ठसा: आर. ओ. पाटील

158

>> योगेश पाटील

कृषी, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, उद्योग क्षेत्रांमध्ये ठसा उमटविणारे आणि निर्मल बीजोत्पादनाच्या माध्यमातून व जैविक शेतीचा प्रसार आणि प्रचार करत लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती साधण्याचे काम शिवसेनेचे माजी आमदार आणि निर्मल सीड्स कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक रघुनाथ ओंकार उैर्फ आर.ओ. पाटील यांनी केले. सामान्य परिस्थितीवर मात करत त्यांना कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रासह देशभरात उमटविला.

20 ऑक्टोबर 1950 रोजी जळगाव जिह्याच्या पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे सामान्य शेतकरी कुटुंबात रघुनाथ ओंकार उैर्फ आर.ओ. पाटील यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच आणि पाचोऱयाला त्यांनी पूर्ण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून बी.एस्सी.ची पदवी त्यांनी 1974 मध्ये घेतली. शेती आणि शेतकऱयांचे उत्थान हा ध्यास उरी बाळगलेल्या आर.ओ. पाटील यांनी सुरुवातीला लहान-मोठी नोकरी करत कृषी क्षेत्राच्या अभ्यासात झोकून दिले. 2 मार्च 1988 रोजी पाचोरा येथे निर्मल सीड्स कंपनीची स्थापना करून बीजोत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवले. केवळ व्यवसाय म्हणून कंपनी न चालवता स्थानिक भूमिपुत्रांना व परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांनी जन्मभूमीतच उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून हजारो हातांना रोजगार मिळवून दिला. 35 वर्षे सातत्याने कृषी संशोधन व विस्ताराच्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत देश, परदेशातील कृषी, अर्थव्यवस्थेचा अभ्यासही त्यांनी केला. आर. ओ. पाटील यांनी व्यवसायासोबतच शेतकऱयांच्या हितासाठी आवाज उठविण्याकरिता राजकारणात पदार्पण केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद देत पाचोरा विधानसभेची उमेदवारी त्यांना दिली. 1999 ते 2009 अशी सलग 10 वर्षे आर. ओ. पाटील हे पाचोऱयाचे आमदार होते. आमदारपदाच्या माध्यमातून विधिमंडळात सातत्याने शेतकरी व खान्देशात सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आवाज बुलंद केला. राजकारणाचा व्याप असला तरीही निर्मल सीड्सच्या कामात सातत्याने लक्ष दिले. पेरणीच्या हंगामात बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येतात. मात्र, निर्मल सीड्सच्या बियाणासंबंधी गेली 30 वर्षे एकाही शेतकऱयाची एकाही वाणासंबंधी, एकाही पिकासंबंधी तक्रार आली नाही, हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. महाराष्ट्र कृषी व औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक, केंद्र सरकार पुरस्कृत महाराष्ट्र कृषी सेवा केंद्रे संघटनेचे दहा वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक, बोर उत्पादन संघ व महा बनाना संघटनेचे तांत्रिक सल्लागार म्हणूनदेखील त्यांनी कार्य केले. डाळवर्गीय पिके, बाजरा, मोहरी, कडधान्य अशा सर्वच बी-बियाणांच्या संशोधनात सातत्याने कार्य करून त्यांनी क्रांतिकारी बदल घडवून आणले. शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱयांचे प्रबोधन करत विविध जैविक उत्पादनांचा वापर करून उत्पादन खर्च कमी व उत्पन्न वाढविण्यासाठी आर.ओ. पाटील हे नेहमीच प्रयत्नशील राहिले. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, चीन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, केनिया, इथिओपिया, सुदान या देशांत शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी दौरे केले. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय रत्न, डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार, उद्योजक विभूषण सन्मान पुरस्कार, उद्योजकता विकास पुरस्कार, राज्य शासनाचा वसंतराव नाईक कृषी फलोत्पादन पुरस्कार, खान्देश आयकॉन ऍवॉर्ड, जलमित्र पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने सर्वोत्कृष्ट बाजरा संशोधन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कडधान्य संशोधन पुरस्कार, भूमिनिर्माण ऍवॉर्ड, मोहरी संशोधन इनोव्हेटिव्ह अवॉर्ड देऊन सन्मान केला. देशातील दुर्लक्षित पूर्वोत्तर राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी आसाम राज्यात गोहाटी येथे भव्य अत्याधुनिक जैविक निर्मिती प्रकल्प, बुलढाणा जिह्यात चिखली येथे अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र, गुजरात राज्यात गोध्रा येथे बायो मॅनिफॅक्चरिंग युनिटची स्थापना आर.ओ. पाटील यांनी केली. पुण्या-मुंबईसारखे शिक्षण ग्रामीण भागात मिळण्यासाठी पाचोरा येथे 2011 ला निर्मल इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्यासारख्या मान्यवरांनी आर.ओ. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख भाषणातून गौरवपूर्वक केला. स्वामीनाथन यांनी पाचोरा येथे भेट देऊन निर्मल सीड्सच्या कार्याची प्रशंसा केली. खान्देशात आर.ओ. पाटील यांची तात्यासाहेब अशी ओळख होती. शेतकऱयांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करणारे आर.ओ. तात्या पाटील यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या