास्त्रज्ञांच्या सहा टीम्सना वित्त पुरवठा केला जाणार आहे. मानवी मेंदू आणि मशीन अर्थात यंत्र यांच्यामधला दुहेरी संवाद अतिजलद आणि सोपा बनवणे, त्यातील शक्य ते सर्व अडथळे दूर करणे असे लक्ष्य या शास्त्रज्ञांना देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान अधिक प्रगत झाल्यास एका मानवी मेंदूतून दुसऱ्या मानवी मेंदूला कुठल्याही साधनाशिवाय संदेश पाठवणे अथवा एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत फोटो शेअर करणेदेखील शक्य होण्याची शक्यता आहे. समजा एखादे ड्रोन उडवत असताना अथवा प्रचंड मोठ्या प्रमाणातील डाटा सर्च करत असताना सध्या आपण आधी आपल्या मेंदूद्वारे बोटांना हालचालींची आज्ञा देतो. त्यानंतर या बोटांच्या विशिष्ट हालचालींद्वारे मशीनला त्याने काय कार्य करायचे आहे याच्या आज्ञा आपण जारी करतो. याऐवजी मानवी मेंदूतील तरंगाद्वारे थेट मशीनबरोबरच संवाद साधणे आपल्याला शक्य झाले तर हा मधला किचकट वेळ पूर्णपणे तर वाचेलच, पण थेट संवादाने कामाचा वेग आणि अचूकतादेखील प्रचंड वाढणार आहे.