
विनायक जोशी ([email protected])
काय झालं आहे पृथ्वीला किंवा आपल्या अस्तित्वाला? कोणतं संकट आपलं दार, नव्हे, किनारे ठोठावतंय? ते आहे सागराची पातळी वाढण्याचं! कुसुमाग्रजांच्या कवितेत माणसाची अमर्याद जिद्द नि आशेची सागराशी तुलना करताना म्हटलंय, ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’ शेवटी समुद्र कितीही उसळला तरी तो किनारा ओलांडू शकत नाही ही त्याची मर्यादा! स्वातंत्र्यवीर सावकरांनी तर त्याला, ‘जो एक क्षणी तुज प्याला’ अशी अगस्तीची भीती दाखवून माझ्या मातृभूमीला दुर्बल समजू नकोस असा इशाराच सागराला दिला. माणसाच्या मनाची उभारी वाढवणाऱ्या या कविकल्पना श्रेष्ठच, पण कवी यशवंत यांनी सागराबद्दलची एक वेगळी कल्पना मांडली. ती अशी ‘काय हटवुनि हटतो सागर, हटेल एकीकडे। उफाळेल तो दुसरीकडुनि गिळून डोंगराकडे!’
सध्या पृथ्वीवरच्या सर्वच सागरांची जलपातळी वेगाने वाढतेय. निसर्गतः हिमयुग अवतरण्याचा किंवा जलप्रलय होण्याचा काळ पृथ्वीवरच्या अन्य प्राण्यांनी हजारो वर्षांपूर्वी अनुभवलाही असेल, पण ज्ञात मानवी इतिहासात असे उत्पात घडल्याच्या ज्या नोंदी आहेत त्याही नैसर्गिक बदलांमुळे घडलेल्या आहेत. आता गेल्या दोनशे वर्षांत त्यात ज्या मानवी ‘कर्तृत्वा’ची भर पडली आहे त्याचं नाव प्रदूषण. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ‘स्मॉग’ किंवा धुरक्याच्या (धुक्याच्या नव्हे) प्रदूषणाने दिल्लीकरांचा श्वास कोंडून ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर करण्याची वेळ आली. दिल्लीतल्या हाकेच्या अंतरावरच्या इमारती टीव्हीच्या कॅमेऱ्यात दिसत नव्हत्या. चीनमधील अनेक शहरं प्रदूषणाच्या तडाख्याने त्रासली आहेत. मलेशियासारख्या देशात नाकाला पट्टय़ा बांधून लोक फिरतायत. पृथ्वीवरचं वातावरण काळवंडतंय. गरम होतंय. या ‘ग्लोबल वॉर्मिंग’विषयी गेली चाळीस वर्षे लेख येतायत. 1975 मध्येही या विषयावर लिहिल्याचं आठवतं. त्यानंतरच्या काळात काय फरक पडला? किती जागृती झाली? प्रदूषण वाढता वाढता वाढतच गेलं. जागतिक तापमानाचा विपरीत परिणाम होऊन पृथ्वीच्या धुवीय प्रदेशातले हिमनग आणि आल्पस् तसंच हिमालयातील हिमनद्या (ग्लेशियर) वितळून जागा सोडतील हे भाकीत तीन दशकांपूर्वीचंच आहे, परंतु त्यावेळी (आणि कदाचित आताही) त्याकडे गांभीर्याने पाहावं असं जगाला वाटलं नाही. जगभरच्या सरकारांना याविषयीची जाणीव आधी व्हायला हवी होती, परंतु प्रगत देशांची सारीच धोरणं त्यांच्या स्वार्थापुरती असल्याने पर्यावरणवाद्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्याची जाणीव होईपर्यंत बराच उशीर झाला होता. आता मात्र संकट किनारे ओलांडू लागलंय. गेल्या दशकात पावसाचं प्रमाण आस्ते कदम बदलत आता ते अनपेक्षित होऊ लागलंय. पृथ्वीच्या पश्चिम ते पूर्व या परिवलनामुळे जगातले पूर्व सागरी किनारे वादळाचा सामना करतात असं आतापर्यंतचं चित्र होतं, पण आता मात्र पश्चिम समुद्री भागात म्हणजे हिंदुस्थानच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रातही पाठोपाठ वादळं उठतायत. याचं प्रमाण वाढलं तर वर्षभर नकोसा पाऊस उच्छाद मांडेल. पिकांचं नियोजन करणं अशक्य होईल. शिवाय एका दिवसात महिन्याभराचा पाऊस ढगफुटीने बदाबदा ओतला गेला तर त्याचा महापुराशिवाय दुसरा कोणताही परिणाम होत नाही. त्याचा उपयोग ना शेतीला ना वर्षभराच्या पाणीसाठय़ाला. कालपर्यंत जी गोष्ट ‘दुर्लक्षणीय’ वाटत होती तीच आज सामोरी ठाकली आहे. हे असंच सुरू राहिलं तर 2050 पर्यंत मुंबईसारखी किनारपट्टीवरची महानगरं अर्धी अधिक पाण्याखाली जातील असं म्हटलं जातंय. आताच अवकाळी पाऊस, वादळाने उसळलेल्या लाटा किनाऱ्यालगतच्या शेतात घुसतायत आणि खारं पाणी बराच काळ तसंच राहतंय. दक्षिण धुक्रीय प्रदेशातले मुंबई शहराच्या क्षेत्रफळाएवढे हिमभाग धुव सोडून उत्तरेकडे सरकतायत. उत्तर धुवावरही तेच घडतंय. ऍटलँटिक समुद्राची पातळी, पॅसिफिक महासागरापेक्षा अधिक लवकर वाढेल असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळय़ा इंग्लंड बेटाला धोका निर्माण होईल आणि न्यूयॉर्कसारख्या अमेरिकन शहरांनाही जलापत्ती सहन करावी लागेल. समुद्राची ‘गाज’ आक्राळविक्राळ होतेय. आम्हाला ‘जाग’ कधी येणार?

























































