लेख – आत्मरक्षणाचे भान

अनेकदा कठीण प्रसंगातून माणूस काही नवे शिकत असतो. अकल्पित आपत्ती पुढच्या काळात सावध राहण्यासाठी उद्युक्त करतात. त्यातून काही वेळा दैनंदिन जीवन पद्धतीत बदल करावे लागतात. सुरुवातीला त्याचा त्रास वाढतो, पण मग ते सकारात्मक बदल अंतिमतः आपल्याच फायद्याचे आहेत असे लक्षात आल्यावर त्याचा स्वीकार होतो. स्वयंशिस्तीचं महत्त्व लक्षात येतं.

गेल्या वर्षी सबंध जगाला ग्रासणारा कोविड-19 तथा कोरोना नावाचा महाभयंकर आजार आटोक्यात येतोय असं वाटत असतानाच पुन्हा डोकं वर काढतोय. या काळात परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणे, तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावणे इत्यादी गोष्टी सांभाळाव्याच लागतील. बेफिकीर लोकांची गोष्ट सोडली तर बहुतेक लोकांनी या गोष्टीचं जगभर पालन केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या पॅन्डॅमिक किंवा सार्वत्रिक साथीच्या रोगाविषयी समाजात जागृती निर्माण झाली आणि अशा वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते याचा अंदाज आला.

आता मात्र थोडीही बेपर्वाई परवडणारी नाही. अचानक उद्भवलेल्या दुर्धर कोविड परिस्थितीमुळे सुरुवातीला सारं जग भांबावलं, पण आस्ते आस्ते सावरलो असे प्रसंगही आपल्याला काही शिकवून जातात. साथीचे आजार नव्या वैद्यकीय संशोधनाला प्रवृत्त करतात. गेल्या दीडशे वर्षांत प्रत्येक साथीच्या वेळी हा अनुभव आला आहे.

यापेक्षा वेगळी संकटंही एकूणच मानवी समूहांवर किंवा पृथ्वीवर विशिष्ट ठिकाणी निर्माण होत असतात. त्यातली काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित. युद्ध, संहारक शस्त्रास्त्रे, आक्रमणे वगैरे गोष्टी मानवी समूह करतात, तर पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. दोन्हींमध्ये माणसांसह इतरही जीवसृष्टीची हानी होते.

अशावेळी सरकारी यंत्रणा कामाला लागतातच, पण सामान्य नागरिकही आपले   कर्तव्य बजावतात. मला आठवतं, अगदी कोयनेच्या भूकंपापासून, किल्लारीच्या उत्पाती भूकंपापर्यंत आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सर्वसामान्य लोकांनीही पैसा, धान्य, कपडे अशा गोष्टींची सढळ हाताने मदत केली. अगदी अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा, कोकणातील चक्रीवादळाचा किंवा दुष्काळी भागातील कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक सामान्य माणसं पुढे आली.

2005 मध्ये मुंबईत पावसाने हाहाकार उडवला होता. या शहरात मिठी नावाची एक नदी असल्याचा साक्षात्कारही त्यावेळी अनेकांना झाला. बघता बघता रस्ते पाण्याखाली गेले. छोटय़ा कारमध्ये बसलेले तर पाण्यात अडकलेच, पण अनेक जण मोठय़ा बसमध्ये, ट्रेनमध्येही अडकून पडले.

कधी कल्पनाही केली नव्हती अशा वस्त्यांमध्ये पाणी घुसलं, घरं पाण्याखाली गेली. कंबरभर ते गळय़ापर्यंत आलेल्या पाण्यातून कशीबशी वाट काढत माणसे आपलं घर जवळ करण्याचा प्रयत्न करू लागली. ज्यांना ते अशक्य झालं त्यांना अगदी अपरिचित लोकांनी उदार आसरा दिला. जेवणखाण दिलं. असंच औदार्य अनेक हॉटेलवाल्यांनी दाखवले. त्या आपत्तीच्या क्षणी सामूहिक माणुसकीचं अभूतपूर्व दर्शन घडलं.

कधी निसर्ग शांत असतो, पण माणसांच्या जगात उत्पात घडत असतात. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगाने दोन महायुद्धं आणि जीवघेणी शस्त्रास्त्रे स्पर्धा पाहिली. जपानवर झालेला अणुबॉम्बचा विध्वंसक हल्ला मानवजातीला हादरा देऊन गेला. आपत्तींच्या काळातच युरोपात रेड क्रॉस, सिव्हिल डिफेन्स अशा लोक सहभाग असलेल्या सेवाभावी संस्था निर्माण झाल्या. त्यापैकी नागरी संरक्षण दिवस 1 मार्चला असतो.

‘सिव्हिल डिफेन्स’ची संकल्पना इंग्लंडमध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात लंडनवर झालेल्या जर्मनीच्या हल्ल्याने उडालेल्या हाहाकारानंतर प्रकर्षाने आकाराला आली. जर्मन झॅपलिन विमानांनी अचानक बॉम्बवर्षाव केल्याने 1915 मध्ये इंग्लंडमध्ये गडबड, गोंधळ, घबराट निर्माण झाली. तोपर्यंतची युद्धं जमिनीवरची आणि सागरी प्रकारची होती. आकाशमार्गी हल्ले हा पहिलाच अनुभव होता. साहजिकच त्याने घडवलेल्या हानीमुळे अशा प्रसंगी सर्वसामान्यांनी स्वसंरक्षणासाठी काय करावं याचं प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू झाला. त्यातून निर्माण झालेल्या सिव्हिल डिफेन्स (नागरी संरक्षण) संस्थेचं लोण नंतर जगात पसरलं. मला आठवतं, 1962 च्या हिंदुस्थान-चीन आणि 1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या वेळी आमच्या शाळेत सिव्हिल डिफेन्सच्या ‘वॉर्डन’नी मार्गदर्शन केलं होतं.

अचानक शत्रूचा हवाई हल्ला झाला तर सुरक्षित जागी कशा पद्धतीने जायचं आणि आपला बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं. रात्री ‘ब्लॅकआऊट’चं पालन होतंय की नाही यावर आम्ही विद्यार्थी लक्ष ठेवू लागलो. त्याचप्रमाणे प्रथमोपचार किंवा ‘फर्स्ट एड’चं शिक्षणही महिलांना आणि मुलांना देण्यात आलं. आमच्याकडे आईने असं प्रशिक्षण घेतलं आणि आसपासच्या अनेक मुलांना प्रथमोपचारांची माहिती देऊन विविध जखमांवर बॅण्डेज कसं बांधायचं ते शिकवलं. सिव्हिल डिफेन्सच्या स्वयंसेवकांनी एखाद्या जखमी व्यक्तीला त्रास न होता सुरक्षित जागी कसं हलवावं तेही प्रात्यक्षिकांसह दाखवल्याचं आठवतं. सध्या कोविडविरुद्धच्या लढाईत अशीच जनजागृती दिसायला हवी.

प्रशिक्षणाचा उपयोग पुढे अनेक प्रसंगी झाला. अगदी दऱयाडोंगरात गिर्यारोहणाला गेल्यावर एखाद्या आजारी पडणाऱया सभासदाला किंवा कोणाला काही जखम झाल्यास प्रथमोपचार संच (किट) जवळ ठेवून उपचार करण्याची शिस्त ‘नागरी संरक्षणा’चं महत्त्व शिकवणाऱयांनी मनात बिंबवली होती. आजही आपत्तीकाळात भांबावून न जाता खंबीरपणे मुकाबला करण्याचं बळ मिळतं ते त्यामुळेच. अशा संस्था मानवतेची मोठीच सेवा करीत असतात. आजची गरज मात्र प्रत्येकाने मास्क, सुरक्षित अंतर राखून प्रसंगी सॅनिटायझरचा उपयोग करून स्वतःला आणि इतरांनाही सुरक्षित ठेवण्याची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या