लेख – ठसा – संगीतकार लक्ष्मण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

अनेक मराठी-हिंदी लोकप्रिय चित्रपटांचे संगीतकार राम-लक्ष्मण यांच्या जोडीने चित्रपटसृष्टीला असंख्य गाणी दिली. त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील कितीतरी चित्रपट गाजले. या राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण विजय पाटील यांच्या निधनाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. रुपेरी पडद्यावर ‘संगीतकार राम-लक्ष्मण’ असे नाव झळकताच आठवतात ते दादा कोंडके यांचे एकापेक्षा एक गाजलेले अनेक मराठी चित्रपट आणि राजश्री प्रॉडक्शन! या दोन्हींच्या माध्यमातून या जोडीने आपल्या कार्यकौशल्याने रसिकांच्या मनावर छाप सोडली.

राम-लक्ष्मण यांच्या संगीताने गाण्याच्या मधुरतेला साज चढलेला असायचा. या दोघांच्या कारकीर्दीच्या प्रवासात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचाही मोठा सहभाग राहिला. उषाताई मंगेशकर तर म्हणतात, ‘‘मी आणि दीदींनी राम-लक्ष्मण यांनी संगीत दिलेली सर्वात जास्त गाणी गायली आहेत. आणि मराठीतील बहुतेक गाणीही आम्हा तिघी बहिणींबरोबर काम करणाऱया संगीतकारांपैकी ते एक महत्त्वाचे होते.’’ यातूनच संगीतकार राम-लक्ष्मण यांच्या जोडीचे महत्त्व अधोरेखित होते. राज्य सरकारच्या लता मंगेशकर पुरस्काराने जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा सन्मान झाला होता. त्यांनी संगीत दिलेला सुपरडुपर हिंदी चित्रपट ‘मैने प्यार किया’ होय. त्याच्या सर्वोत्तम संगीतासाठी फिल्मफेअर या सन्मानाने पाटील यांचा गौरव झाला होता.

राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण (विजय पाटील) यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी नागपुरात झाला. संगीताची आवड तर त्यांना बालपणापासून होती. संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी वडील काशीनाथ आणि काका प्रल्हाद यांच्याकडे घेतले. त्यानंतर त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षीच मुंबई गाठली आणि आत्मविश्वासाच्या बळावर मराठीसह बॉलीवूड गाजवण्यास प्रारंभ केला. एका ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात त्यांची ओळख बासरीवादक सुरेंद्र हेंद्रे यांच्याशी झाली. ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात विजय पाटील हे ऍकॅर्डियन वादक होते. दोघे मिळून ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करीत असत. एका कार्यक्रमाच्या वेळी दादा कोंडके यांची नजर या दोघांवर पडली. आणि दादांनी त्यांची निवड ‘पांडू हवालदार’ चित्रपटासाठी संगीतकार म्हणून केली. त्यांची निवड करूनच दादा थांबले नाहीत, तर या जोडगोळीचे ‘राम-लक्ष्मण’ असे नामकरणही करून टाकले.

दुर्दैवाची गोष्ट अशी घडली की, ‘पांडू हवालदार’ हा लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच राम-लक्ष्मण जोडीतील राम-सुरेंद्र हेंद्रे यांचे 1976 साली किडनीच्या आजाराने निधन झाले. विजय पाटील यांनी आपला सहकारी पंचेचाळीस वर्षांपूर्वी गमावला. मात्र या सहकाऱयाची पुढील काळात सदैव आठवण असावी यासाठी मराठी-हिंदीतील चित्रपटांना संगीतही ‘राम-लक्ष्मण’ याच नावाने दिले. दोन्ही चित्रपटसृष्टीत ही जोडी आपल्या कार्यकर्तृत्वाने अजरामर ठरली. संगीतकार लक्ष्मण यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या ‘एजंट विनोद’ या चित्रपटास प्रथम संगीत दिले. 1989 च्या सुमारास ‘मैने प्यार किया’ आणि 1994 च्या सुमारास ‘हम आपके है कौन’ या सुपरडुपर चित्रपटास त्यांचेच संगीत होते. या दोन्ही हिंदी चित्रपटांनी इतिहास तर निर्माण केलाच, पण त्याचसोबत संगीतकार म्हणून आपली स्वतंत्र नाममुद्राही ठसठशीत अधोरेखित केली. त्यांच्या संगीत दिग्दर्शनात आलेले चित्रपट पत्थर के फुल, हंड्रेड डेज, हम साथ साथ है, हमसे बढकर कौन, सुन सजना, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, दिल की बाजी यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांची नावे सांगता येतील.

राम-लक्ष्मण यांनी संगीत दिलेली सर्वाधिक गाणी लता मंगेशकर, उषा मंगेशकर यांनी गायली आहेत. ‘मैने प्यार किया’मध्ये त्यांनी सलमान खानसाठी पार्श्वगायक म्हणून एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज वापरला. विशेष म्हणजे या जोडीने संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांतून लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, अलका याज्ञिक, महंमद रफी, किशोरकुमार, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी अशा नामवंत गायकांनी गाणी गायली आहेत. देव आनंद, मनमोहन देसाई, महेश भट यांच्यासारख्या दिग्गजांसोबत विजय पाटील यांनी संगीत दिग्दर्शनाच्या निमित्ताने काम केले. मराठी, हिंदी आणि भोजपुरी अशा भाषेतील 75 हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मराठी चित्रपटांच्या प्रवासात दादा कोंडके यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर, आपली माणसं यांचे संगीत अर्थात राम-लक्ष्मण या जोडीचेच होते. या जोडीने दिलेले अनेक मराठी-हिंदी चित्रपट केवळ गाजले असे नाही, तर त्यातील गाणी कसदार, दमदार संगीत दिग्दर्शनाने रसिकांच्या कायम लक्षात राहिली आहेत. ही अजरामर गाणी नुसती आठवून पहा… ढगाला लागली कळं, अंजनीच्या सुता, अशी एकाहून एक गाणी प्रचंड गाजली. राम-लक्ष्मण या लोकप्रिय जोडीतील राम-सुरेंद्र हेंद्रे पंचेचाळीस वर्षांपूर्वी गेले. लक्ष्मण (विजय पाटील) नुकतेच गेले. मराठी, हिंदी संगीताचे भावविश्व समृद्ध करणारी ही जोडी आता काळाच्या पडद्याआड गेली असली तरी त्यांच्या दिग्दर्शनातील गाणी मात्र प्रदीर्घकाळ अवीटच राहतील.