मुद्दा – मोदींचे फसलेले अमेरिका धोरण!

<<< सद्गुरू उमाकांत कामत >>>

आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन देशांच्या नेत्यांमध्ये वैयक्तिक मैत्री कधी प्रस्थापित होत नसते. दोन्ही नेते स्वतःच्या देशाचा फायदा कसा होईल, हे पाहत असतात. मोदींना हे सर्वसामान्य सत्य समजले नाही. ते टिपिकल पद्धतीने गळाभेटी, प्रत्येकाला ‘माझा मित्र’ म्हणून स्वतःची आणि देशाची फसवणूक करून घेत होते. ट्रम्प हे एक उथळ व्यक्तिमत्त्व असून दीर्घद्वेषी आहेत, मनात राग धरून ठेवतात. त्यांच्या या स्वभावाला धरून संधी मिळेल तिथे ते आता मोदींना त्यांची जागा दाखवून देत आहेत.

खरं तर अमेरिका हा देश कुठल्याही देशाचा मित्र होऊ शकत नाही हे ऐतिहासिक सत्य आहे. अमेरिका लष्करशहा, हुकूमशाही, अत्याचारी राजवटीशीदेखील आजवर जुळवून घेत आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इजिप्त हे त्यातील काही संदर्भ. अमेरिकेने लोकशाही वाचवण्यासाठी कधी जीव ओतून मदत केल्याचा इतिहास नाही. जगातील सर्व क्षेत्रांतील, सर्वोत्तम व्यावसायिक, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि संशोधक अमेरिकेत यावेत आणि त्यांच्या सहकार्याने अमेरिकेचा विकास सातत्याने होत राहावा ही अमेरिकेच्या मूळ संस्थापकाची विचारधारा ट्रम्प सत्तेवर येईपर्यंत होती, पण ट्रम्प यांनी या मूळ विचाराला तिलांजली देत ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देऊन निवडून आले आणि अमेरिकेसह साऱ्या जगाला संकटात लोटत आहेत.

अमेरिका आणि भारत गेल्या 78 वर्षांत कधीही मित्रराष्ट्र होऊ शकलेले नाहीत हे लक्षात घ्यायला हवे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नेहरूंच्या अलिप्त राष्ट्र संकल्पनेला अमेरिकेचा विरोध होता, भारताच्या पूर्वीच्या सोव्हिएत युनियनबरोबर असलेल्या लष्करी, आर्थिक संबंधांमुळे अमेरिकन राज्यकर्ते भारताकडे सदैव संशयाने पाहत आले आहेत. त्यानुसार भारताची आर्थिक, लष्करी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने आजपर्यंत केलेला आहे. त्यातून निक्सन-इंदिरा गांधी वाद पुढे आला. 1992 पासून भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यापासून अमेरिकेला 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या सर्व क्षेत्रीय बाजारपेठा दिसू लागल्या आणि संवादाचे दालन दोन्ही बाजूंकडून उघडण्यात आले. त्याचीच परिणिती मनमोहन सिंगांच्या राजवटीत अमेरिकेच्या हवाई दलाला आपत्कालीन स्थितीमध्ये भारतीय भूमीवर इंधन भरण्याची परवानगी देण्याचा करार करण्यात आला. अमेरिका-भारत यांनी परस्परांच्या बाजारपेठा एकमेकांस खुल्या केल्या, भारताचे लष्करी साधनसामग्रीसाठीचे रशियावरील परावलंबित्व कमी झाले. अमेरिका-पाकिस्तानातील राजकीय, आर्थिक सामंजस्य विस्कळीत होऊ लागले. भारत-अमेरिका आर्थिक आणि लष्करी क्षेत्रात जवळ येत असल्याचे वाटत असताना 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले आणि अमेरिका-भारत ही जणू काही जुळी भावंडेच आहेत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः मोदी यांनी, गोदी मीडियाने आणि मोदी भक्तांनी सुरू केला.

पण यातील वस्थुथिती वेगळी होती हे दिसत होते. आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार अमेरिकेकडून होताना दिसत होता. अमेरिका भारताला लष्करी सामग्री देत होती, पण अमेरिकन तंत्रज्ञान देण्यास नकार देत होती. भारतीयांना अमेरिकेत प्रवेश देण्यावर प्रतिबंध लावत होती. आता तर भारताच्या पाकसोबतच्या लष्करी कारवाईवर मोदींना दम देत ‘मी युद्ध थांबवलं’ असे 41 वेळा ट्रम्प यांनी विविध माध्यमांद्वारे जाहीर करून भारताच्या सार्वभौमत्वाला इशारा दिला आहे. भारतावर 50 टक्के कर लादून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न ट्रम्प करीत आहेत.

यातून भारताच्या आणि विशेषकरून मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे पितळ उघडले पडले. खास करून त्यांचे अमेरिकेबाबतचे धोरण किती फसवे, पोकळ होते हे लक्षात आले. मी नमूद केल्याप्रमाणे दोन राष्ट्रप्रमुखांत वैयक्तिक मैत्री होत नसते, व्यवहार होत असतो. गळाभेट घेऊन देशाचं काही भलं होत नाही. आज अमेरिकेने भारताला आणि मोदी यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मोदींची ट्रम्प यांच्या दृष्टीने काय किंमत आहे हे साऱ्या देशाने पाहिले आहे. या फसलेल्या अमेरिकन धोरणातून स्वतः मोदी अथवा भाजप आणि मोदीभक्त काही धडा घेतील असे अजिबात वाटत नाही. ‘अहं ब्रह्म’ असे समजणाऱ्या मोदींचा पाय सतत खोलात जाणार आणि ते भारतासाठी धोकादायक आहे.

एकंदरीत अमेरिका हा देश स्वतःवर प्रेम करणारा देश आहे, अमेरिकेला स्वतःचे इंटरेस्ट संरक्षित करताना लोकशाहीशी काही देणे घेणे नसते. अमेरिका कुठल्याही देशाचा खरा मित्र होऊ शकत नाही आणि भारताचा तर नाहीच नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण ‘बटेंगे तो कटेंगे’ ही राजनीती करणाऱ्यांना हे सत्य कधी समजणार?