
>> रणवीर राजपूत
आज जगभरात ‘वसुंधरा बचाव’ ही लोक चळवळ उभी राहिली आहे. मानवाचे अस्तित्व हे वसुंधरेच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, यासंदर्भात व्यापक जनजागृती झाल्याने देशासह महाराष्ट्रातही पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने वसुंधरेचं संवर्धन करण्यासाठी शासकीय अन् अशासकीय स्तरावर ठोस उपाय योजले जाऊ लागले आहेत. खरंतर ही दिलासा देणारी गोष्ट आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 22 एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. यातून पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांचे रक्षण अन् संवर्धन करण्याचा संदेश जगातील नागरिकांना दिला जात आहे याची जाणीव केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने नागरिकांना करून दिली आहे.
जैविक बहुविविधता ही पृथ्वीवरील मानव, वृक्षवल्ली, वन्य पशुपक्षी, जलचर प्राणी यांच्या जीवनाचा मूळ आधार आहे. या पार्श्वभूमीवर जैविक विविधता जपणे, सांभाळणे अन् तिचं संवर्धन करणे हे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवरील मानव सुरक्षित व सुखाने राहण्यासाठी तिचं संवर्धन करणं तेवढेच महत्त्वाचे आहे. पृथ्वीच्या 460 कोटी वर्षांच्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या, त्यात बऱयाच जीवजाती अस्तंगत झाल्या. पूर्वीच्या काळात अनेक जीवजाती काळाच्या पडद्याआड गेल्या, पण त्यात मानवी हस्तक्षेप नव्हता. परंतु गेल्या अर्धशतकापासून मात्र माणसाच्या बेफिकिरीमुळे अनेक जीवजाती व वनस्पती नष्ट झाल्या असून काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वास्तवात ‘वनस्पती’ हा जैविक विविधतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 22 एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. यातून पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांचे रक्षण अन् संवर्धन करण्याचा संदेश जगातील नागरिकांना दिला जात आहे याची जाणीव केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने नागरिकांना करून दिली आहे.
खरंतर आज आपण जागतिक वसुंधरा दिनाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय ही मानवासाठी मोठी आनंददायी व दिलासा देणारी गोष्ट आहे. आता जगातील प्रत्येक माणसावर वसुंधरेचं म्हणजेच पृथ्वीचं जे देणं आहे, त्याची परतफेड करण्यासाठी तिचं रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आली आहे. चला तर आजच्या मंगलमय दिनी वसुंधरेला मातेचा दर्जा देऊन तनमनधनाने तिची सेवा करण्याचा संकल्प करूया.
जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमीचा प्रथम आपण मागावा घेऊया. कॅलिफोर्नियाच्या सेंट बार्बराच्या किनाऱयावर 28 जानेवारी 1969 रोजी प्रचंड मोठी तेलगळती झाली. त्यामुळे असंख्य समुद्रपक्षी, मासे व अन्य जलचर प्राणी मृत झाले. या घटनेमुळे जगातल्या पर्यावरणवाद्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. केमिकल्सशी संबंधित कारखान्यांवर पर्यावरण कायद्याअंतर्गत कडक निर्बंध घालण्याची मागणी जोर धरू लागली. सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जॉन मॅक्कॉनेल या ख्यातनाम पर्यावरणवादीने वसुंधरा बचावासंदर्भात एखादा दिन निश्चित करून जगभर साजरा करण्याची कल्पना मांडली. अखेर या विषयाला सर्वानुमते मान्यता मिळून संयुक्त राष्ट्रांचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांच्या पुढाकाराने 22 एप्रिल हा दिवस 1970 सालापासून जागतिक पातळीवर वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
यासंदर्भात अमेरिकेत हजारो शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी अन् अमेरिकन लोकांनी ‘अर्थ डे नेटवर्क’च्या माध्यमातून जगातल्या 192 देशांमध्ये ही वसुंधरा बचाव चळवळ पोहोचविली. पर्यावरण रक्षण अन् संवर्धन आणि वातावरणात होणारे बदल या गंभीर विषयावर 1992 साली ‘युनायटेड नेशन्स अर्थ समिट’ ही आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली. त्यानंतर 2000 सालापासून इंटरनेटच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येऊ लागली. हळूहळू साऱया जगात मोठय़ा गांभीर्याने पर्यावरण रक्षण व संवर्धन या विषयावर ठोस उपाययोजना केल्या जाऊ लागल्या. त्याची फलश्रुती म्हणजे 22 एप्रिल 2016 रोजी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात सामंजस्य घडवून आणणारा असा महत्त्वाकांक्षी पॅरिस करार झाला. या कराराचे पडसाद जगभर उमटू लागले. याची परिणती म्हणजे 22 एप्रिल 2020 या जागतिक वसुंधरा दिनाचे ‘एंड प्लॅस्टिक पॉल्युशन’ हे घोषवाक्य जाहीर होऊन पुढे प्लस्टिक उत्पादन व वापरावर सरकारद्वारे स्थायी स्वरूपाचे निर्बंध घालण्यात आले. वसुंधरा बचावसाठी सरकारला अन् नागरिकांना जे जे करणे शक्य आहे, ते ते सर्व अवश्य करावे, जेणेकरून पुढच्या पिढय़ा आनंददायी व सुखाने जीवन जगू शकतील.
आज जगभरात ‘वसुंधरा बचाव’ ही लोक चळवळ उभी राहिली आहे. मानवाचे अस्तित्व हे वसुंधरेच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, यासंदर्भात व्यापक जनजागृती झाल्याने देशासह महाराष्ट्रातही पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने वसुंधरेचं संवर्धन करण्यासाठी शासकीय अन् अशासकीय स्तरावर ठोस उपाय योजले जाऊ लागले आहेत. खरं तर ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि प्रशासनाने ‘माझी वसुंधरा’ ही संकल्पना साकार करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्धार केला आहे. जैविक बहुविधतेचे येत्या काळात संवर्धन करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत ही दिलासा देणारी गोष्ट आहे. कारण जैविक विविधता हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या जीवनाचा मूळ आधारवड आहे ही बाब आता मनोमनी सर्वांना पटली आहे असे वाटते. आपल्या पुढच्या पिढीला या धरतीवर आनंददायी जीवन जगता यावे यासाठी आपण जैविक विविधता जपायलाच हवी, त्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ असा संतांनी रयतेला संदेश दिला आहे. कारण ‘वृक्ष’ ही वसुंधरेची हिरवी फुप्फुसे आहेत. महत्त्वाचे म्हणजे याच फुप्फुसांद्वारे तुम्हा-आम्हाला जगण्यासाठी प्राणवायू (ऑक्सिजन) मिळत असतो. या पार्श्वभूमीवर वसुंधरेच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रत्येकाने ‘एक मूल- एक झाड’ लावून ते वाढविण्याची जबाबदारी उचलावी.
देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण वृक्षतोडीला विरोध करत ते थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणेला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वतोपरी सहकार्य करावे. जन्मापासून ते मरणापर्यंत माणसाला वृक्षांची मदत लागते. जन्म झाल्यावर बाळाला लाकडाचा पाळणा करावा लागतो, तर माणूस गतप्राण झाल्यावर त्याच्या चितेसाठी लाकडाचाच वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे वृक्ष हे प्राणवायू निर्मितीची एक फॅक्टरीदेखील आहेत. कारण वायूशिवाय (प्राणवायू) मानवाची कल्पनाच करवत नाही. अर्थातच शुद्ध हवा वा वायू म्हणजेच प्राणवायू, जो आपणांस झाडांपासून मिळत असतो. पृथ्वी, आप, तेज, आकाश व वायू ही पंचमहाभूते आहेत. त्यात वायुतत्त्व हे मानवाच्या अस्तित्वासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. केंद्र व राज्य सरकारचे वन विभाग, राज्यातल्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अन् ग्रामपंचायत यांनी आपापल्या भागातील शाळा, कॉलेज, हाऊसिंग सोसायटय़ा, सामाजिक संस्था, विविध मंडळे यांच्यामार्फत म्हणजेच लोकचळवळीतून व्यापक प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवावी. म्हणजे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ असे म्हणणे खरे ठरेल.




























































