मुंबईचे पाणी योग्य

1271

>> प्रमोद कांदळगावकर

राज्यातील पिण्याचे पाणी नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईचे पाणी योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यातही इतरत्र राज्यापेक्षा मुंबईचे पाणी कशाप्रकारे योग्य आहे त्याचा अहवाल देण्यात आला आहे. ही बातमी समस्त मुंबईकरांना सुखावह अशीच आहे. यानिमित्ताने मुंबई महानगरपालिकेचे खास अभिनंदन करायला हवे. ते याकरिता की मुंबई महापालिका शुद्ध पाणीपुरवठा व्हावा याकरिता कित्येक वर्षे प्रयत्नशील आहे. त्यासाठी जलविभाग आणि आरोग्य खाते एकत्रितपणे काम करीत आहेत. शासकीय सुट्टय़ा सोडून 24 विभागांतून नित्यनियमाने पाण्याचे नमुने घेण्यात येतात. ते दादर येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेत तपासले जातात. रोजच्या रोज तपासणी करून 24 तासांच्या आतमध्ये पाण्याचा अहवाल तत्काळ ईमेलद्वारे विभागाकडे पाठविण्यात येतात. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया धरणातून पाणी भांडुपच्या संकुलात येते तेथून शुद्ध करूनच मुख्य जलवाहिनीमधून घराघरात सोडण्यात येते अशी कार्यपद्धती अनुसरून नियमित पाणीपुरवठा होतो. तथापि मुंबईची लोकसंख्या वाढत गेली; तशा झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या. अगोदरपासून मुंबई महानगरपालिकेकडून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या तशाच खाली राहिल्या त्या सडल्या आणि पाणीपुरवठा अशुद्ध स्वरूपात होऊ लागला. त्यांचे खापर मुंबई महानगरपालिकेवर फोडण्यात आले. मुंबई महानगरपालिकेतील दुहेरी खात्यांतील प्रमुखांनी सातत्याने जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला की, आमचे पाणी शुद्ध आहे. जी समस्या आहे ती तुमच्याकडे आहे. त्यावर कधीच विश्वास ठेवण्यात आला नाही. दादर प्लाझा सिनेमा येथे सर्वसुविधांयुक्त प्रयोगशाळा कार्यरत करण्यात आली असून देशातील ती प्रथम क्रमांकाची प्रयोगशाळा आहे. या निमित्ताने लोकांनी मुंबई महानगरपालिकेचे पर्यायाने काम करणाऱया कर्मचाऱयांचे अभिनंदन करायला हवे. ज्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा हात असेल त्या ठिकाणी जनतेही मुंबई महापालिकेला सहकार्य करावे.

आपली प्रतिक्रिया द्या