
>>ऋतुराज पुरुषोत्तम बुवा<<
मातृभाषा तेलुगू असलेल्या शुभरायांनी अस्सल मराठीतून काव्यरचना केली आहे. भक्तिपर अशी 147 पदे, अभंग त्यांनी लिहिले आहेत. ईश्वरभक्ती करताना आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान या अभंगातून व्यक्त झाले आहे. शुभराय यांच्या ठायी चित्रकला आणि काव्य प्रतिभा यांचा अनोखा संगम होता. नृत्यनिपुण असलेले शुभराय संगीततज्ञही होते. मातृभाषा तेलुगू असूनही मराठी कवितालेखन करणारे शुभराय हे भाषिक ऐक्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत.
सोलापूर येथे जवळपास 35 वर्षे वास्तव्य केलेले शुभराय (1750-1820) मूळचे मद्रास प्रांताचे रहिवासी होते. पूर्वीच्या मद्रास प्रांतातून शुभराय 1785 मध्ये सोलापूरला आले. तरुण वयात त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर टिपू सुलतानच्या दरबारात मुख्य पेशकार हे जबाबदारीचे पद प्राप्त केले. टिपूचे विश्वासू सहकारी म्हणून शुभरायांना मान होता. पुढे इंग्रजांनी टिपूचा पराभव केला. या पराभवामुळे शुभराय यांच्या जीवनाची दिशा बदलली. राजसत्ता आणि कुटुंबीयांचा त्याग करून शुभराय ईश्वरभक्तीकडे वळले. संन्यासी जीवन पत्करलेल्या शुभरायांनी सोलापुरात येऊन विठ्ठलाची उपासना सुरू केली. काही काळानंतर विठ्ठलमूर्तीची स्थापना करून मठाची उभारणी केली. शुभराय हे नृत्यकला, संगीतकला, चित्रकला, काव्य अशा अनेक कलांचे जाणकार होते. या सर्व कलांचा वापर त्यांनी ईश्वर उपासनेचे साधन म्हणून केला. ईश्वर उपासनेला त्यांनी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची रथयात्रा सुरू करून त्यांनी सामान्य माणसांना यात सहभागी करून घेतले. गेली 233 वर्षे ही रथयात्रा सोलापूरचे वैशिष्टय़ म्हणून ओळखली जाते.
रथयात्रेबरोबरच शुभरायांनी विविध उत्सवांचा आरंभ केला. ते स्वतः नृत्यकलेत प्रवीण होते. उत्सवाच्या दिवशी शुभराय कीर्तन आणि पायात चाळ बांधून नृत्य करत. शुभरायांना तेलुगू या मातृभाषेबरोबर उर्दू, संस्कृत, अरबी, फारसी, कन्नड आणि मराठी या भाषा येत होत्या. निःस्पृह वृत्ती हे त्यांचे वैशिष्टय़ होते. महाराष्ट्राचे तत्कालीन सत्ताधारी पेशवे यांनी शुभराय मठाला भेट देऊन चाळीस हजार रुपयांची जहागीर दिली होती; पण शुभराय यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला होता. धार्मिक-अध्यात्मिक तसेच सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात शुभरायांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे शिष्य रावजी बुवा यांच्याकडे मठाची जबाबदारी सोपविली. बुवा घराण्यातील पुढच्या पिढय़ांनी त्यांची परंपरा सांभाळली आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ तसेच पुणे येथील शंकर महाराज हे मठात राहिल्याची नोंद आहे. शुभराय मठ हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र बनले होते.
शुभरायांनी आपला कलेचा आणि भक्तीचा वारसा त्यांचे शिष्य रावजी बुवा यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांचे वंशज आणि सोलापूरचे पत्रकार पु.ज. बुवा यांनी शुभरायांची चित्रे आणि कविता प्रकाशात आणल्या. शुभराय महाराजांनी जमाखर्चाच्या कागदाच्या मागील बाजूस चित्रे काढली आहेत. चित्रात नैसर्गिक-जलरंग वापरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रामायण आणि महाभारत यातील विविध प्रसंगांवर आधारित चित्रे आहेत. मठातील उत्सवाच्या प्रसंगी विठ्ठलमूर्तीच्या प्रभावळीत ही चित्रे लावण्यात येत होती. चित्रांमध्ये दशावतार तसेच कृष्णाच्या बालपणापासून जीवनातील विविध घटना चितारलेल्या आहेत. कृष्ण आणि यशोदा-राधा आणि गोपी यांच्या चित्रातून शुभरायांची मधुराभक्ती व्यक्त झालेली दिसते. कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या मते शुभरायांच्या चित्रणशैलीचे नाते पारंपरिक जानपद कलेशी किंवा देवळात व राजवाडय़ात दिसणाऱ्या चित्रांच्या शैलीशी जुळणारे आहे. काही कला अभ्यासकांच्या मते शुभरायांच्या चित्रात त्यांची मातृभूमी असलेल्या मद्रास प्रांत आणि परिसरातील-दक्षिणेतील राज्यांचा तसेच ओडिशा येथील चित्रकलेचा प्रभाव दिसून येतो. टिपूच्या दरबारात असताना विविध प्रांतांत गेल्यावर तेथील चित्रशैली शुभरायांमधील कलाकाराने आत्मसात केली असावी. शुभरायांच्या चित्रांच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते झाले. पुढे पु. ज. बुवा यांनी या चित्रांचे प्रदर्शन पुणे, मुंबई, हैदराबाद, गोवा आणि दिल्ली येथे आयोजित केले होते. बुवा यांच्या प्रयत्नातूनच 1988मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने शुभरायांच्या चित्रांचा कलाकृतीसंग्रह ’चित्रचिरंतन’ प्रकाशित केला.
सोलापुरातील जागतिक कीर्ती मिळवलेले चित्रकार अब्दुल रहमान अप्पाभाई आलमेलकर यांनी शुभरायांच्या चित्रातून स्फूर्ती मिळाल्याचे नोंदविले आहे. 1954 मध्ये आलमेलकर यांचा स्टुडिओ जळाला आणि त्यात असंख्य चित्रे नष्ट झाली. त्यानंतर आलमेलकरांनी शुभरायांची चित्रे पाहून प्रेरणा घेऊन स्वतःच्या शैलीतील ’डिव्हाइन लव्ह’ : यशोदा आणि कृष्ण असे एक चित्र काढले आणि दिल्ली ललित कला अकादमीला पाठविले. 1955 साली त्या चित्राला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. शुभरायांच्या चित्रकलेतून आपल्याला नवी स्फूर्ती मिळाली असे आलमेलकरांनी नमूद केले आहे.
मातृभाषा तेलुगू असलेल्या शुभरायांनी अस्सल मराठीतून काव्यरचना केली आहे. भक्तिपर अशी 147 पदे, अभंग त्यांनी लिहिले आहेत. ईश्वरभक्ती करताना आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान या अभंगातून व्यक्त झाले आहे. चित्राप्रमाणेच शुभरायांच्या अभंगातून मधुराभक्ती हे वैशिष्टय़ आढळून येते. दंभहारक या मासिकातून ही पदे प्रसिद्ध झाली. प्रत्येक पदाला-कवितेच्या सुरुवातीला शास्त्राrय संगीतातील रागांचाही उल्लेख मासिकात आहे. कला अभ्यासक प्रा. सी. डी. जोशी यांच्या मते शुभराय यांची चित्रे आणि कविता यांचा घनिष्ठ संबंध आहे. शुभरायांची पदे प्रार्थना समाजाच्या प्रार्थना पुस्तकात आहेत. विनोबा भावे यांच्या रोजच्या प्रार्थनेत ही पदे असल्याने त्यांनी शुभराय मठाला भेट दिली होती. अक्कलकोट परिसरातील म्हैसलगी, सांगली जिह्यातील वाटेगाव तसेच कर्नाटकातील कारवार येथील मठातून ही पदे नित्यनेमाने म्हटली जातात. शुभराय यांच्या ठायी चित्रकला आणि काव्य प्रतिभा यांचा अनोखा संगम होता. नृत्यनिपुण असलेले शुभराय संगीततज्ञही होते. मातृभाषा तेलुगू असूनही मराठी कवितालेखन करणारे शुभराय हे भाषिक ऐक्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत.





















































