स्वरांजली – कृतज्ञ स्वरभास्कर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मनमोहन रोगे

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळी ऊर्जा प्रदान करणारे गायक पंडित भीमसेन जोशी यांनी एक वेगळी गायकी बहाल केली. स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारे त्यांचे स्वर रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कलेशी एकरूप होत स्वतःचं अस्तित्व विसरणाऱया पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष 4 फेब्रुवारीपासून सुरू झाले. यानिमित्त या महान गायकाला ही आदरांजली.

दोन वर्षांपूर्वी बाबूजी (सुधीर फडके), गदिमा आणि पुलंचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्रात बऱयाच ठिकाणी विविध संस्थांनी वर्षभर साजरे केले. आता दिनांक 4 डिसेंबरपासून एका जगद्विख्यात शास्त्रीय गायकाचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेले आहे, ज्यांनी गायिलेले अभंग, गीते ऐकताना ऐकणाऱयाची तंद्री लागते. ते जसे त्या गीतात रंगून जातात, तितकेच रसिक श्रोतेही रंगून जातात. त्यांचे गायन ऐकण्यासारखे दुसरे सुख नाही. त्यांचा आवाज ऐकताना श्रोते भौतिक सुख – दुःखे विसरून परमात्म्याशी जणू एकरूप होतात. असे अद्वितीय गायक म्हणजे पंडित भीमसेन जोशी होय. ते गायक म्हणून जितके महान होते, तितकेच एक माणूस म्हणूनही महान होते. त्यांच्या गायननिष्ठेची, उदारतेची, कृतज्ञतेची कितीतरी उदाहरणे सांगितली जातात.

पंडितजी कर्नाटकातील एक कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा परतत असताना अचानक एका वेगळ्या रस्त्याला गाडी घेण्यास ड्रायव्हरला सांगितले. साधारण अर्ध्या तासाने रात्री 02 : 30 वा.च्या सुमारास एका झोपडीकडे गाडी थांबली. पंडितजींनी दारावर थाप मारताच एका वृध्दाने दरवाजा उघडला आणि पंडितजींना पाहून तो गोंधळला. पंडितजी घरात गेले, बसले. त्या वृध्द दांपत्याशी कानडीत काही बोलले आणि कार्यक्रमात बिदागी म्हणून मिळालेल्या रकमेचे पाकीट त्यांनी त्या वृध्दाच्या हातात ठेवून त्यांना नमस्कार करून ते निघाले. पंडितजींसोबत असलेल्यांना ते वृद्ध दांपत्य कोण हे कळत नव्हते. नंतर पंडितजींनी सांगितले, ते 12/13 वर्षांचे असताना गाणे शिकण्यासाठी घरातून पळाले तेव्हा खिशात पैसे नसताना कर्नाटकातील एका स्टेशनजवळ काही दिवस ज्या दांपत्याने त्यांच्या जेवणाची सोय केली होती, तेही रोज एक असे त्यांचे गाणे ऐकून तेच दांपत्य होते ते. आज केलेले उपकार लोक उद्या विसरतात. अशा वेळी पंडितजींच्या या कृतज्ञतापूर्वक वर्तनाने ते आणखी मोठे वाटतात.

एका रेकॉर्ड निर्मात्याला एक गीत पंडितजींकडून गाऊन घ्यायचे होते, त्यासाठी एका मध्यस्थीकडून रुपये 1500/- बिदागी ठरली. तसेच पंडितजी मुंबईत येऊन रेकार्ंडग करणार होते. ठरलेल्या दिवशी पंडितजींना आणावयास गाडी गेली. ते मुंबईत आले आणि अप्रतिम गायन केले. निर्माता खूश झाला. त्याने मध्यस्थीकडे रु. 5000/- चे पॉकेट दिले तर पंडितजींनी ते न घेता ठरले, तितकेच द्या असे सांगितले. पंडितजी सगळे पैसे घ्यायला, तर निर्माता पैसे परत घ्यायला तयार नव्हते. शेवटी निर्मात्याने मध्यस्थीला पंडितजींना पुण्याला घरी सोडण्यास व तिकडेच सगळे पैसे देऊन येण्यास सांगितले. पुण्यात गेल्यावर आग्रह – विनंती करूनही पंडितजींनी फक्त रुपये पंधराशेच घेतले. वास्तविक ते मुंबईत येताना त्यांच्या पत्नी रुग्णालयात दाखल होत्या तरी त्यांनी ठरलेली तारीख टाळली नाही आणि रुग्णालयाचा खर्च असतानाही मिळत असूनही जास्तीचे पैसे घेतले नाहीत. आता थोडीशी प्रसिद्धी मिळाल्यावर कलाकारांच्या डोक्यात हवा जाते. ते इतरांना आपल्या तालावर नाचवतात. तसेच आज पैशासाठी माणसे कोणत्याही थराला जातात हे पाहता या प्रसंगामुळे पंडितजी आणखी थोर वाटतात.

कै.राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना पंडितजींशी त्यांची भेट झाली तेव्हा ‘‘आपण प्रवासात असताना नेहमीच तुमची गाणी ऐकतो. मला तुमचे गायन खूप आवडते. आपण  राज्यसभेचे खासदार व्हावे अशी माझी इच्छा आहे’’ असे राजीवजींनी त्यांना सांगितले. त्यावेळी पंडितजींनी त्यांना नम्रपणे नकार दिला. आज राजकारणात सरपंच होण्यासाठी इतकी धडपड करावी लागते. नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी किती उपद्व्याप करावा लागतो याची सर्वांनाच कल्पना आहे. तसेच कितीतरी प्रसिद्ध कलावंत आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याला कोणत्याही पक्षाने विधान परिषदेत आमदार म्हणून घ्यावे, राज्यसभेची खासदारकी द्यावी म्हणून किती धडपड करतात, पक्षांचे उंबरठे झिजवतात हे अधूनमधून ऐकावयास मिळते आणि स्वतः पंतप्रधान खासदारकीची ऑफर देत असताना, ती नम्रपणे नाकारण्याची तयारी पंडितजी दाखवतात म्हणून ते अद्वितीय ठरतात.

भीमसेनजींचे कितीतरी अभंग प्रसिद्ध आहेत, जे त्यांच्याशिवाय इतरांच्या आवाजात ऐकावेसे वाटत नाही. ‘मिले…सूर मेरा तुम्हारा…….. तो सूर बने हमारा…..’ हे गाणे ‘दूरदर्शन’वर वाजले की, आबालवृद्ध ते गाणे गुणगुणू लागतात. ही पंडितजींच्या आवाजाची जादू होय. ‘इंद्रायणीकाठी…’, ‘तुझी घोंगुडी चांगुली आम्हा का दिली वांगुडी…..काना रे’, ‘आता कोठे घ्यावी धाव’, ‘माझा भाव तुझे चरणी…’, ‘काया ही पंढरी…आत्मा हा विठ्ठल’… किती गीते सांगावीत ? त्यांचा भारदस्त जादूई आवाज माणसाच्या मनावर गारूड करतो. सर्वसामान्य श्रोत्यांनाही स्वर्गीय सुखाचा आनंद देतो. ‘राम… रंगी रंगले, मन….’  हे ऐकताना खरोखरच आपले मन रामनामात तल्लीन होते, न्हाऊन निघते. अशा या थोर, अद्वितीय स्वरभास्करांचे, भारतरत्नाचे जन्मशताब्दी वर्ष सांस्कृतिक संस्था मोठय़ा प्रमाणात साजरे करतीलच. त्याचबरोबर सांस्कृतिक खात्यानेही ते यथायोग्य साजरे करून पंडितजींचा उचित सन्मान करायला हवा.

 [email protected]