लेख : ठसा : बी. रघुनाथ

1960

महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, लघुनिबंधकार, कथालेखक, कादंबरीकार आणि कवी बी. रघुनाथ यांचा आज स्मृतिदिन. 15 ऑगस्ट 1913 ते 7 सप्टेंबर 1953 हा त्यांचा जीवनप्रवास. परभणी जिल्हय़ातील आणि आताच्या जालना जिल्हय़ातील सातोना हे त्यांचे जन्मगाव. सातोना येथे बालपणीचा काळ गेल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षीच ते शिक्षणासाठी हैदराबादेत आले. तेथील विवेकवर्धिनी शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1932 च्या सुमारास ते परभणीत आले. चाळीस वर्षे आयुष्य लाभलेले बी. रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी. परभणीच्या सरकारी बांधकाम खात्यात कारकून म्हणून काम करीत असत. ही नोकरी त्यांनी वीस वर्षे केली. त्यातील बारा वर्षे तात्पुरती तर उरलेली आठ वर्षे कायमस्वरूपी होती. बी. रघुनाथ मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासूनच वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली आणि ते ज्या काळात लिहीत असत तो काळ अत्यंत जुलमी, सरंजामी राजवटीचा होता. परिस्थिती बेताची होती. दारिद्रय़ाशी झगडत, संघर्ष करीत परभणीसारख्या ठिकाणी राहून वाचन, लेखनाची आवड जोपासत असत. आपल्या वाटय़ाला आलेली नोकरी, सामाजिक उपेक्षा, खडतर परिस्थिती या विषयी त्यांची कोणतीही तक्रार नसायची. प्रकृतीही तेवढी साथ देत नसली तरी त्यांनी जी साहित्यसेवा केली ती मात्र नवल वाटावी अशीच समजली पाहिजे. आपल्या अल्पायुष्यात दोन कवितासंग्रह, पाच कथासंग्रह, सात कादंबऱ्या, एक लघुनिबंध संग्रह एवढी सकस आणि दर्जेदार साहित्याची निर्मिती करू शकले. आलाप आणि विलाप, पुन्हा नभाच्या लालकडा (कवितासंग्रह), साकी, फकिराची कांबळी, छागल, मिटलेले आकाश, काळी राधा या पाच कथासंग्रहातून त्यांच्या वैविध्यपूर्ण आशयसंपन्न कथांचा बाज आपल्या लक्षात येऊ शकतो.

ओ S S S, हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली, जगाला कळले पाहिजे, आडगावचे चौधरी या त्यांच्या सात कादंबऱ्या आजही पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. कथा, कविता, कादंबरी या प्रांतात त्यांनी कसदार लेखन केले. मराठवाडय़ाची म्हणून जी भाषा अस्मिता असते, त्याचा प्रत्यय हे साहित्य वाचताना जरूर येतो. या प्रांतातील त्यांचे लेखन जसे महत्त्वाचे तसे लालित्यपूर्ण लिहिलेले लघुनिबंध लेखनही. ‘अलकेचा प्रवासी’ हा लघुनिबंध संग्रह या साहित्य लेखनाप्रमाणेच महत्त्वाचा समजला जातो.

वेष स्वदेशी घोष सभांतून

देव देखणे भुललो पाहून

वरवरचा परी शेंदूर तयांचा

कसले स्तवन म्हणावे

आज कुणाला गावे

यांसारख्या अनेक कविता आजही अजरामर आहे. परभणीतील सामाजिक, सांस्कृतिक चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध राहिला. गणेश मंडळ, गणेश वाचनालय यांच्या कामात ते सहभागी असत. उदेश्वर गणेश मंडळास तर अनेक वर्ष संवाद आणि गाणी ते लिहून देत असत. 1935 ते 1940 दरम्यान त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकातून भूमिकाही साकारली होती. बी. रघुनाथांच्या साहित्यावर स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर कालखंडातील घटना आणि घडामोडींचा प्रभाव दिसून येतो. बी. रघुनाथ यांनी मराठी साहित्यास जे लक्षणीय योगदान दिले त्याची त्या काळातही फार कुणाला माहिती नव्हती आणि आजही नसावी. सततची मानसिक अस्थिरता होती. अडीअडचणी, अडथळेही होते. त्यांच्याशी झगडत असतानाच त्यांची प्रकृती नाजूक असायची. नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्यावर काम करीत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तोच हा दिवस 7 सप्टेंबर.

आपली प्रतिक्रिया द्या