
>> आकाश दीपक महालपुरे
ज्ञानाचं अमृत दिलं
प्रेमाचं खतपाणी घातलं,
मायेची ऊब दिली
चुकांची शिक्षा केली,
यशाबद्दल शाबासकी दिली
आणि संस्कारांचे विविध पैलू पाडले…!
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतःला घडवण्यात तीन गोष्टींचा मुख्य वाटा असतो. एक म्हणजे आई-वडील, दुसरे म्हणजे आपला भोवतालचा परिसर आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे आपली शाळा.
खरं तरं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये शाळा ही खूप मोठी भूमिका बजावत असते. परमेश्वराने लिहिलेलं जगाचं भलंमोठं पुस्तक कसं वाचायचं ते या शाळेच्या कुंपणामध्येच आल्यावर समजते. गणित सोडविता, सोडविता जीवनाचं गणित मांडायलासुद्धा हीच शाळा शिकवत असते. थोडक्यात, शाळा म्हणजे गुरुजनांचे आचरण आणि नीतिमूल्यांचे चालते बोलते हरिपाठ असते. या शाळेच्या विद्या मंदिरी आलेला प्रत्येक विद्यार्थी हा घडत असतो, उमलत असतो आणि सुसंस्कृतसुद्धा होत असतो.
पण जवळपास दीड-पावणे दोन वर्षापासून अचानकपणे उद्भवलेल्या कोरोनासारख्या विश्वातील महाभयंकर आजाराने या प्राथमिक शाळेची घंटाच वाजली नव्हती. या शाळेतील मुले या शाळेतील दैनंदिन आनंदावनापासून हळूहळू दुरावत चालली होती. केवळ घर, अंगण, टी. व्ही. , मोबाईल, कॉलनी, जवळचे नातेवाईक, या सर्वांचाच अगदी या मुलांना फारच कंटाळा आला होता. केवळ सुट्टय़ा आणि सुट्टय़ाच या मुलांना मिळत होत्या.
शाळा बंद असल्याने वह्या-पुस्तके, वर्गातील मित्र-मैत्रिणी, त्यांच्याशी मनसोक्त होणाऱया दिलखुलास गप्पा, शाळेचे विस्तीर्ण मैदान, त्या मैदानावरील घसरगुंडय़ा, लोखंडी झुले आणि इतर त्यासारखी खेळण्याची अनेक साधने साहित्य नसल्यामुळे ऑनलाइन वर्गात मुलांचे फारसे मनही रमत नव्हते. प्रत्यक्ष शालेय शिक्षण आणि सदरील ऑप्लिकेशन्सद्वारे मीटिंग कॉल करून भरवलेले वर्ग यात या विद्यार्थ्यांना मोठे अंतर भासत होते.
प्रत्यक्ष शाळेची सर या ऑनलाइन वर्गांना येत नव्हती. प्रचंड प्रमाणात मिळालेली सुट्टी आता नकोशी होऊन शाळेची तीव्र आठवण या बच्चेकंपनीला येत होती.
(खरं तरं, सुट्टय़ा या विद्यार्थी दशेत असणाऱया प्रत्येकालाच हव्या असतात, पण संस्कृतमध्ये ‘मर्यादम् विराजते’ म्हटले आहे ते उगाच नव्हे.)
त्यामुळे कोरोना परिस्थितीचे कमी झालेले वातावरण पाहून 1 डिसेंबर 2021 पासून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य-शासनाने घेतल्यामुळे समस्त विद्यार्थी, पालक व शिक्षक-वर्गांमध्ये आनंदाचा, उत्साहाचा, उत्सव बघायला मिळत आहे.
कोरोना आपत्तीनंतर प्रदीर्घ काळाने म्हणजेचं जवळपास दीड ते दोन वर्षानंतर प्राथमिक शाळा विशेषतः पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू होत असल्याच्या या वार्तेने गेल्या कित्येक दिवसापांसून घरात एकाकी पडलेल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. कारण शाळा म्हणजे केवळ शिक्षणच नव्हे, तर शालेय शिक्षणाबरोबरच शरीराची, मनाची जडण-घडण शाळेच्या मदतीने होणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
शाळांची मैदाने हीदेखील तितकीच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास घडवणारी महत्त्वाची केंद्रे असतात. मैदानी खेळाबरोबरचं विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठातून नीतिमूल्ये व संस्काराचे धडे विद्यार्थीदशेत या कोवळ्या वयात शाळेतच दिले जातात. त्यामुळे विद्यार्थी हा आचारसंपन्न घडतो आणि त्यातूनच पुढे चालून तो विद्यार्थी चांगले-वाईट, भलं-बुरं, हित-अहित यातील भेद समजून सत्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच विद्यार्थी हा शाळेत शिकण्यासाठी कधीच जात नसतो, तर तो शालेय अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक महत्त्वाच्या,हिताच्या गोष्टी आत्मसात करत असतो.
एक प्रकारे शाळा ही बाहेरच्या समाजाची छोटी प्रतिकृती असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण, भिन्न स्वभाववैशिष्टय़ांच्या सवंगडय़ांबरोबर मैत्री करणे, दंगामस्ती खोडय़ा करतानाच सहजीवनाचे संस्कार मुलांसाठी शाळाच सज्ज करीत असते. मातीच्या ओबडधोबड गोळ्याला शाळेचा परीसस्पर्श झाल्यावरचं सोन्याचा आकार प्राप्त होत असतो. यशवंतांच्या आईचा महान मंगलत्वाचा साक्षात्कार याच शाळेतून घडविला जातो, तर स्वातंत्र्यवीरांचे स्वतंत्रतेचे स्तोत्रही ही शाळेतच शिकवले जाते. भूगोलातील जगातील अनेक आश्चर्यांची तोंड ओळख याच शाळेच्या मदतीने होते तर सुसंस्कृत सुभाषितांची विचारांची समृद्धतासुद्धा याच शाळेतून प्रदान होते.
येथील गुरुजन अक्षराबरोबर मनालाही वळण लावतात. शब्दभांडाराने समृद्ध करतात. अवांतर वाचनाची आवड निर्माण करतात. ज्ञान आणि व्यवहाराची सांगड कशी घालायची तेसुद्धा शिकवतात. कुंभार जशी मडकी घडवतो, तशी शाळा आणि शाळेतील शिक्षक सर्वांना घडवतात.




























































