लेख – समर्थ रामदास स्वामींचे भिक्षा तत्त्व

>> रामकृष्ण विनायक अभ्यंकर

रामदास स्वामींनी गावागावांतून दैनंदिन पाच घरी भिक्षा मागून फक्त मूठभर कोरडी भिक्षा घेण्याचे योजिले. भिक्षेच्या मिळणाऱया मोबदल्यात समाजाला ज्ञानाचा संदेश देण्याची प्रथा घातली. भिक्षेची प्रथा दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, साधुसंत आदीपासून चालत आली आहे. आजही भिक्षा मागितली जाते. पण रामदास स्वामींनी भिक्षेला राष्ट्रीयस्वरूप दिले. समाजासाठी भिक्षा केवळ साधन म्हणूनच वापरले.

सतराव्या शतकातील कालावधीत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तीन महापुरुष महाराष्ट्राला लाभले. आपापल्या परीने नियती योजनेनुसार त्यांनी देदीप्यमान समाजोद्धारच केला आहे. त्या कामासाठी त्यांनी स्वतःला समाजोद्धारासाठी पूर्णपणे वाहून घेतल्याचे त्यांच्या चरित्रातून दिसते. सन 1608 ते 1682 या समर्थ रामदास स्वामीच्या आयुष्यातील टप्प्यांचा विचार केल्यास असे आढळून येईल की त्यांच्या आयुष्याची जवळजवळ 36 वर्षे त्यांच्या नियोजित कार्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणजे बालपण, तपाचरण, भारत भ्रमण इत्यादीसाठी खर्ची पडली आहेत, त्यानंतरच स्वामिनी त्यांच्या आयुष्यातील उर्वरित 38 वर्षांचा काळ प्रत्यक्ष समाजोद्धारासाठी खर्ची केलेला आहे.

स्वतः  ब्रह्मचारी राहून त्यांनी साऱया विश्वाचा जणू संसारच केला आहे. स्वतः संसार न करता उत्तम व यशस्वी संसार कसा करता येतो हे त्यांनी निकषाद्वारे समाजाला सांगितले आहे. त्यातूनच त्यांचा प्रसिद्ध मंत्र आहे, ‘प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका,’  स्वतःच मांडलेल्या संसाराचा अजिबात त्याग न करता, त्याग, भक्ती व कर्माद्वारे खूप उत्तम परमार्थ कसा साधता येईल असे योग्य मार्गदर्शन स्वामिनी समाजास सदैव केले आहे. स्वामींच्या पूर्वायुष्यातील बालपण, तपाचरण, व भारतभ्रमणद्वारे त्यांचे मनोबल उंचावत असतानाच स्वामींना त्यांच्या संकल्पित कार्याचा मार्गच सापडला. तत्कालीन सामाजिक स्थिती फारच बिकट व गंभीर होती. समाज जीवनातील ‘राम’च  हरवला होता.

अत्याचार, अस्थिरता, अशांतता, स्त्रिया पळविणे, जनावरे पळविणे, हिंदू मंदिरे फोडणे, पिके जाळणे इत्यादी गोष्टींनी सारा समाज पुरता वैतागून गेला होता. त्यातही समाजातील व एकीचा अभाव. आपापसातील भांडणे इत्यादी कमालीचा होता. दुसऱयाचे भांडण व तिसऱयाचा लाभ या साऱयाचा गैरफायदा यवनांनी घेतला व आपले साम्राज्य स्थिर केले. हे सारे कडवे सत्य समर्थांच्या चाणाक्ष व अनुभवी नजरेतून हेरून कठोर उपाययोजना करण्याचे त्यांनी ठरविले. इतर संतांप्रमाणे समाजातील नानाविध जाती, जमाती, पंथ इत्यादीना रामभक्ती व राष्ट्रभक्तीद्वारे साऱया समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे ठरवून प्रत्यक्ष कामाला सुरुवातदेखील केली.

जनतेसाठी जनतेमधून जनतेचे सरकार म्हणजेच ‘लोकशाही’ तत्त्व. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यापासून म्हणजेच इ.सन. 1947पासून हिंदुस्थानचा राज्यकारभार सांभाळला ना आपण लोकशाही तत्त्व स्वीकारले. हेच तत्त्व रामदास स्वामीनी 17व्या शतकात स्वीकारून आपली संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी सारा समाज राष्ट्रप्रेमाने एकत्र आणून तो बलसंपन्न करणे महत्त्वाचे होते. अल्पकाळात स्वामीनी प्रचंड मेहनत घेऊन श्रीरामकृपेने ते नियोजित कार्य यशस्वी केले. त्यांचा कर्मयोग व भक्तियोग याचा सुरेख संगम असणारा त्यांचा प्रभावी मंत्र होता ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान हवे.’

धर्मप्रसारातून राष्ट्रप्रसार करण्याच्या हेतूने ठिकठिकाणी कीर्तने करीत असतानाच रामदास स्वामींनी भिक्षा मागण्याचे तंत्र अवलंबले. समाजोद्धारासाठी गुणी, निष्ठावंत, बलसंपन्न संस्कारी व झपाटलेले तरुण हेरण्यासाठी स्वामीचे प्रभावी भिक्षातंत्र होते. त्यासाठीच रामदास स्वामी समाजकार्यासाठी बहुतांशी काळ समाजातच राहिले. वास्तविक त्यांना एकांत अति प्रिय होता. पण ती काळाची गरजच असल्याने ते बराच काळ समाजातच राहिले.

रामदास स्वामींनी गावागावातून दैनंदिन पाच घरी भिक्षा मागून फक्त मूठभर कोरडी भिक्षा घेण्याचे योजिले. भिक्षेच्या मिळणाऱया मोबदल्यात समाजाला ज्ञानाचा संदेश देण्याची प्रथा घातली. भिक्षेची प्रथा दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, साधुसंत आदीपासून चालत आली आहे. आजही भिक्षा मागितली जाते. पण रामदास स्वामींनी भिक्षेला ‘राष्ट्रीय’ स्वरूप दिले. समाजासाठी भिक्षा केवळ साधन म्हणूनच वापरले.

भिक्षा मागताना शिष्यांसाठी त्यांनी कठोर नियम घातले. 1) शिष्याने एका गावात तीन दिवसांपेक्षा जास्त राहू नये. 2) ‘जय जय रघुवीर समर्थ, /ओम भवती भिक्षांदेही’ सोबत मनाचा एखादा श्लोक म्हणावा. 3) दुःखी घरी भिक्षा मागू नये. 4) भिक्षेस नकार मिळाल्यास त्वरित दुसऱया घरी जावे. 5) फक्त पाचच घरी भिक्षा मागावी. 6) अत्यंत आनंदी व संतोषीवृत्तीने केवळ मूठभरच भीक्षा स्वीकारताना ज्ञानबोध अवश्य करावा. 7) भिक्षा मागताना कोणतीही लज्जा बाळगायची नाही, त्याचबरोबर भिक्षा स्थळ, तिथली परिस्थिती, घरची मंडळी यांचे योग्य निरीक्षण करावे, त्यातूनच राष्ट्रकार्यासाठी कार्यकर्ते निवडावेत.8) नेहमी संन्यस्त वृत्तीने राहून नित्य रात्री मंदिरे व अन्य ठिकाणी संकीर्तने करून समाजात राष्ट्रभक्तीचे बीज रोवावे. 9) मिळालेल्या भिक्षेचे 5 भाग करून जलचर, भूचर, इत्यादींना देऊन मगच पाचवा भाग स्वतः ग्रहण करावा. 10) भिक्षेत शिजलेले अन्न मिळाल्यास ते पाण्यात बुडवून घ्यावे. रामदास स्वामींची भिक्षेची संकल्पना अचूक ठरली. कारण त्यातून स्वामींना बरेच शिष्य मिळाले. उदा. कल्याण स्वामी, अंबिका, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी, इ. ज्यामुळे सारी यवनी सत्ता कोलमडून पडली. समाजातून मिळालेल्या शिष्यांमुळे स्वामी सामाजोद्धार करू शकले व समाजात एकी, आनंद, विश्वास, शक्ती, संस्कार, राष्ट्रप्रेम आणू शकले व खरेखुरे रामराज्य आणू शकले. छत्रपती शिवरायांमुळे हिंदवी स्वराज्य बनवू शकले.

समर्थाची भिक्षा हे केवळ समाजोद्धाराचे साधन असल्याचा प्रत्यय समाजाला आला व त्यामागील परमार्थाचे दर्शन समाजाला घडू शकले. ‘भीक व भिक्षा’ यात बराच फरक आहे. भीक मागण्यात केवळ स्वार्थ असतो. त्यात फक्त उदरभरण इतकाच हेतू असतो. त्यामागे कोणताही सकस विचार नसतो. मात्र भिक्षेमधून स्वामी रामदास स्वराज्य व सुराज्य संकल्पना समर्थपणे राबवू शकले.

आपली प्रतिक्रिया द्या