
>> द्वारकानाथ संझगिरी
भटकेगिरी करताना आपण किती ‘अज्ञानी’ आहोत याचं आपल्याला ‘ज्ञान’ होतं. आपल्या सामान्य ज्ञानाचाही अहंकार गळून पडला. मी आज माझं माझ्या वाचकासमोर ठेवतोय.
विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये आल्यावर माझा मित्र केदार लेलेचा फोन आला, ‘‘सर, मी सध्या जर्सीत आहे. या ना इथे, सुंदर बेट आहे’’. तो मला त्याच्या लेखनातला द्रोणाचार्य मानतो. एकलव्याप्रमाणे तो माझ्याकडून शिकला असं तो म्हणतो. हा एकलव्य बुद्धिबळ वरच्या दर्जावर खेळायचा. तो बुद्धिबळ स्पर्धा कव्हर करतो. विश्वनाथ आनंद त्याचा जवळचा मित्र. त्याच्याशी तो बुद्धिबळाबद्दल चर्चा करतो. त्याने विम्बल्डनवर मराठीत पुस्तक लिहिलंय. ते तिथल्या लायब्ररीत आहे. विम्बल्डनवर पुस्तक लिहिणारा तो एकमेव हिंदुस्थानी लेखक आहे. घरात वावरल्याप्रमाणे तो विम्बल्डनमध्ये वावरतो. या गोष्टींशी माझा जवळचा संबंध नाही. बुद्धि नसल्यामुळे मी बुद्धिबळाजवळ कधी गेलो नाही. एकेकाळी मी विम्बल्डनवेडा होतो. दोनतीनदा तिथे फेरफटकाही मारलाय, पण लॉर्डस् नावाच्या पंढरपूरप्रमाणे मी तिथला वारकरी नाही. तरीही त्याला मी द्रोणाचार्य वाटतो ते बहुधा वयामुळे… आणि हो, दोघांतलं आणखी साम्य म्हणजे आम्ही दोघंही इंजिनिअर आहोत.
…तर या एकलव्याला मी उलटा प्रश्न विचारला, ‘‘हे जर्सी कुठाय?’’
तो म्हणाला, ‘‘अटलांटिक समुद्रात फ्रान्सजवळ आहे. पण ते ब्रिटिशांचं आहे. तिथे जायला व्हिसा लागत नाही, ब्रिटिश व्हिसा चालतो.’
मी म्हटलं, ‘‘पाहूया कसं जमतं ते. वर्ल्डकपच्या धांदलीत कसं जमणार? दोन मॅचमध्ये मोठी गॅप असेल तर प्रयत्न करतो.’’
त्याचं प्रत्युत्तर कसं होतं? विराट कोहली दोन क्षेत्ररक्षकांमध्ये गॅप शोधतो तशी त्याने दोन सामन्यांत गॅप शोधली. त्यानेच तिकीट पाठवलं, हॉटेल बुक केलं आणि मी जर्सीला पोहोचलो.
मला तोपर्यंत ब्रिटिशांकडे ‘बेटं’ आहेत हे माहीत होतं. त्याला चॅनल आयलंडस् म्हणतात हे ठाऊक होतं. स्कॉटलंडमधलं ‘आईल ऑफ स्काय’ माझ्या बकेट लिस्टवर होतं. साऊदम्पटजवळच्या आईल ऑफ व्हाईटला जायचं मी ठरवूनही टाकलं होतं, पण जर्सी माझ्या डोक्यातच नव्हतं. तिथे गेल्यावर मला कळलं की, जर्सी गाय तिथलीच. अमेरिकेतल्या न्यू जर्सीला ‘जर्सी’ नाव याच बेटामुळे पडलं. माझ्या लहानपणी माझा एक लाडका सिनेमा होता, ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’. देव आनंदने सुरुवातीला ज्याच्या स्टाईल्स उसन्या घेतल्या तो ग्रेगरी पेकर त्यात होता. त्याचं बरंचसं शूटींग जर्सीत झालं होतं.
मी जर्सीच्या विमानतळावर पोहोचलो तेव्हा सकाळचे नऊ-साडेनऊ झाले असावेत. विमानतळ छोटा होता. बाहेर लख्ख ऊन होतं. ब्रिटिशांना जर्सी उन्हासाठी आवडते. सूर्यदर्शनासाठी हपापलेल्या ब्रिटिशांना जर्सी हे सूर्यदेवाच्या गाभाऱयातलं बेट वाटतं. अर्थात तिथे थंडी नाही असं नाही. ज्या टुरिस्ट बसमधून मी जर्सी फिरतो त्याचा गाईड कम ड्राईव्हर सांगत होता की, चार-पाच वर्षांतून एकदा कधीतरी बर्फही पडतो, पण शून्याखाली तापमान फार क्वचित जातं. मी केदारला शोधत विमानतळाबाहेर गेलो आणि मला उन्हात थंड वाटलं. कारण वारा जोरात वाहत होता. ते एक छोटं बेट आहे. पंचेचाळीस चौरस मैलाचं. त्यामुळे वाऱयाच्या मिठीत हे बेट बऱयाचदा असतं. वारा नसला की, अंगातलं समर जॅकेटचे काय, फुलशर्ट नकोसा वाटायचा. विमानतळाहून हॉटेलवर जाताना एक गोष्ट जाणवली की, रस्त्याच्या पाटय़ा चक्क फ्रेंचमध्ये आहेत. काही बंगले फ्रेंच ‘शॅटो’ स्टाईलचे आहेत. प्रत्येक बंगल्यातून श्रीमंती टपकतेय. पुढे बेटाच्या सफरीवर गेलो तेव्हा अंबानीच्या एक लाखांश पैसे मिळाले तर कुठला बंगला घ्यावा याचा निर्णय होत नव्हता. देवाला मी म्हटलं, ‘‘मला अंबानीच कर, मी बेट विकत घेऊन टाकतो.’’ तसं ते बेट इंग्लंडच्या राणीच्या मालकीचे आहे. त्याचं संरक्षण ही ब्रिटनची जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच त्याचं प्रतिनिधित्व करतं. एरवी त्याची स्वतंत्र लोकशाहीवर आधारित राज्यघटना आहे. गव्हर्नर तेवढा ब्रिटीशांचा असतो आणि हो, पाऊंड राज्य करतो. त्यांची स्वतःची करन्सी आहे, पण पौंड दिला की, पौंडच मिळतो. मी कुणालाही फ्रेंच भाषेत बोलताना ऐकलं नाही. तिथे ड्रायव्हिंगची बाजू आपल्यासारखी आहे. म्हणजे ब्रिटिश पद्धतीची. 1940 ते 1945 पर्यंत हे बेट दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने जिंकलं होतं. त्यावेळी त्यांनी ड्रायव्हिंगच्या बाबतीत ‘किप लेफ्ट’चं ‘कीप राईट’ केलं, पण जर्मनीकडून ते दुसऱ्या महायुद्धात हिसकावून घेतल्यावर पुन्हा नियम बदलले. फ्रेंचांसाठी त्यांनी फक्त रस्त्यांची आणि जागांची नावं सोडली. भाषेच्या राज्यात फ्रेंच भाषेला घुसू दिलं नाही. इथे फ्रेंच भाषा नाही. कारण लोकसंख्येच्या 0.9 टक्के फ्रेंच आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त पोर्तुगीज आहेत. मूळ रहिवासी 46.4 टक्के आहेत. त्यानंतर ब्रिटिश!
जर्सीच्या मूळ रहिवाशांची स्वतःची भाषा आहे, पण त्यावर इंग्लिशचीच छाप आहे. कॅनडात, मॉण्ट्रियल मध्ये फिरताना आपण फ्रान्समध्ये फिरतोय असं वाटतं. तसा फ्रेंचचा ठसा नाहीच आहे. फ्रान्सचा किनारा समोर दिसतो, पण ते 14 मैलांचं अंतर फ्रेंच भाषा, किंवा संस्कृती ओलांडू शकलेली नाही. फ्रेंचला ऐतिहासिक भाषेचा दर्जा देऊन ‘‘बस कोपऱयात’’ असं सांगितलंय. आमचा गाईड सांगत होता की, अलीकडे युरोपियन समुद्रातून जर्सीला जर्मन्स जास्त येतात. दुसऱया महायुद्धामुळे जर्मन्स हे त्यांचे तसे शत्रू. नाही म्हणता जर्मन राज्यात जर्सीच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता. पारतंत्र्यातली सर्व दुःखं त्यांच्या वाटय़ाला आली, पण तरीही जर्मन माणसाबद्दल त्यांना रागद्वेष नाही. उलट सध्या त्यांच्या इकॉनॉमीला जर्मन पर्यटक हातभार लावतात. सध्या ते युरोपातलं श्रीमंत राष्ट्र आहे. ते थेट स्वतःच्या विमानातून येतात. शनिवार-रविवार जर्सीच्या उन्हात टॅन होतात. मड वाळूचा बिछाना करून विश्रांती घेतात आणि तरतरी येण्यासाठी ऍटलांटिकच्या निळय़ा पाण्याच्या कुशीत शिरतात. सोबतीला उत्तम वाईन, बीअर असतेच, पण जर्सीचं आईक्रिम हा उन्हावर उत्तम उतारा आहे. जर्सी गायीच्या दुधाचे पिवळसर व्हॅनिला म्हणजे जिभेसाठी अमृत. जिभेवरून ते घरंगळत जठरात गेल्यावर जठरालासुद्धा जिभेचा हेवा वाटत असेल, ‘‘आपल्याला चव कळत असती तर.’’ मी परदेशात प्रत्येक गोष्ट मोजून मापून खातो, पण ज्या दिवशी मी ते बेट टुरिस्ट बसने हिंडलो. तेव्हा आठ तासांच्या अवधीत मी दोन जर्सी आईक्रिम संपवले. मी विश्वामित्र असतो तर कदाचित मेनकेचा मोह टाळला असता, पण जर्सी आईसक्रिमचा टाळू शकलो नाही.
अरे हो, तिथे हिंदुस्थानी भेटतात. मराठीसुद्धा भेटतात. पहिल्याच दिवशी बॉलीवूड हॉटेलात जेवताना त्या रेस्टॉरंटची भाषा मराठी झाली होती. माझी बहीण सांगत होती, तिथे बॅक ऑफ इंडियाची शाखा आहे. मी माझं अज्ञान दूर करून घेतलंय. पुढच्या रविवारी जर्सी फिरवतो.




























































