शारदीय नवरात्रोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विलास पंढरी

बहुतेक मराठी घरी नवरात्र परंपरागत पद्धतीने आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून देवीच्या टाकाचीही प्रतिस्थापना केली जाते. नवरात्रीची मूळ संकल्पना तीच असली तरी वेगवेगळ्या राज्यांत विविध प्रथा, परंपरा आढळून येतात.

प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि उमेद देणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे हिंदुस्थानींच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असला तरी गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दक्षिण हिंदुस्थानातील कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अत्यंत श्रद्धा, भक्ती तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. नवरात्रीची मूळ संकल्पना तीच असली तरी तिन्ही राज्यांत विविध प्रथा, परंपरा आढळून येतात. कर्नाटकात नवरात्रीत विविध बाहुल्यांची सजावट केली जाते. तेथे बाहुलीला गोंबे म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीस गोंबे पट्टडा म्हटलं जातं. तामीळनाडूतही बाहुल्यांची सजावट केली जाते. येथे बाहुलीला बोम्बई संबोधतात आणि बाहुल्यांच्या सजावटीला गोलू म्हणतात.

तामीळनाडूमध्ये नवरात्रीनिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांना विडय़ाच्या पानावर नारळ, हळकुंड, सुका मेवा तसेच फळ देण्याची प्रथा आहे, तर आंध्र प्रदेशात बाहुलीला कोलुवू म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीला बोम्माला कोलुवू म्हणतात. थोडक्यात तिन्ही राज्यांत बाहुल्यांची सुंदर सजावट केली जाते. या वेगळय़ा सजावटीबरोबरच नवरात्रात विविध नैवेद्य, पदार्थही दक्षिण हिंदुस्थानात केले जातात. पायसम अर्थात वेगवेगळय़ा चवींच्या खिरी, भाताचे विविध प्रकार तसेच उसळींचे प्रकार दक्षिण हिंदुस्थानात विशेषकरून केले जातात.

बहुतेक मराठी घरी नवरात्र परंपरागत पद्धतीने आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून देवीच्या टाकाचीही प्रतिस्थापना केली जाते. अनेक घरी नऊ दिवस गणपती अथर्वशीर्ष व देवीच्या स्त्राrसूक्ताचे पठण करून अभिषेक करण्याची परंपरा आहे. पहिल्या दिवशी विडय़ाच्या पानांची माळ घालण्यात येते. पुढचे आठ दिवस पिवळय़ा फुलांची, विशेषतः तिळाच्या फुलांची माळ घालण्याची प्रथा आहे. खेडेगावात तरवडाच्या आकर्षक पिवळय़ा फुलांची माळ घातली जाते. काही लोक नऊ दिवस उपवास करतात. काही झेपेल त्याप्रमाणे पहिल्या व शेवटच्या दिवशी उपवास करतात. काही लोक पूर्ण नऊ दिवस पायात चप्पल घालत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे या परंपरागत चालत आलेल्या या रूढींचे पालन या आधुनिक जगात बहुतेक कुटुंबे करीत आपला भक्तिभाव जागृत ठेवत आहेत. नवरात्रात तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा नऊ दिवस एकभुक्त उपवास करण्याची प्रथा आहे. हे जमत नसेल त्यांनी निदान आश्विन शुद्ध अष्टमीस तरी उपवास करावा असे शास्त्र सांगते.

जोगवा मागणे हा एक देवीची उपासना करण्याचा प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळतो. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळय़ात कवडय़ांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर पुढे दिलेले सुंदर भारुड रचले आहे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर मर्दना लागुनी
त्रिविध तापांची कराया झाडणी
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी।।
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारुनी माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा घेईन
भेदरहित वारिसी जाईन।।
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा
करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ सासऱया सांडीन कुपात्रा।।

या भारूडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत. नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी) आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात. देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहुरची रेणुका हे प्रत्येकी एक आणि नाशिक जिह्यातील सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मी देवीचा सदैव वास असतो.

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कऱहाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. देवळाच्या मुख्य वास्तूचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजूबाजूला मिळणाऱया काळय़ा दगडात केलेली आहे.

कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात आणि तिथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तिथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी दुसरे पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
धाराशीव जिह्यात असलेले हे देवालय महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता आहे. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागांची धाटणी हेमाडपंती आहे.

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगी देवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4,800 फूट उंचावरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंग गड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे असे वाटते. आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते.

[email protected]

summary- article on navratri festival by vilas pandhari