सई ताम्हणकरने सुरु केला ‘द सारी स्टोरी’ ब्रॅण्ड

सई ताम्हणकर…ग्लॅमरस अभिनेत्री ही तिची ओळख. या अभिनयाला आता उद्योजकतेचीही जोड मिळणार आहे. ‘द सारी स्टोरी’ या स्वत:च्या ब्रॅण्डच्या माध्यमातून सई उद्योगक्षेत्रात उतरत आहे.

सिनेसृष्टीत आणि फॅशन विश्वात नाव कमवल्यानंतर सई ताम्हणकर आता वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही भूमिका एखाद्या सिनेमात नव्हे तर खऱयाखुऱया आयुष्यात एक उद्योजिका म्हणून आपल्या समोर आली आहे. आपल्या भन्नाट स्टाईलने सगळ्यांनाच आकर्षित करणाऱया सईच्या फॅशन सेन्सचा अनुभव तिच्या चाहत्यांनाही घेता येणार आहे.

सई तिच्या अभिनयाबरोबरच फॅशन स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. दसऱयाच्या शुभ मुहूर्तावर तिने तिची कॉलेजची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाणसोबत ‘दी सारी स्टोरी’ हा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून या दोघींना काहीतरी वेगळं आणि हटके करायचं असं भरपूर वाटायचं, पण वेगळं म्हणजे नेमकं काय करायचं हे त्या दोघींनाही कळत नव्हतं. पुढे दोघीही आपापल्या क्षेत्रात व्यस्त झाल्या, पण 2020 ने त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्यातूनच ‘दी सारी स्टोरी’ या ब्रॅण्डची निर्मिती झाली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे सईच्या चाहत्यांना सईच्या निवडीच्या साडय़ा नेसण्याचं निमित्त मिळणार आहे. यामध्ये वेगळं काय असणार आहे याबाबत सई सांगते, ‘‘जशी सिनेमा आणि भूमिकांबाबत चोखंदळ आहे ना, अगदी तशीच साडय़ांबाबतही ती दिसते. प्रत्येक साडीचा पोत, रंग, डिझाइन यावर माझं आणि श्रुतीचं बारकाईने लक्ष असणार आहे. जसे माझ्या प्रत्येक चित्रपटाला एक कथानक असते तसेच आमच्या लेबलची साडीही एखादी गोष्ट सुरेख उलगडून सांगते. त्यामुळे साडय़ांमध्ये सई टच नक्कीच दिसेल. तसेच तिची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाण या संकल्पनेबाबत सांगते की, याची प्रेरणा तिच्या आईकडून मिळाली. तिच्या आईकडे साडय़ांचे मोठे कलेक्शन आहे.

हिंदुस्थानातल्या कानाकोपऱयात मिळणाऱया प्रत्येक प्रकारातल्या साडय़ा तिच्याकडे आहेत. त्यामुळे आईची साडय़ांची आवड लहानपणापासून तिच्यात रुजत गेली आणि त्याच कल्पनेतून ‘दि सारी स्टोरी’ ब्रॅण्ड आला. पुढे ती सांगते की, साडी कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाही. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या सणा-समारंभांना साडी नेसण्याकडे जगभरातल्या अगदी लहान मुलींपासून ते 80 वर्षांच्या आजींपर्यंत प्रत्येक स्त्राrचा कल असतो. म्हणूनच ‘दि सारी स्टोरी’मध्ये तीसहून अधिक वैविध्यपूर्ण प्रकारातल्या साडय़ा तुम्हाला मिळतील. या कलेक्शनमध्ये प्रत्येक वयोगटातील, क्षेत्रातील स्त्रियांना आवडतील, शोभतील अशा रंगांच्या, डिझाइनच्या साडय़ा ‘दी सारी स्टोरी’ मध्ये असणार आहेत.

सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वतःचं लेबल घेऊन आली आहे. अनेक जणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात.

आपली प्रतिक्रिया द्या