>> डॉ. मंजिरी भालेराव
नाशिकबाबत स्थानिक लोकांमध्ये एक मौखिक परंपरा आहे. त्यात ‘नाशिक नवखरांवर वसविले’ असे म्हटले जाते. याचा अर्थ जेक्हा नाशिक हे गाव जेव्हा कसले तेव्हा ते नऊ टेकडय़ांवर म्हणजे नऊ उंचवटे असलेल्या प्रदेशात कसले. आज जुने नाशिक या भागात हे नऊ टेक किंवा उंचवटे नावसकट माहीत आहेत. त्यामुळे नऊ टेकडय़ांच्या शिखरावर कसलेले ते ‘नवशिख’ म्हणजे ‘नाशिक’ अशी या नावाची व्युत्पत्तीआधी सांगितली जाते.
दुस्थानातील अत्यंत महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये नाशिकचा समावेश होतो. प्राचीन हिंदुस्थानी परंपरेने एकूण पाच प्रमुख क्षेत्रे सांगितली आहेत. त्यामध्ये नाशिकचा अंतर्भाव आहे.
नासिकं च प्रयागं च पुष्करं नैमिषं तथा
पञ्चमं च गयाक्षेत्रं षष्ठं कुत्र न विद्यते
नाशिक, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य आणि गया ही पाच क्षेत्रे आहेत. सहावे कोठेही नाही.
अशा प्रकारे नाशिक या शहराचे महत्त्व हिंदुस्थानभर सर्वमान्य आहे. गोदावरी या नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसले आहे. ही नदी हिंदुस्थानातली दुसऱया क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. नाशिकजवळ ती दक्षिणवाहिनी होते. असा प्रवाह खूप दुर्लभ आणि मोक्षप्रद असतो. तसेच रेवातीरी तपाचे, गंगातीरी मरणाचे आणि कुरुक्षेत्री दानाचे पुण्य मोठे असते असे मानले जाते. पण या सर्व गोष्टी जर गोदातीरी केल्या तर त्या मानवाला मोक्षप्रद होतात असे सांगितले आहे. तसेच रामायणात जरी प्रत्यक्ष नाशिकचा उल्लेख नसला तरी जनस्थानाचा आहे. जनस्थान म्हणजेच नाशिक असे परंपरा आता मानते. नाशिकशी रामाचा संबंध आलेला होता हीसुद्धा अनेक लोकांची अतिशय दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे या नगरला धार्मिक क्षेत्रात एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. या सर्व गोष्टींमुळे नाशिकला फक्त हिंदूच नव्हे तर इतर धर्मीयांनीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला दिसतो. पांडवलेणी नावाने प्रसिद्ध असलेली बौद्ध लेणी याच नगरात आहेत आणि जैनांच्या चन्द्रप्रभसुरी नावाच्या तीर्थंकराचे इथे मंदिर होते असा विविधतीर्थकल्प या ग्रंथात उल्लेख आहे. तसेच पऊमचरिउ जैन रामायणात शूर्पणखेचे नाक इथे कापल्यामुळे नासिक हे नाव आल्याचा उल्लेख मिळतो.
अतिशय प्राचीन काळापासून नाशिक या गावाचे उल्लेख विविध प्रकारच्या लौकिक साहित्यातसुद्धा आढळतात. नाशिकचा सर्वात प्राचीन संदर्भ आपल्याला कात्यायनाने आपल्या वार्तिकामध्ये दिला. पतंजलीने त्याचे स्पष्टीकरण देताना ‘नासिक्य हे नगर आहे’ असे सांगितले. याच काळातले अनेक अभिलेखीय पुरावे ‘नासिक’ हे एका मोठय़ा नगराचे नाव असल्याचे सुचवतात. त्यामुळे जवळ जवळ 2000 वर्षांहून जास्त काळ या स्थळाचे नाव नासिक किंवा नासिक्य आहे असे दिसून येते. नुकताच या सर्वांना उपोद्बलक पुरावा नाशिकमधील नाणेसंग्राहक श्री. चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील काही दुर्मिळ नाण्यांच्या स्वरूपात उपलब्ध झाला आहे. त्यात ‘न स क’ अशी अक्षरे असलेली काही नाणी नाशिकमध्येच सापडली आहेत. त्यावरून असे लक्षात आले की या नाण्यावर नाशिकचे नावच लिहिले आहे. त्यांनी असा निष्कर्ष काढला की ‘नाशिक’ हे साधारण 2300 वर्षापूर्वी एक ‘नगरराज्य’ असावे. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा श्री. चेतन राजापूरकर यांनी नुकताच 18 एप्रिल 2021 रोजी म्हणजे जागतिक वारसा दिनी जगासमोर मांडला. नाशिकचे हे प्राचीन हिंदुस्थानातील महत्त्वाचे स्थान जसे लिखित पुराव्यावरून सिद्ध होते तसेच त्याला पूरक अशा भौतिक किंवा पुरातत्वीय पुराव्यावरूनही स्पष्टपणे लक्षात येते. इ. स. पूर्व 2 ऱया शतकातील मध्य प्रदेशातील भारहूत या ठिकाणी असलेल्या स्तुपावर, नंतर इ.स.पूर्व 1 ल्या शतकातील बेडसे, नाशिक येथील लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये नाशिकचा उल्लेख पाहायला मिळतो. मुंबईहून थळघाटातून सह्याद्री पार करून देशावर येणाऱया आणि पुढे उत्तर हिंदुस्थानात जाणाऱया खूप प्राचीन व्यापारी मार्गावरचे मोठे स्थान म्हणून नाशिकची ही भरभराट प्राचीन काळापासून झालेली दिसते. आजही हा व्यापारी मार्ग तितकाच महत्त्वपूर्ण आहे. त्याचे नावच मुंबई-आग्रा महामार्ग असे आहे. म्हणजे जवळजवळ 2000 वर्षांहून जास्त काळ या मार्गाचा वापर सुरू आहे. व्यापारी मार्गांवर असलेल्या गावांची समृद्धी नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच असणार हे उघडच आहे. सर्वसाधारणपणे व्यापारी मार्गावर आढळतात तशा त्रिरश्मी नावाच्या बौद्ध लेणी (पांडवलेणी) इथेही दिसतात. खरे तर मुंबईहून येताना नाशिक शहरात प्रवेश करायच्या आधीच रस्त्याच्या उजवीकडे या लागतात. एका टेकडीवर जरी या 24 बौद्ध लेणी असल्या तरी रस्त्याच्या जवळ आणि टेकडीच्या पायथ्याशी 5 ते 6 खडकात कोरलेली मोठी पाण्याची टाकी आहेत. त्यांना वर्षभर भरपूर पाणी असते. सध्या ती तिथे झालेल्या दर्ग्याच्या आवारात आहेत आणि त्यांचा अजूनही वापर होतो.
अतिशय प्राचीन काळापासून या शहराचे नाव बदललेले नाही हे आपल्या लक्षात आले, पण हे नाव पडायचे नेमके कारण काय, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांचा समज असतो की लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक इथे कापल्यामुळे नासिक हे नाव या गावाला मिळाले. पण स्थानिक लोकांमध्ये अजून एक मौखिक परंपरा आहे, त्यामध्ये ‘नाशिक नवशिखरांवर वसविले’ असे म्हटले जाते. याचा अर्थ जेव्हा नाशिक हे गाव जेव्हा वसले तेव्हा ते नऊ टेकडय़ांवर म्हणजे नऊ उंचवटे असलेल्या प्रदेशात वसले. आज जुने नाशिक या भागात हे नऊ टेक किंवा उंचवटे नावासकट माहीत आहेत. त्यामुळे नऊ टेकडय़ांच्या शिखरावर वसलेले ते ‘नवशिख’ म्हणजे ‘नाशिक’ अशी या नावाची व्युत्पत्तीआधी सांगितली जाते. या जुन्या नाशकामध्ये जिथे जुनी गढी हा भाग आहे तिथे सर्वात पहिल्यांदा भगवानलाल इंद्रजी आणि नंतर हेन्री कझेंस यांनी पाहणी करून तिथे जुन्या वसाहतीचे अवशेष आहेत असे दाखवून दिले होते. त्यानंतर 1948 ते 1955 या काळात पुरातत्त्व खात्यातर्फे आधी म. न. देशपांडे आणि नंतर डेक्कन कॉलेजतर्फे ह. धी. संकालिया आणि शां. भा. देव यांनी मोठय़ा प्रमाणावर उत्खनन केले. प्रागैतिहासिक काळ ते ऐतिहासिक काळ यांच्या मधला दुवा म्हणजे ताम्रपाषाण युगाचा इतिहासपूर्व काळ हा इथे स्पष्टपणे लक्षात आला. या ठिकाणी साधारण इ.स. पूर्व 1500 ते इ.स. पूर्व 500 या काळातील महाराष्ट्रातील आद्य शेतकऱयांच्या वसाहती होत्या. त्याच सुमारास संगमनेरजवळील जोर्वे या ठिकाणी ताम्रपाषाण युगातील एका मोठय़ा स्थळाचा शोध लागला होता. पण त्याचा नेमका काळ कोणता हे ठरवणे अवघड जात होते. पण नाशिक येथील पुराव्यानुसार मौर्य काळातील उत्तरेकडची झिलईयुक्त खापरे ज्या स्तरात सापडत होती त्यापेक्षा खालच्या स्तरात ही जोर्वे संस्कृतीसारखी खापरे मिळाल्यामुळे त्यांचा काळ ऐतिहासिक काळाच्या आधीचा आहे हे पण लक्षात आले. त्यामुळे नाशिक येथील उत्खननामुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकऱयांच्या काळावर प्रकाश पडला. इथे जवळ जवळ हजार वर्षे सलग वस्ती होती. त्यामध्ये विविध प्रकारच्या भांडय़ांची खापरे, ज्यामध्ये जोर्वे संस्कृतीची वैशिष्टय़पूर्ण अशी तोटीची भांडी, वाडगे हे होते. तसेच प्राण्यांची हाडे, राख इ. मोठय़ा प्रमाणात सापडली.
नाशिकच्या उत्खननांतील वरचे स्तर हे ऐतिहासिक काळातले होते ज्यामध्ये इ.स. पूर्व 5व्या शतकापासूनचे अवशेष मिळाले. मौर्य काळात उत्तर हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर मिळणारी आणि दक्षिण हिंदुस्थानात फारशी न आढळणारी वैशिष्टय़पूर्ण काळ्या रंगाची झिलईयुक्त खापरे मोठय़ा प्रमाणावर मिळाली. त्यावरून आद्य ऐतिहासिक काळातला म्हणजे साधारणपणे इ.स.पूर्व 3 ऱया शतकातला नाशिकचा उत्तर हिंदुस्थानाशी असलेला संपर्क स्पष्ट होतो. अशा प्रकारे आधीच समृद्ध असलेल्या नाशिक या नगरीच्या समृद्धतेत दिवसेंदिवस भर पडत होती. सातवाहन राजांच्या काळात देश-विदेशातील व्यापाऱयांना आकर्षित करणाऱया उत्कर्षाच्या परमोच्च शिखरावर पोचलेल्या या नगरीची गौरवास्पद माहिती पुढच्या भागात पाहू.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)




























































