लेख – धोकादायक चीनबाबत सतर्क राहायलाच हवे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग पोतदार

चिनी विस्तारवादाची भूमिका हिंदुस्थानसाठी निश्चितच त्रासदायक आहे. संधी मिळेल तिथून घुसखोरी करणे, शक्य तितक्या कुरापती करून हिंदुस्थानला हैराण करणे आणि हिंदुस्थानच्या शत्रूराष्ट्रांना मदत करून हिंदुस्थानवर कुरघोडी करणे ही चिनी विस्तारवादाची त्रिसूत्री आहे. म्हणूनच चीनसंदर्भात होणाऱ्या सगळ्याच घडामोडींबाबत सजग आणि सतर्क राहून पावले उचलत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. 1962च्या युद्धात गाफीलपणाचे चटके आपण भोगले आहेत… आता पुन्हा गाफील राहून चालणार नाही.

देशाला स्वातंत्र्यप्राप्तीपासून मुक्ततेचा श्वास मिळाला तशी जोडीला डोकेदुखीही मिळाली. तीदेखील दुहेरी स्वरूपाची. एका बाजूला सातत्याने कश्मीरवर डोळा ठेवून हिंदुस्थानात अशांतता कशी नांदेल या प्रयत्नांत असलेला पाकिस्तान आणि दुसरीकडे हिंदुस्थानी सीमांमध्ये जितके आणि जिथे शक्य होईल तिथे घुसखोरी करून अथवा जमेल त्या कुरापती काढून हिंदुस्थानला सातत्याने त्रास देण्याचे धोरण अंगीकारलेला चीन. या दोन्ही देशांमुळे आजघडीला हिंदुस्थान त्रस्त आहे. या दोन्ही राष्ट्रांशी कितीही जुळवून घ्यायचा प्रयत्न केला तरी ते आपल्या मूळ पदावर जातातच असा आजवरचा इतिहास आहे.

पाकिस्तानपेक्षाही अधिक धोकादायक आहे तो चीन. सुप्त मनसुबे, आत्यंतिक विस्तारवादी महत्त्वाकांक्षा, महासत्ता बनण्यासाठी विधिनिषेध न बाळगता पुढे जाण्याची प्रवृत्ती, सातत्याने कुरापती काढण्याची अंगभूत मानसिकता, धोकेबाजपणा या सगळ्या ‘गुण’वैशिष्टय़ांमुळे चीन केवळ हिंदुस्थानसाठीच नव्हे, तर अनेक देशांसाठी डोकेदुखीचे कारण बनलेला आहे. हा देश फक्त हिंदुस्थानी सीमांवर घुसखोरी करून सतत वादाला निमित्त ठरतो असे नाही, तर अनेक देशांच्या बाबतीत त्याचा कुरापतखोर स्वभाव सातत्याने दिसून आलेला आहे. तिबेट घशात घालण्याचे कारस्थान आणि त्यासंदर्भातील चीनचे दावे आणि त्याविरोधातील संघर्ष नवीन नाही. हाँगकाँगची स्वतंत्र लोकशाही राज्याची मागणी, तिथे धाकदपटशाहीने चीनकडून होत असलेल्या कारवाया आणि तिथे होत असलेल्या आंदोलनांना चिरडण्यासाठीच्या चीनच्या कारवायादेखील जग पाहतो आहे. ज्या तिबेटवरून सातत्याने वाद सुरू आहेत तिथे हिंदुस्थानी सीमांना लागून असलेल्या वादग्रस्त भागात चीनने त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय व सुरक्षा केंद्राच्या इमारती प्रस्थापित केल्याचे दिसून येते आहे. या भागांत अनेक नवी गावे चीन जाणीवपूर्वक वसवतो आहे. ही चिनी पावले म्हणजे हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा आहे, असे जाणकार संरक्षण तज्ञांचे मत आहे. याच्या जोडीला तिबेटमधील सर्वोच्च धर्मगुरू अर्थात दलाई लामा कोण होणार हे ठरवण्याचा अधिकारदेखील चीनलाच असल्याचा पुनरुच्चार केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तिबेट म्हणजे साक्षात गौतम बुद्धांची भूमी. चीनने 1951मध्येच घुसखोरी करून तिबेट आपल्या घशात घातले आणि तेव्हापासून त्यांची अनिर्बंध सत्ता तेथे आहे. चौदावे तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांच्या नेतृत्वाखाली 1959 साली तिबेटमध्ये चीनविरोधात उठाव झाला; परंतु ते बंड चीनने शक्तिसामर्थ्याच्या बळावर मोडून काढले. तिबेटमधून हिंदुस्थानच्या आश्रयाला आलेले दलाई लामा आणि चिनी जोरजबरदस्तीला कंटाळून हिंदुस्थानात आलेले अनेक स्थलांतरित तिबेटियन यांना हिंदुस्थानने मोठय़ा मनाने आश्रय दिला. त्यामुळे जगभरातून हिंदुस्थानचे कौतुक झाले आणि चीनची निंदा झाली. चीनचा हिंदुस्थानविरोध प्रखर असण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. सातत्याने हिंदुस्थानी सीमांमध्ये घुसखोरी हे त्याच मानसिकतेचे प्रकट रूप आहे.

दलाई लामा हे गौतम बुद्धांचे अंश मानले जातात आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही तिबेटमध्ये आहे. 14वे दलाई लामा यांनी गेढून चोएकी निमा या सहा वर्षीय मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणजे पुढील दलाई लामा म्हणून घोषित केले होते. परंतु चीनने या मुलाला नजरकैदेत टाकले आणि उत्तराधिकारी आपणच ठरवणार म्हणत ग्यानचेन नोरबू यांना नवे दलाई लामा म्हणून घोषित केले. ज्या मुलाला चीनने नजरकैदेत ठेवले तो मुलगा आजतागायत कुणालाही परत दिसलेला नाही. आता नवे दलाई लामा कोण होणार आणि कोण ठरवणार हा वादाचा मूळ मुद्दा ठरतो आहे.

तिबेटमध्ये राहणाऱया लोकांवर चीनकडून सातत्याने अत्याचार होत आले आहेत. ज्या नागरिकांनी चीनची आर्थिक मदत घेतली आहे त्या सर्वांनी आपल्या घरातील दलाई लामा व आध्यात्मिक गुरूंच्या प्रतिमा काढून टाकाव्यात आणि त्या जागी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रतिमा लावावी, असे आदेश देण्यात आले आहेत. अंतर्गत धुसफूस व असंतोष कायम असल्याने चीनने तिबेटमध्ये परदेशी पर्यटकांनाही मनाई केलेली आहे. तिबेटमधील असंतोष वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे तिबेटमध्ये आलेले ‘हानचिनी’ लोकांचे लोंढे. गेल्या साठ वर्षांत मूळ तिबेटियन लोकांपेक्षा आता हानचिनी लोकच वाढले असल्याने मूळ तिबेटियन लोकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. धार्मिक, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवरच्या ईश्वरी श्रद्धा या सगळ्यांवरच चीन आक्रमण करीत असल्याची तिबेटियन लोकांची भावना आहे. याला विरोध करण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांत 155हून अधिक तिबेटियन लोकांनी आत्मबलिदान केलेले आहे.

चीनला मान्य असलेली सीमा आणि त्यांनी ठरवलेला सीमा प्रदेश जो स्वीकारणार नाही तो त्यांचा शत्रू हे चीनचे साधे सूत्र आहे. त्यामुळे 1962 सालच्या युद्धात चीनने अक्साई चीन हा भूभाग गिळला व त्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु तिथे न थांबता लडाख, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असतो. कधी डोकलाममध्ये तर कधी गलवान खोरे आपले आहे म्हणत घुसखोरी करणारी चिनी मानसिकताच मोठी विचित्र आहे. आतादेखील हिंदुस्थान कोरोनाशी झुंजत असताना चीनने लडाखमध्ये सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे.

तिबेटला हिंदुस्थानशी जोडणाऱया सीमेवरील भागात चीनने गेल्या दहा वर्षांत नियोजनबद्ध पद्धतीने अनेक नवीन गावे वसवलेली आहेत. अनेक सुरक्षा केंद्रे प्रस्थापित केलेली आहेत. यातील बहुतांश सीमेवरचा भाग हा वादग्रस्त आहे. त्यामुळे त्यामागचे त्यांचे सुप्त धोरण लक्षात येण्यासारखे आहे. म्हणूनच ही चिनी विस्तारवादाची भूमिका हिंदुस्थानसाठी निश्चितच त्रासदायक आहे. संधी मिळेल तिथून घुसखोरी करणे, शक्य तितक्या कुरापती करून हिंदुस्थानला हैराण करणे आणि हिंदुस्थानच्या शत्रूराष्ट्रांना मदत करून हिंदुस्थानवर कुरघोडी करणे ही चिनी विस्तारवादाची त्रिसूत्री आहे. म्हणूनच चीनसंदर्भात होणाऱया सगळ्याच घडामोडींबाबत सजग आणि सतर्क राहून पावले उचलत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. 1962च्या युद्धात गाफीलपणाचे चटके आपण भोगले आहेत… आता पुन्हा गाफील राहून चालणार नाही.

(लेखक वरिष्ठ पत्रकार व अनुवादक आहेत.)